आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये करणार मोठा बदल!

    दिनांक :13-Jan-2020
लंडन,
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमधील संघांची संख्या १६ वरून २० होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद २०२३ ते ३१ या काळात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील संघांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे. क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी टी-२० हा प्रकार सर्वोत्तम असल्याचे आयसीसीचे मत आहे. त्यामुळेच वर्ल्ड कपमधील संघांची संख्या वाढवण्याचा आयसीसी गांभीर्याने विचार करत आहे. 
 
twenty_1  H x W
 
एका मीडिया रिपोटनुसार फुटबॉल आणि बास्केटबॉल प्रमाणे क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचा आयसीसीचा प्रयत्न आहे. टेलीग्राफ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार २०२३-३२ या काळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकात याचा विचार केला जाईल. या काळातील पहिला टी-२० वर्ल्ड कप २०२४मध्ये होणार आहे.
२०२४च्या टी-२० वर्ल्ड कपच्या प्रसारणाचे अधिकार देण्याआधी प्रत्येक वर्षी जागतिक पातळीवर एका स्पर्धेचे आयोजन करण्याचा आयसीसीचा विचार आहे. वर्ल्ड कपमध्ये संघांची संख्या वाढली तर दर्शकांची संख्या अधिक होईल आणि त्याचा फायदा होऊ शकले.
आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या मोठ्या स्पर्धेत अमेरिकेसारख्या देशाला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता अधिक आहे. आयसीसी अमेरिकेकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहते. अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसी अनेक प्रयत्न करत आहे. याशिवाय कॅनडा, जर्मनी, नेपाळ आणि नायझेरिया या देशांना देखील टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.