भय इथले संपत नाही...

    दिनांक :11-Jan-2020
आनंदवाटा 
रवींद्र देशपांड 
 
 
 
भय ही मानवी मनातील शक्तिशाली व आदिम प्रेरणा आहे. स्वसंरक्षणाकरिता, स्वतःचे अस्तित्व टिकविण्याकरिता, संकटांची जाणीव होण्याकरिता ती आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्याला धोक्याची सूचना मिळते. उत्क्रांतीच्या काळात जिवंत राहण्याकरिता ती उपयुक्तही ठरली. भीतीमुळे शरीरात काही रासायनिक बदल होतात. काही हार्मोन्स तयार होतात. संकटावर मात करण्याकरिता आवश्यक असलेली अतिरिक्त ऊर्जा त्यामुळे निर्माण होते. हृदय, श्वास, मेंदूसह अनेक यंत्रणांवरही त्याचे परिणाम होतात. वारंवार असे झाले तर शरीर व मेंदूला तशी सवयही लागू शकते व त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. भीती माणसाला वाळवीसारखी आतून पोखरून टाकते. त्याच्या क्षमता निरुपयोगी करते. पाय मागे ओढले जातात. चांगल्या संधी हातातून निसटून जातात. माणूस हतबल, क्वचित निष्क्रियही होतो. आरोग्यावर परिणाम होतात ते वेगळेच. म्हणूनच खर्‍या, खोट्या किंवा काल्पनिक भीतीच्या मुळाशी जाणे, आनंददायी जीवनासाठी आणि समाजासाठी आवश्यकच ठरते.
एक उपयुक्त मूळ प्रेरणा अशी विघातक का ठरावी? अतिचिंता, काळजी, अस्वस्थता, बेचैनी, निराशा ही सारी भीतीचीच सख्खी भावंडं आहेत. अनेकदा तर त्यावर औषध घेऊन उपचार करावा लागतो. खरेतर मानवाच्या प्राथमिक अवस्थेत असलेली परिस्थिती आज संपूर्णपणे बदलली आहे. प्रगत सामाजिक जीवन उदयाला आले, पण माणूस भयमुक्त मात्र झाला नाही. उलट, नवनव्या भीतींनी त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. आज जंगलातील वाघाची भीती वाटत नाही, पण मानवनिर्मित परिस्थितीतूनच अनेकानेक भीतींचा जन्म होतो. व्यक्तिगत पातळीवर भीतीचे उगम शोधून त्यावर उपाय योजावे लागतात आणि माणसाला भयमुक्त करण्यातच सामाजिक परिवर्तनाचेही संदर्भ दडलेले असतात.
स्वसंरक्षणाच्या गरजेतून भीती निर्माण होते. म्हणूनच असुरक्षित, अनिश्चित, अनोळखी परिस्थितीत हा ‘स्व’ घाबरतो व संकटांविषयी सजग होतो. हा ‘स्व’ आता आपण इतका गुंतागुंतीचा करून घेतला आहे की, आपणच त्या गुंत्यात अडकलो आहोत. माणूस एक स्व-प्रतिमा तयार करतो. या प्रतिमेला धक्का लागेल याची त्याला भीती वाटते. अपयशाला घाबरण्याचे कारणही हेच असते. ती प्रतिमा खरी असते, खोटी असते, हा पुन्हा वेगळा प्रश्न. अनेक जण तर ‘लोक काय म्हणतील’ या दडपणाखालीच वावरत असतात. सुखासाठी आणि सुरक्षिततेसाठी आपण कुणावर तरी अवलंबून असतो. ते दूर जाण्याची, संबंध तुटण्याची अनेकांना भीती असते. आपण एकटे पडू, आपले महत्त्व कमी होईल, आपल्याला कुणी विचारणार नाही, लोक हसणार तर नाहीत, अशी भीतीची कितीतरी रूपं आहेत. समाजमाध्यमांमध्ये सक्रिय असणार्‍यांनाही एका नवीनच भीतीने ग्रासले आहे. त्याला आजकाल ‘फिअर ऑफ मििंसग आऊट’ म्हणजे फोमो म्हणतात. आपण विसरले जाऊ, असे त्यांना सतत वाटत असते. त्यांना कायम रिस्पॉन्स आणि लाईक्सचा आधार आवश्यक असतो. माणूस समाजशील प्राणी आहे. पण, व्यवहारात तो एखाद्या कळपातच राहात असतो. त्यामुळे आपण सुरक्षित असल्याचे त्याला वाटत असते. कळपातही काही प्रमुख लोक असतात. त्यांनाही महत्त्व कमी होण्याच्या भयाने ग्रासलेले असते. म्हणूनच ते सहजासहजी दुसर्‍या प्रभावी माणसाला प्रवेश करू देत नाहीत. कुणी आलाच तर ते असुरक्षित झाल्याचा अनुभव करतात. अनेकदा कळपात आपल्याला काहीही स्थान नसते. तेथे आपले असणे निरर्थक व निरुपयोगी असते, तरीही माणसं कळपाला चिकटून राहतात. कारण आपण वेगळे पडू अशी भीती वाटते. त्यांना कळपाची इतकी सवय झालेली असते की, कळपाबाहेरही जग आणि जीवन आहे, याचा त्यांना विसर पडलेला असतो.


sampadakiy_1  H

भीती वाटणारी यंत्रणा मेंदूत निसर्गतःच मिळाली आहे. ती स्वयंचलित आहे. ती तुमचे लक्ष धोक्याच्या परिस्थितीकडे वळवते. 
तुम्हाला सजग करते. तेच त्या यंत्रणेचे प्रयोजन आहे. पण, भीतीवर मात करणारी व्यवस्था मात्र मेंदूत प्रयत्नपूर्वक विचारांनी निर्माण करावी लागते. धोक्याची घंटा वाजली की, भीतीमुळे आपण तिकडे लक्ष देतो व ही घंटा खरी नाही, हे स्पष्ट झाले की भीतीचा प्रभाव कमी होतो. पण, कल्पनेने परिस्थिती गंभीर केली की भीतीचे परिणाम तीव्र होतात. कल्पनेनेही थरकाप उडू शकतो. प्रत्यक्षात काय आहे आणि आपण काय कल्पना करतो, हे ओळखता आले नाही तर स्ट्रेस हार्मोन्स सामान्य होत नाहीत. अंधाराची आपल्याला भीती वाटते. कारण स्पष्ट आहे. अंधारात कोणताही धोका असू शकतो. पण प्रकाश पडला, स्पष्टता आली की भीती वाटण्याचा प्रश्नच येत नाही. खरेतर हे उदाहरण सर्व प्रकारच्या भीतीला लागू आहे आणि त्याचे उत्तरही याच उदाहरणात दडले आहे. कोणत्याही प्रकारचा अंधार दाटून आला तर भीती वाटणे स्वाभाविक आहे. पण अशा वेळी विचार, विवेकाचा प्रकाश वापरला तर परिस्थितीचे स्पष्ट आकलन करता येते, विश्लेषण करता येते. अशा परिस्थितीत काय करायचे, याचा आराखडा तयार करता येतो. संकटाविषयी ज्ञान मिळवता येते. कारणांचा शोध घेता येतो आणि भीतीचा सामना करता येतो. पण, माणूस कल्पनेने अंधार अधिक गडद करतो. परिस्थितीचे भयंकरीकरण करतो. तोंड देण्याऐवजी पलायन करतो. आपल्या सुरक्षित ‘कम्फर्ट झोन’मध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. दुबळेपणाची जाणीव आणि क्षमतांचा अभाव भीतीच्या मुळाशी असतो. भीती माणसाला पराभूत करते. नवनवीन क्षितिजं पादाक्रांत करण्याची आकांक्षा असलेल्या माणसाने भीतीचे वास्तव समजून घेतलेच पाहिजे. अनेकदा परिस्थिती विदारक असते, हे अगदी खरे आहे. अशा वेळी वास्तवाचा स्वीकार करणे, हाच भयमुक्त होण्याचा मार्ग असतो. वास्तवापासून पळ काढणे, ते नाकारणे, विसरण्याचे मार्ग शोधणे, दडपणे किंवा त्याचा धिक्कार करणे, यामुळे परिस्थिती अधिक भयावह होण्याची शक्यता असते. वस्तुस्थितीला पूर्णपणे भिडण्यानेच निर्भयता येते. निर्भयता एक गुण आहे. त्यामुळेच आलेल्या आपत्तींशी लढण्याची ताकद येते. आपल्या क्षमता काय, आपले सामर्थ्य कोणते, आपले ध्येय काय, आपली मूल्यं कोणती, याविषयी स्पष्टता असेल, तर सामाजिक दडपणांना माणूस घाबरत नाही. पिअर प्रेशरचा त्याच्यावर परिणाम होत नाही. मग आपला अजेंडा लोक निश्चित करत नाहीत. असे असले तरी सामाजिक संबंध ही एक अपरिहार्य बाब आहे. पण, आपल्या संबंधांचा आधार काय आहे? मानवी संबंधांचा आधार भय, सुरक्षितता असू नये. त्यातून जन्म घेतात फक्त तडजोडी आणि त्यामुळे येणारे ताणतणाव. भीतीमुळे संबंधात खोटारडेपणा येतो. लपवाछपवी येते. मनात वेगळे असते आणि दाखवले वेगळे जाते. संबंधाचा आधार प्रेम आणि विश्वास असला पाहिजे. अशा संबंधांना तुटण्याची भीती नसते. त्यातच सहकार्य, स्वातंत्र्य आणि आनंद असतो.
छोटे बाळसुद्धा आवाज आला, अनोळखी चेहरे दिसले की, कावरेबावरे होते आणि रडायला लागते. आई त्याला उचलून घेते, आईचा स्पर्श झाल्याबरोबर त्याची भीती पळून जाते. ते आश्वस्त होते आणि रडायचे थांबते. हा अनुभव मात्र त्याच्या मेंदूत कायमचा कोरला जातो. अगदी शेवटपर्यंत संकटांच्या वेळी अशा कुठल्यातरी आश्वस्त करणार्‍या हातांची त्याला ओढ असते. ते मूल मोठे होते. स्वतंत्र होते. विचार, विवेक जागृत झाल्यामुळे स्वतःलाच स्वतः आधार देण्याची परिपक्वता येते. पण, मोठं होत असताना कुटुंब, समाज, देश असा त्याचा जगण्याचा परिघही वाढत जातो. त्या वेळी अशीच आश्वस्तता, संरक्षण, सुरक्षितता, भयमुक्तता त्याला कुटुंब, समाज, देश यांच्याकडूनही अपेक्षित असते. असलीच पाहिजे. कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राज्य व्यवस्था या सर्वांचे मुळात हेच प्रयोजन आहे. भयमुक्त समाजात भयमुक्त माणूस, हेच आपले लक्ष्य असले पाहिजे. अशा समाजातच मानवी हक्क सुरक्षित असतात. अर्थात, अशा व्यवस्थेत अनैतिकतेला आणि स्वैराचाराला धाक असणे गृहीतच असते. याकरिता समाजात विश्वास, सहिष्णुता, संवाद, समरसता अशा सांस्कृतिक मूल्यांची आवश्यकता असते. लोकशाही व्यवस्थेत खरे म्हणजे सत्ताबदल ही सामान्य प्रक्रिया असली पाहिजे, पण सत्ता गेली की काही वर्ग भयभीत होतात. कारण, त्यांचे हितसंबंध धोक्यात येतात आणि हे वर्ग एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. समाजाला भयग्रस्त ठेवणे, ही त्यांची गरज असते. भीती आणि संकटांच्या वेळी माणसाने जे करणे अपेक्षित असते तसाच विवेक अशा वेळीही सुजाण नागरिकांनी दाखविणे अपेक्षित असते. सत्तावलंबी व सत्तासापेक्ष समाज कधीच भयमुक्त असू शकत नाही. त्याकरिता आवश्यक असलेली मूल्ये सत्तानिरपेक्ष असतात. सत्तेमुळे आत्मसंतुष्ट न होता, सत्ता अंगात येऊ न देता समाजपरिवर्तनाचा लांबचा पल्ला गाठायचा आहे, याचे भान नेतृत्वाला ठेवावे लागते. ‘मी’ व्यक्ती आणि समाज दोन्हीही असतो. अपेक्षित समाज व्यवस्था उभी करताना मी समाज म्हणून कसा वागतो, माझी भूमिका काय असते, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ग्रेसांच्या कवितेत ‘झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया’ अशा ओळी आहेत. ज्या झाडाच्या सावलीत आपण निश्चिंत झोपलो, ज्याने आश्रय दिला, तेव्हा त्याप्रमाणे आपणही पुन्हा आधार देणारं झाड म्हणून उगवलं पाहिजे. हे जीवनचक्र सुरू राहिले पाहिजे. रवींद्रनाथांनी ‘व्हेअर दी माईंड इज विदाऊट फिअर’ या कवितेत भयमुक्त भारताचे स्वप्न पाहिले. ‘लेट माय कंट्री अवेक’ असं ते शेवटी म्हणतात. डॉ. नरेंद्र जाधवांनी त्याचा मराठीत फार सुंदर अनुवाद केला आहे. ते म्हणतात-
भयशून्य चित्त जेथ, उन्नत्त सदैव माथा
मम देश ही जागृत होवो, या मुक्त स्वर्गी आता...
खरेतर आपल्या प्रत्येक भारतीयाचे हेच स्वप्न असले पाहिजे.
8888803411