सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण

    दिनांक :13-Jan-2020
गुवाहाटी,
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या सत्रात सायकलिंग प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आश्वासक कामगिरी करताना रविवारी दोन सुवर्णपदके जिंकली. 21 वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये मधुरा वायकर आणि 17 वर्षांखालील मुलींच्या गटात पूजा दानोळे यांनी बाजी मारली. 

cycling _1  H x 
 
 
मधुराने 20 किलोमीटर शर्यतीत 30 मिनिटे 36.594 सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. मेघा जी. आणि सौम्या अंतापूर या कर्नाटकच्या खेळाडूंना अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पूजा 16 वर्षांखालील मुलींच्या 15 किलोमीटर शर्यतीत विजेती ठरली.
 
 
17 वर्षांखालील मुलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या आकाशसिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 10.15 सेकंद वेळ देणारा झारखंडचा सदानंदकुमार या गटातील वेगवान धावपटू ठरला. 21 वर्षांखालील मुलींची 100 मीटर धावण्याची शर्यत केरळच्या ॲन्सी सोजन हिने 12.21 सेकंद वेळेसह जिंकली. 12.38 सेकंद वेळ देणार्‍या महाराष्ट्राच्या कीर्ती भोईटेच्या वाट्याला कांस्यपदक आले. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये 21 वर्षांखालील मुलांच्या गटात ओंकार शिंदेने 68.70 गुणांसह महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. 72.30 गुण घेणारा उत्तरप्रदेशचा गौरवकुमार सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
 
 
अभय गुरवने 21 वर्षांखालील उंच उडीत आणि पूर्वा सावंतने 17 वर्षांखालील तिहेरी उडीत दबदबा राखताना महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले.
 
कबड्डीमध्ये महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या 21 वर्षांखालील कबड्डी संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी उत्तरप्रदेशाचे आव्हान 38-20 असे सहज संपुष्टात आणले. अन्य एका उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील मुलांना मात्र स्पर्धेत वर्चस्व राखल्यानंतरही अखेरीस राजस्थानकडून 51-55 असा पराभव पत्करावा लागला.
 
 
पंकज मोहितेचा व्यावसायिक अनुभव, अस्लम इनामदारच्या आक्रमक चढाया आणि सौरभ पाटीलच्या नेतृत्वाला बचावाची मिळालेली भक्कम तटबंदी महाराष्ट्राच्या वर्चस्वाचे वैशिष्ट्य ठरले. पहिल्या चढाईपासून अस्लमला लय गवसली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात त्याने आपल्या भोवती सामना फिरवला. करा किंवा मरा चढाईत त्याने कमालीचे सातत्य राखले. खोलवर चढाया करताना पंकजने मिळविलेले बोनस महाराष्ट्राचे गुण वाढवत होते. या सगळ्यांवर शुभम शिंदे, राजू काथोरे, अजित पाटील आणि वैभव गरजे यांच्या बचावाची भिंत अखेरपर्यंत भक्कम राहिली. त्यामुळेच मध्यंतराच्या 22-9 अशा मोठ्या आघाडीनंतर महाराष्ट्राच्या युवकांचा 38-20 असा मोठा विजय साकार झाला.
 
 
अंतिम फेरीत हरयाणाचे आव्हान
महाराष्ट्राच्या युवकांसमोर आता सुवर्णपदकासाठी हरयाणाचे आव्हान असेल. त्यांनी देखील रंगतदार झालेल्या सामन्यात चंदीगडचे आव्हान 39-39 अशा बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये 44-42 असे मोडून काढले.