चला घडवू या ‘तरुण भारत!’

    दिनांक :12-Jan-2020
समिधा पाठक
7276583054
 
 
‘परहितार्थ सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास!’ हे वचन ज्यांनी सार्थ करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला, त्या स्वामी विवेकानंदजी यांची आज जयंती! स्वामी विवेकानंद भारतभूमीत जन्मलेले एक अलौकिक व्यक्तिमत्त्व! आपल्या प्राचीन संस्कृतीची आणि वैभवशाली इतिहासाची पताका त्यांनी विश्वात रोवली व विश्वविजय मिळवला. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ़! मित्र परिवारात ते अगदी प्रिय होते. साहित्य वाचन, व्यायाम, गायन, वादन तसेच अध्यात्माची त्यांना विशेष रुची होती. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी हिंदू धर्माची व्याख्या नव्याने जगासमोर मांडली आणि पाश्चिमात्य देशांमध्ये योग आणि वेदांचा प्रसार केला. त्यांच्या प्रभावशाली विचारांनी युवावर्ग राष्ट्रहिताच्या कार्यासाठी प्रेरित झाला. युवकांना जगण्याची उर्मी देऊन, योग्य मार्गदर्शन करून, लढण्याची प्रेरणा स्वामी विवेकानंदांनी युवकांमध्ये निर्माण केली. त्यांच्या विचारापासून, कृतींपासून प्रेरणा घेऊन युवावर्गाने आयुष्यात चांगल्या मार्गावरून वाटचाल करावी, त्यांची तत्त्वं समजून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, या उद्देशाने आपण त्यांचा जन्मदिवस ‘युवक दिन’ म्हणून साजरा करतो. 
 
young _1  H x W
 
 
अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे, असे वाटते. पण वास्तविक पाहता तारुण्याचा वयाशी, किंवा परिस्थितीशी संबंध नसून मनःस्थितीशी असतो. स्वामीजींच्या मते- आदर्श युवक कोण? तर ज्याच्या चेहेर्‍यावर तेज, देहामध्ये शक्ती, मनामध्ये उत्साह, बुद्धीमध्ये विवेक, हृदयामध्ये करुणा, मातृभूमीवर प्रेम, इंद्रियांवर संयम, प्रबळ इच्छाशक्ती, धाडसाचे बळ, सिंहासारखी निर्भयता, सेवेसाठी तत्परता आहे, तोच आदर्श युवक आहे.
 
 
तारुण्य ही आयुष्यातील सर्वात रुपेरी सायंकाळ असते. उत्साह, जिद्द, प्रचंड सामर्थ्य, बुद्धिमत्ता, गगनभेदी अस्मिता अशा अनेक गुणांनी परिपक्व असे तरुणाचे व्यक्तिमत्त्व असायला हवे. उपनिषदात देखील म्हटले आहे-
 
 
‘युवा स्यात्साधुयुवाध्यायकः
आशिष्ठी द्रढिष्ठी बलिष्ठः।
त्सयेयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात्‌।’
 
 
म्हणूनच ज्या देशातील तरुण असे कर्तबगार नसेल त्या देशात कसलीच आबाळ भारताचे भविष्य हे तरुणांचा हातात आहे. पण आज अनेकांच्या मनात प्रश्न उठतोय्‌, की- खरंच तरुण पिढी हे आव्हान पेलण्यासाठी समर्थ आहे का?. िंसहाच्या गुहेत शिरून त्याची आयाळ पकडण्याचं सामर्थ्य ज्याच्या बाहुंमधे आहे, मनगटात जगावर संक्रमण करण्याची शक्ति आहे, त्या तरुण पिढीवर हा प्रश्न का उभा राहतोय्‌, याचा विचार आपण करायला हवा...
 
 
नैराश्य, एकटेपण, व्यसनाधीनता, गुन्हेगारी, दहशतवाद, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे प्रमाण आज वाढताना दिसत आहे. या अपरोक्ष देखील आजही चांगल करण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या देशातील तरुणांमध्ये आहे. 1800 वर्षे आपण जगावर शिक्षणाच्या बाबतीत स्वामित्व गाजवलं आहे, आजच्या पिढीला केवळ पुस्तकी विद्या न देता, त्यांच्याकरिता गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रणाली प्रस्थापित करायला हवी. विज्ञान, गणित, भाषा या विषयांखेरीज चारित्र्य निर्माण या विषयाचं महत्त्व अभ्यासक्रमात सांगायला हवं. देशाला सुराज्य बनविण्याची दृष्टी मिळवून द्यायला हवी. आज देशाच्या युववर्गाकडून अनेक अपेक्षा आहेत, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या कडे प्रॉपर असेट्स आहेत का? आज देशातील प्रत्येक युवकाला योग्य शिक्षण मिळावे, याकरिता पुरेसे महाविद्यालय आहेत का? ब्रेन ड्रेन थांबवायला हवे, असे आपण म्हणतो, पण मग युवकाला त्याच्या मनाजोगी काम करण्याच्या रोजगार संधी देशात आहेत का? त्यांच्या कामाची, मेहनतीची, बुद्धीची यथायोग्य जाणीव आहे का? युवकांनी केलेल्या शोध प्रबंधांचा उपयोग कागदी गठठ्यांची संख्या वाढवण्याखेरीज, देशाच्या विकासाकरिता कितपत केल्या जातोय्‌? पिढी अंतराने निर्माण झालेल्या मतभेदांचं निरसन केल्या जातंय्‌ का? युवकांवर विश्वास ठेवल्या जातोय्‌ का? पूर्वी ज्याप्रमाणे गुरू मार्गदर्शनाकरिता असायचेत, त्याप्रमाणे आज प्रत्येक युवकाला गाईड करणारे मेंटर्स आहेत का? युवकाला मनाजोगी करिअर निवडता येतंय्‌ का?
 
 
शिक्षण किंवा नोकरीकरिता मुलं घराबाहेर पडतात. आई-वडिलांच्या लाडात वाढली असतात, बाहेर पडल्यावर एकटेपण येतं, अशा वेळी त्यांना मानसिक आधाराची गरज असते. तो मानसिक आधार व प्रोत्साहन त्यांना शिक्षक किंवा मेंटर्स देत आहेत का? बालपणी आई-वडील विकेन्ड्सला मुलांना बाहेर फिरायला घेऊन जातात, कधी पार्क्समध्ये तर कधी पिकनिकला नेतात. मग तो मोठा झाल्यावर त्याला देखील रूटीन चेंजची गरज असते, हे आपण लक्षात घेतो का? वाढत्या वयाबरोबर युवकाची मॅच्युरिटीदेखील वाढत असते. पण हे मानण्याची तयारी मात्र सगळ्यांची नसते. आणि मग ‘आजकालची पिढी’ या टॅगखाली युवा पिढीचा उद्धार केल्या जातो. एकूण जर सारासार विचार केला, तर आजच्या युवा पिढीला समजून घेतल्या जात नाहीय्‌.
 
 
यौवनकाल हा मानवी आयुष्यातील वसंत ऋतू आहे. तारुण्याच्या प्राप्तीने माणूस बेभान होतो. हजारो प्याले झोपल्यासारखी नशा चढते. त्याने ठरवले तर तो काहीही करू शकतो. सर्वप्रथम युवकांवर विश्वास ठेवायला हवा. विश्वास कुठल्याही नात्याला एक आगळं स्वरूप देतो. आज तरुणवर्गाची दिशाभूल न करता त्याला योग्य मार्ग दाखविण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. मुले चुकत असतील, तर त्यांना प्रबोधनाने सुधारायला हवे. मुले मोठी झाली, याचा अर्थ आपण जबाबदारीतून मुक्त झालो, असा होत नाही. सध्याची पिढी अशी आहे-तशी आहे, याची केवळ चर्चा न करता आपली पाल्ये, आपले विद्यार्थी नक्की कोणत्या वळणाचा रस्ता धरत आहेत, याकडे पालकांनी लक्ष्य द्यावे.
 
 
आजची तरुण पिढी प्रेमाची भुकेली आहे, त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यांच्या बरोबर मित्रासारखे संबंध प्रस्थापित करायला हवे. त्यांना वेळ देऊन आपलं मत त्यांच्यावर न लादता त्यांचे विचार जाणून घेऊन एक सुवर्ण मध्य बनवायला हवा. युवकांच्या विकासासाठी, उद्धारीकरणासाठी आताच सजग झाले पाहिजे, जेणेकरून ही शक्ती समाजविघातक न बनता राष्ट्रि्‌वकासक होईल.
 
 
युवा संघटनांच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी वेगवेगळे उपक्रम, शिबिरे राबवून या पिढीला निराशावादाकडून आशावादाकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देशाची प्रगती सर्वांवर अवलंबून आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखले पाहीजे व कर्तव्यपूर्तीला प्राधान्य देऊन, तिला तन-मन-धन अर्पण केले पाहिजे. तरुणांकडे आव्हाने पेलण्याची ताकद निश्चितच आहे, गरज आहे ती फक्त त्यांच्यातील चेतना जागवण्याची, त्यांना योग्य मार्गदर्शनाची, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची. परदेशी जाणार्‍या उच्च शिक्षित युवावर्गाला भारतातचं योग्य संधी मिळवून द्यायला पाहिजे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. युवावर्गाची मानसिकता समजून त्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हवी.
 
 
युवा पिढी हेच या देशाचे खरे भांडवल आहे. भारताला घडवतं कोण आहे? आपणचं घडवतोय्‌, मग आपण जर स्वत:ची प्रगती केली, देशबांधवांची मदत केली तर देशाची उत्तरोत्तर प्रगती नक्कीच होईल!
 
 
हे युवक, या वयात थोड्या खस्ता खाल्ल्यात, थोडी शिस्त गिरवली, तर काय वाईट होणार? आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. आयुष्य मस्तीत पण शिस्तीत जगायचं. स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले.’ देशसेवेच्या या यज्ञकुंडात स्वतःला अर्पण करून स्वामीजींच्या स्वप्नातला भारत देश घडवूया. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. युवाशक्ती या देशाचं बलदंड सामर्थ्य आहे. तिचा यथायोग्य वापर करून अतुल्य असा तरुण भारत घडेल. हे युवक! तुझ्या स्वप्नांना दे कृतीची जोड, नसेल मग भारताला या विश्वात तोड
 
••