अराजकतेचे व्याकरण...

    दिनांक :12-Jan-2020
डॉ. परीक्षित स. शेवडे
0251-2863835
 
 
संसदीय लोकशाहीत रक्तरंजित क्रांतिमार्गावर बंदी घालण्यात यावी. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह यांवर आपण बंदी घालायला हवी. आर्थिक व सामाजिक मागण्या करण्यास अन्य मार्गच नव्हते, तेव्हा हे असंवैधानिक मार्ग समर्थनीय होते. संसदीय कार्यप्रणालीत मात्र या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊच शकत नाही. हे मार्ग म्हणजे अराजकतेचे व्याकरण (grammer of anarchy) आहेत. ते लवकरात लवकर बंद करणे आपल्या हिताचे आहे. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 29 नोव्हेंबर 1949 रोजी संसदीय समितीसमोर केलेल्या अखेरच्या भाषणात देशाला तीन धोक्याच्या सूचना दिल्या. त्यापैकी ही पहिली सूचना होती. आजच्या घडीला देशातील वातावरण पाहता त्यांची दूरदृष्टी विशेष अधोरेखित होते!
 
 
5 जानेवारी 2020 रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये, चेहरा झाकलेल्या काही गुंडांनी हल्ला केला; ज्यामध्ये तेथील विद्यार्थी तसेच शिक्षकांनादेखील मारण्यात आले. घटना घडल्याचा अवकाश, इतक्यात जेएनयुमधील डावे विद्यार्थी संघटन तसेच त्यांच्या जोडीने काही प्रसारमाध्यमांनीदेखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केला असल्याची ओरड सुरू केली. अवघ्या काही काळातच संपूर्ण प्रसारमाध्यमांमध्ये अभाविप म्हणजे गुंडगिरी अशा प्रकारचे चित्र भडकपणे रंगवणे चालू झाले. घटनेच्या नंतर थोड्याच वेळात योगेंद्र यादव जैन जेएनयुच्या जवळ दाखल झाले. त्यावेळेस त्यांनाही धक्काबुक्की करण्याची घटना येथे घडली. यावरूनही तथाकथित बुद्धिवाद्यांनी प्रचंड गोंधळ घातला. वास्तविक पाहता विद्यापीठातील हल्लाच काय, यादव यांना झालेली धक्काबुक्की हीदेखील निषेधार्हच आणि त्याचा कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहीर निषेध व्हायलाच हवा. मात्र, तसे करत असतानाच कोणताही पुरावा हातात नसूनही एखाद्या संघटनेवर झालेल्या घटनेचे खापर फोडणे यामागे नेमके काय राजकारण असू शकते, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. 
 
deepika _1  H x
 
 
आपण प्रसारमाध्यमांकडून जेएनयु स्टुडंट्स युनियनने केलेले आरोप तर ऐकले, पाहिले, वाचले असतील. मात्र, याबाबत राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासच्या स्वानंद गांगल यांनी मांडलेली बाजूही आपल्यासमोर ठेवत आहे. ते म्हणतात;
‘‘फी वाढीविरोधात जेएनयुमधे आंदोलन सुरू आहे. तर या आंदोलनाचा भाग म्हणून डाव्या विद्यार्थी संघटनांनी नव्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी करू नये, अशी भूमिका डाव्या संघटनांची होती. पण, सामान्य विद्यार्थ्यांना नोंदणी करायची होती. लोकशाहीच्या गप्पा मारत दडपशाहीची भूमिका जगभर राबवणार्‍या डाव्यांनी इथेही तेच केले. Registration Counter चालूच नये यासाठी हर तर्‍हेने प्रयत्न केले. मग जेएनयु प्रशासनाने Online Registration ची सुविधा उपलब्ध करून दिली, तर डाव्या संघटनांनी सर्व्हर बंद ठेवली, इंटरनेट सेवेत व्यत्यय आणायचा प्रयत्न केला. या सर्व प्रकरणात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या बाजूने अभाविप ठामपणे उभी होती. आता या सगळ्यात डाव्यांना विद्यार्थी िंकवा विद्यार्थिहिताशी काही एक देणंघेणं नाहीये, त्यांना फक्त आंदोलन करून चर्चेत राहायचंय आणि आपला सरकारविरोधी अजेंडा रेटायचाय. म्हणूनच अभाविपने विद्यार्थ्यांची बाजू घेतल्यावर, या डाव्या गुंडांनी अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या वैचारिक गुलामीत असलेल्या माध्यमं, पत्रकार यांच्यामार्फत असे चित्र रंगवायचा प्रयत्न केला की, अभाविपने डाव्यांना मारहाण केली.’’
 
गांगल यांनी मांडलेल्या मताबाबत जेएनयुमध्ये शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांना विचारल्यावर त्यांनीही यामध्ये तथ्य असल्याची पुष्टी दिली. शिवाय या विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक इंद्राणी रॉय चौधरी यांनीही फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये या घटनाक्रमाला दुजोरा दिलेला आहे. जेएनयु स्टुडंट्स युनियनची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासहच अन्य 19 जणांवर याच आरोपांतर्गत दिल्ली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला असून, ही कारवाई स्वतः जेएनयु प्रशासनाने केली आहे. हल्ला होताच प्रसारमाध्यमांमध्ये काही व्हाट्स ॲप संवादांचे स्क्रीनशॉट फिरू लागले. या स्क्रीनशॉटमध्ये संघाशी संबंधित वा अभाविपचे कार्यकर्ते असलेल्या लोकांचे संभाषण सुरू असून या हल्ल्यामागे त्यांचा हात असावा, असा संशय निर्माण होण्याजोगे चित्र दिसत होते. याच स्क्रीनशॉट्सच्या आधारावर डाव्यांनी जोरदार कांगावा करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांच्या दुर्दैवाने माहिती-तंत्रज्ञानाच्या सध्याच्या युगात फार काळ खोटे बोलता येत नाही. त्यामुळेच अवघ्या काही तासांतच हे ग्रुप, हे प्रत्यक्षात जेएनयुमधील डाव्या संघटनांचे असून त्यांच्यामध्ये केवळ शब्दच्छल आणि नावे बदलून ढोंग रचण्यात आले असल्याचे समोर आले. फार कशाला? त्यांपैकी एक क्रमांक तर थेट 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने क्राउड फंडिंग करता वापरलेला क्रमांक निघाला! अखेरीस याबाबत स्पष्टीकरण देत तो एक वैयक्तिक सेवा पुरवठादार होता, असे कॉंग्रेसकडून अधिकृत रीत्या सांगण्यात येऊन या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
अपेक्षेनुसारच ही घटना घडताच चित्रपटसृष्टीतील डाव्या मेंदूच्या लोकांनी जेएनयुकडे तातडीने धाव घेतली. निषेधमोर्चे, निषेधाची पोस्टर्स, अराजकता पसरवणारी गाणी यांचे आधार घेत नेहमीप्रमाणेच आझादीचे नारे लावण्यात आले. हे सारे नाटक अगदी व्यवस्थित आखीवरेखीव पद्धतीने तीन-चार दिवस नियमितपणे चालू होते. आल्यागेल्या प्रत्येक वेळी या हल्ल्याची जबाबदारी अभाविपची असल्याचे आणि त्या आडून मोदी-शाह यांच्यावर टीका करण्याचे ‘समाजोपयोगी’ कार्य या लोकांकडून केले जात होते. अचानक एका दिवशी हिंदुरक्षा दल नामक कुठल्याशा संस्थेच्या संस्थापकाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि त्याबरोबर एका क्षणात कालपर्यंत अभाविपने हल्ला केल्याचे ठामपणे सांगणार्‍या लोकांकडूनच आता हा हल्ला हिंदुत्ववादी संघटना म्हणजेच संघ म्हणजेच भाजपाच्या लोकांनी केल्याचा आरडाओरडा सुरू झाला! अशा कुठल्याही संस्थेने हल्ला केला असल्यास त्यांचाही धिक्कारच. मात्र, लगेच त्याचा संबंध भाजपाशी जोडायचा असल्यास; त्याच न्यायाने उद्या कोणी कबीर कला मंत्र व माओवादी कम्युनिस्ट यांचा संबंध राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांच्याशी जोडला तर कोणाला राग येण्याचे कारण असू नये! जेएनयुमधील हल्ल्याचा निषेध करण्याकरता काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ’F*ck Hindutva’, ’ब्राह्मण भारत छोडो’ प्रशांत पासून ते अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरून दिलेल्या घोषणा होत्या मुंबईमध्ये निदर्शने चालू असताना तर एका तरुणीने चक्क ’फ्री कश्मीर’चा फलकदेखील तेथे झळकावला. ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल त्यांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. मात्र, या हल्ल्याच्या आडून सरकारला वेठीस धरण्याचे आणि त्यानिमित्ताने अराजकता माजवण्याचे षडयंत्रदेखील हाणून पाडले पाहिजे.
 
••