अनुष्का उतरणार क्रिकेटच्या मैदानात

    दिनांक :12-Jan-2020
कलाविश्व आणि क्रीडाक्षेत्र यांचे गेल्या अनेक वर्षांपासून खास नाते आहे. त्यामुळेच आजवर अनेक लोकप्रिय खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी, मिल्खासिंग, मेरी कोम यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती झाल्यानंतर लवकरच आता एका महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

anushka- jhulan goswami_1 
 
‘झीरो’ चित्रपटानंतर अनुष्का शर्मा या बायोपिकच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असून अनुष्का यामध्ये झुलनची भूमिका साकारणार आहे. झुलन गोस्वामीला भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गोलंदाजीचा कणा मानले जाते.
 
दरम्यान, सध्या कलाविश्वामध्ये क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांवर आधारित चित्रपट होताना दिसत आहेत. लवकरच, कपिल देव यांच्या जीवनावर आधारित ’83’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात रणवीर सिंग मुख्य भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजवरदेखील बायोपिक येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.