बॉक्स ऑफिसवर तानाजीने मारली बाजी

    दिनांक :11-Jan-2020
बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याच्या तान्हाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. तान्हाजी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने ही माहिती दिली आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी १६ कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. उत्तर भारत आणि पूर्व भारतात हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने केलेल्या एकूण कमाईपैकी ५० टक्के वाटा मुंबईचा आहे. शनिवार आणि रविवार या सुट्टींच्या दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
tanaji 1_1  H x
अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले आहे. तान्हाजी हा चित्रपट अजय देवगणचा बॉलिवूडमधील १०० वा चित्रपट असल्याने त्याच्या कारकिर्दीत या चित्रपटाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी शालेय विद्यार्थांना दाखवण्यात आला होता. अजय देवगणनेच याचे आयोजन केले होते. तान्हाजी आणि छपाक या दोन चित्रपटांसंदर्भात ट्विटरवॉर सुरू झाले होते. त्यामुळे दोन्ही चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाल करतात, याची उत्सुकता लागली होती. छपाक चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.