स्वामी विवेकानंद : भारताच्या पुनरुत्थानाचे अग्रदूत!

    दिनांक :12-Jan-2020
प्राचार्य प्रमोद श्री. डोरले
9860296131
 
 
भारतभूमी ही अवतारी महापुरुषांची जन्मभूमी आहे म्हणूनच ती पुण्यभूमी आहे. भगवान श्रीकृष्णांनी याची घोषणा भगवद्गीतेत केली आहे. ती सर्वांना विहितच आहे.
 
 
श्री भगवान रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद हे आधुनिक युगावतार आहेत. ईश्वरनियोजित कार्य करण्यासाठी त्यांचे आगमन पृथ्वीतलावर झाले होते, हे त्यांच्या चरित्रातील दैवी संकेत देणार्‍या काही घटनांवरून स्पष्ट होते. परमेश्वराने त्या दोघांना कोणत्या कार्यासाठी भूतलावर पाठविले होते, याची कल्पना स्पष्ट होण्यासाठी त्या काळच्या परिस्थितीचे अवलोकन करणे जरूर आहे. 

nagput _1  H x  
 
 
स्वामी सारदानंद म्हणतात-
‘‘पाश्चात्त्यांनी भारतावर अंमल बसविला त्या दिवसापासून भारताच्या राष्ट्रीय जीवनात विशेष बदल घडून आला. प्राचीन काळापासून ज्या सार्‍या निष्ठा हृदयात बाळगून भारतवासी आपले वैयक्तिक आणि राष्ट्रीय जीवन संचालित करीत होते, त्या सर्वांमध्ये एक अपूर्व बदल घडून आला... भारताची समजूत पटली की, इतके दिवस हृदयात निष्ठापूर्वक तो जे बाळगून आहे ते सारे रानटी आणि असंस्कृत असेच आहे. इंग्रजांचे म्हणणे बरोबरच आहे. या प्रकारे भारताला स्वतःच्या गौरवशाली पूर्वेतिहासाचा आणि दिव्य परंपरेचा विसर पडला. त्याचा ‘स्मृतिभ्रंश’ झाला. त्यामुळे त्याचा ‘बुद्धिनाश’ ओढवला आणि त्याने त्याच्या ‘राष्ट्रीय अस्तित्वाचाच’ लोप होण्याची वेळ आली... योग आणि भोग या दोन्ही मार्गातून ढळून, परानुकरण करीत वासनेच्या झंझावातात सापडून तो सुकाणुगीर नसलेल्या नावेप्रमाणे वाटेल तसे भरकटू लागला.’’ (श्री रामकृष्ण लीलाप्रसंग- पृ. क्र. 67)
 
 
अशा विपरीत परिस्थितीत भारताचे ‘सुकाणू’ सांभाळण्यासाठी ईश्वराच्या कृपेने आधुनिक भाषा, आधुनिक विज्ञान, आधुनिक विविध शास्त्रांबरोबर भारतीय दर्शनशास्त्रे, वेदान्त तत्त्वज्ञान, अध्यात्म विज्ञान यांत पारंगत आणि भगवान श्री रामकृष्ण आणि माता महाकालीचा आशीर्वाद प्राप्त श्री. नरेन्द्रदत्त- जे पुढे विवेकानंद झाले- अवतीर्ण झाले आणि त्यांनी अस्तित्वहीनतेच्या अत्यंत घातक वळणावर असलेल्या भारताला सावरले.
 
 
स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 ला अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, भारताचा इतिहास, परंपरा याचे एक भव्योदात्त दर्शन आपल्या आक्रमक शैलीने मांडून ‘सांस्कृतिक दिग्विजय’ केला. सन 1893 ते 1897 पर्यंत तेथे राहून वेदान्त सोसायटीची स्थापना केली. त्यांच्या या ईश्वरनियोजित कार्याचा परिणाम म्हणजे इंग्रजी शिक्षणामुळे मानसिकदृष्ट्या गलितगात्र झालेल्या आणि न्यूनगंडाने ग्रस्त झालेल्या भारतीयांमध्ये चेतना निर्माण झाली. त्यांचा आत्माभिमान जागृत झाला. आत्मगौरवाचे भान त्यांना आले. स्वामी विवेकानंदांनी भारतीयांची अस्मिता जागृत केली. भारतात आल्यावर त्यांनी ‘कोलंबो ते अल्मोरा’ येथे दिलेल्या भाषणांमुळे प्रचंड जनजागृती झाली. आपली प्रियतम मातृभूमी भारतमाता हिच्यावरील उत्कट प्रेमाने ओथंबलेल्या, भक्तीने परिपूर्ण असलेल्या भाषणांनी संपूर्ण भारतीयांना भारताच्या आत्म्याचा शोध लागला. स्वातंत्र्यप्राप्तीची लालसा निर्माण झाली. त्यांच्या भविष्यवाणीप्रमाणे की, ‘‘तुम्ही पुढील पन्नास वर्षे एकाच देवतेची (भारतमातेची) उपासना करा. आपली माता गुलामगिरीतून मुक्त होईल.’’ ती प्रत्यक्षात आली. (सन 1897 ते सन 1947)
 
 
 
स्वामी विवेकानंद भारताच्या उत्थानाचे अग्रदूत-
स्वामी विवेकानंदांचे वर्णन काही इतिहासकारांनी ‘घनिभूत भारत’ या समर्पक शब्दांत केले आहे. त्याचे स्पष्टीकरण त्यांची धर्मकन्या भगिनी निवेदिता हिने अतिशय समर्पक शब्दांत केले आहे. त्या म्हणतात- ‘‘मातृभूमी हे त्यांचे आराध्य दैवत होते. वार्‍याच्या अगदी हलक्याशा झुळुकीने थरथरणारी, स्पंदिन होणारी, नाजूक आधारावर बसवलेली किंकिणी असावी तसे स्वामीजींचे अंतःकरण होते. त्यांच्या मायदेशाच्या संबंधीच्या सर्व गोष्टी त्यांच्या मनाला स्पर्शून जात व त्यांच्या हृदयात स्पंदने निर्माण करीत. भारताच्या भूमीवर उठणार्‍या प्रत्येक हुंदक्याचा संवेदनात्मक प्रतिध्वनी त्यांच्या हृदयात उमटत असे... भीतीची किंकाळी, दुर्बलतेची थरथर, अस्तित्व नष्ट होण्याच्या संभावनेची जाणीव या सार्‍या गोष्टी सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहचत असत. त्यांच्या प्रेमाचे एकच अवलंबन होते ते म्हणजे त्यांची परमप्रिय मातृभूमी भारतमाता!’’ (मला प्रतीत झालेले माझे गुरू-भगिनी निवेदिता (पृ. क्र. 31).
 
 
स्वामी विवेकानंदांचे ‘समर्थ भारत’ निर्माण करण्याचे स्वप्न होते. आपल्या आध्यात्मिक शक्तीने भारताने पुन्हा जग जिंकलेच पाहिजे, हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी भारताच्या उत्थानासाठी मार्गदर्शक तत्त्वांची पंचसूत्री दिली आहे. त्या माध्यमातून धर्म आणि आध्यात्मिक शक्तीच्या सामर्थ्यावर संपूर्ण जगाला शांतीचे वरदान देणारा, जगत्‌गुरू भारत पुन्हा उदयाला येईल, हा त्यांचा विश्वास होता. त्याचा थोडक्यात परामर्श घेऊ :
 
 
1) देवतास्वरूप मातृभूमीची उत्कट भक्ती भावना-
स्वामी विवेकानंदांनी देशाकडे पाहण्याची दृष्टीच बदलवून टाकली. मातृभूमीविषयीची ही उत्कटता प्रकट करताना ते म्हणतात- ‘‘पाश्चात्त्य देशात येण्यापूर्वी मी भारतावर प्रेम करीत असे. आता तर भारतातील धूळही मला पवित्र वाटत आहे. तेथील हवादेखील मला आता पवित्र वाटते. भारत मला आता पवित्र धाम वाटतो. माझ्या मते तो आता तीर्थस्थान होऊन बसला आहे.’’
कोलंबो ते अल्मोरा त्यांनी हे भारतभक्तिस्तोत्र गायिले. त्यामुळे भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटली.
 
 
2) धर्मावरील प्रगाढ श्रद्धा-
स्वामी विवेकानंद भारताचा उल्लेख नेहमी ‘धर्मभूमी भारत’ असाच करायचे. धर्म म्हणजे काही रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकाण्ड, शिवू नका वाद, या बाह्य आचारपद्धतीत अडकलेला नसून, मानवी जीवनाचे उन्नयन करणारे ते दैवी, संजीवक रसायन आहे. धर्मतत्त्वाचे विवेचन करताना ते म्हणतात- ‘‘धर्म ही भारतवर्षाची जीवनशक्ती आहे. आपल्या पूर्वजांच्या या महान वारशाचे हिंदू जातीला जोपर्यंत स्मरण आहे तोपर्यंत या पृथ्वीतलावरील कोणतीही शक्ती तिचा नाश करू शकत नाही.’’
या निखळ धर्मविवेचनेमुळे सुधारकांनी धर्मविषयक निर्माण केलेला गैरसमज व नकारात्मक भाव दूर झाला. ‘धर्मोरक्षति रक्षितः’ ही श्रद्धा निर्माण झाली.
 
  
3) आंतरिक विकास घडविणारी शिक्षण प्रणाली-
इंग्रजांच्या साम्राज्याचा कारभार चालविण्यासाठी पोटभरू वृत्तीचे बुद्धिवादी (इंटेलेक्च्युअल बेगर्स) आणि देहाने भारतीय पण मनाने, वृत्तीने इंग्रजाळलेले काळे इंग्रज निर्माण करण्याच्या कुटिल हेतूने लॉर्ड मेकॉले यांनी सन 1836 ला शिक्षण प्रणाली प्रारंभ केली. त्यासाठी बुद्धिभेद निर्माण करणारे साहित्य निर्माण केले. लॉर्ड मेकॉलेप्रणीत शिक्षणातून ‘साहेब वाक्य प्रमाणं’ची बौद्धिक आणि मानसिक गुलामगिरी निर्माण झाली. तसेच ‘जे जे भारतीय ते ते वाईट आणि त्याज्य’असा न्यूनगंड निर्माण झाला. त्याला नष्ट करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी धर्मकेन्द्रित, चारित्र्यबल, सेवाभावी, आंतरिक विकास करणार्‍या आणि राष्ट्रीय उद्दिष्टानुरूप शिक्षण प्रणालीचा आग्रह धरला. ते म्हणतात- ‘‘प्रत्येक राष्ट्राला त्याचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय हेतू असतो. त्याच दृष्टीने तेथील शिक्षण पद्धतीची रचना हवी. प्रत्येक राष्ट्राला ईश्वरानेच एखादे कार्य सोपविलेले असते. तीच त्या राष्ट्राची ‘नियती’ (डेस्टिनी) असते.’’ If the heart of every nation's life, lives an ideal which is its reason for existence - या नियमाप्रमाणे संपूर्ण जगाचे, मानव समाजाचे आध्यात्मीकरण करणे, हीच भारताची नियती आहे. भारतीय अस्तित्वाचा तोच कणा आहे. तोच आधारस्तंभ आहे. तोच गाभा आहे. (रिझन-फॉर-एक्झिस्टन्स) ते कार्य भारताला करावेच लागणार आहे.
 
 
4) विराट समाजरूपी ईश्वराची सेवा-
स्वामी विवेकानंदांच्या मते, सामान्य माणूस हाच कोणत्याही समाजाचा आणि राष्ट्राचा कणा असतो. (बॅक-बोन-ऑफ द नेशन) त्याचेकडे दुर्लक्ष होता कामा नये. ‘शिवभावाने त्याची सेवा करा.’ ‘दरिद्री नारायण भव’ या भूमिकेतून त्याची ईश्वरभावाने सेवा करा. या मनोधारणेने समाजरूपी विराट पुरुषाची सेवा करण्याने समाजात खर्‍या अर्थाने एकरसतेची निर्मिती होते. समाजाची एकरसता हीच कोणत्याही राष्ट्राचे बल आणि शक्ती असते.
 
 
5) नायमात्वा बलहिनेन लभ्यते-
कठोपानिषदातील नचिकेता हे स्वामी विवेकानंदांचे अतिशय आवडणारे पात्र आहे. त्यांच्या दृष्टीने नचिकेता म्हणजे ‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष यमदेवतेलाही सामोरे जाण्याची अकुतोभय वृत्तीचे प्रतीक आहे. ही मृत्युंजयी निष्ठा भारतातील लोकांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये निर्माण व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. तरुणांनी शक्तीची उपासना करावी, हा त्यांचा आग्रह असे. ते म्हणतात- ‘‘आज आपल्याला उपासना हवी आहे. सिंहगर्जनेने गीतेचा उद्घोष करणार्‍या श्रीकृष्णाची, कोदंडपाणि रामाची, महावीर हनुमन्ताची, जगदंबा महाकालीची. या उपासनेने अदम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड बल आमच्यात निर्माण होईल व आपले देशबांधव बलशाली होतील. ’’ ते पुढे म्हणतात- ‘‘भारतमातेला कमीतकमी एक हजार तरुण माणसांचे बलिदान हवे आहे. लक्षात ठेवा ‘माणसांचे’ हवे आहे- पशूंचे नव्हे.’’
 
 
स्वामी विवेकानंदांनी या पाच आयामांद्वारे भारतात आध्यात्मिक राष्ट्रवादाची चेतना जागृत केली. इतिहासाच्या एका अत्यंत घातक वळणावर भारताला सावरले. भारत राष्ट्राची सुप्त आत्मशक्ती जागृत केली. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला नैतिक आणि आध्यात्मिक बळ मिळाले. या सर्व शुभकार्याचा श्रीगणेशा त्यांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत केलेला सांस्कृतिक दिग्विजय आहे. तोच नवीन भारताचा पुनरुत्थानाचा हुंकार आहे.
 
 
स्वामी विवेकानंदांच्या, धर्मपरिषदेतील सांस्कृतिक दिग्विजयाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. त्यांच्या कर्तृत्वाने भारलेले अनेक विचारवंत, बुद्धिवंत त्याचा शोध घेऊ लागले. हा शोध भविष्यकालीन परिणामांचा होता. प्रातिनिधिक स्वरूपात आपण विख्यात इतिहासतज्ज्ञ आणि इण्डॉलॉजिस्ट ए. एल. बॅशम काय म्हणतात ते पाहू. ते म्हणतात-
 
 
''Vivekanandas's greatest contribution to the modern world was that he led the counter-attack from the East, and was the first 'Indian religious teacher' in recent times to make an impression out side India'... Vivekananda's idea of universal religion and a new harmogurising of sciecne and spirituality made the Vedanta a future religion of the world.''
 
 
स्वामी विवेकानंदांनी केलेला हा ‘काऊंटर’ अटॅक इतका घणाघाती होता की, त्यामुळे संपूर्ण जगाचा भारत, हिंदू धर्म, संस्कृती, हिंदू समाज याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. त्या संबंधातील एकच प्रतिक्रिया आपण पाहू म्हणजे कल्पना येईल. धर्मपरिषदेनंतर ‘प्रेस ऑफ अमेरिका’ने लिहिले होते-
 
 
'हिंदू तत्त्वज्ञान आणि विज्ञान यात पारंगत असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या वक्तृत्वाच्या लोंढ्यात तेथे उपस्थित असलेल्या सर्व ख्रिस्ती पंथाचे पाद्री, प्रचारक व त्यांची भाषणे कुठल्या कुठे वाहून गेलीत.'
 
 
याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी भारताचा आत्मा जागृत केला. म्हणजेच राष्ट्राचे पुनरुत्थान केले. त्या संबंधात स्वामी हर्षानंद, अध्यक्ष रामकृष्ण मठ, बंगळुरू यांचे म्हणणे पाहणे अधिक सयुक्तिक राहील. ते म्हणतात- ‘‘राष्ट्राचे पुनरुत्थान हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचे नियोजित कार्य होते, जे त्यांचे गुरू श्रीरामकृष्ण परमहंसांनी त्यांच्यावर सोपविले होते. स्वामीजींच्या श्वासाश्वासात ‘भारत’ भरून होता. भारत हे त्यांच्या जीवनाचे भव्य स्वप्न होते. ते भारताबद्दलच अखंड बोलायचे आणि त्यांनी भारतीयांसाठीच अविरत कठोर परिश्रम केले... स्वामीजींमध्ये ‘ब्रह्मर्षी’ आणि ‘राजर्षी’ ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे एकरूप झालेली होती.’’ (राष्ट्रीय पुनरुत्थान, स्वामी विवेकानंदाचे स्वप्न आणि संघकार्य, पृ. क्र. 39).
 
 
 
असा हा स्वामी विवेकानंदांनी मांडलेला पंचसूत्रात्मक स्वतंत्र भारताचा समर्थ भारत (न्यू इंडिया) निर्माण करण्याचा राजमार्ग आहे. शक्तिशाली भारत-‘शापादपि शरदापि’चे म्हणजे ‘इदं ब्राह्म इदं क्षात्रं’चे प्रचंड सामर्थ्य असणारा, उभा राहिलाच पाहिजे. त्याशिवाय नियतीने त्याच्यावर सोपविलेले जे कार्य- ‘संपूर्ण मानव समाजाचे आध्यात्मीकरण’ ते तो करू शकणार नाही, हा त्यांचा आग्रह होता.
 
 
आज त्यांच्या जन्मदिनी 12 जानेवारी, या पवित्रदिनी- आपणही त्यांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होऊ या!