सायना- सिंधूची इंडोनेशिया मास्टर्समध्ये झुंज

    दिनांक :13-Jan-2020

जकार्ता,
येथे उद्या मंगळवारपासून सुरू होत असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत भारताची ऑलिम्पिक विजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवालची गाठ पडण्याची शक्यता आहे. 

saina_1  H x W: 
 
 
यंदाच्या वर्षातील पहिली मलेशिया मास्टर्स स्पर्धेत या दोन्ही बॅडमिंटनपटूंनी दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघींची मोहीम उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली. त्यामुळे या स्पर्धेत दोघींनाही खेळाचा दर्जा वाढवावा लागणार आहे.
 
 
या स्पर्धेत सिंधू लवकर लय गाठण्याची अपेक्षा आहे. मलेशिया स्पर्धेत चिनी तैपेईची ताई त्झू यिंगने तिचा 16-21, 16-21 असा सहज पराभव केला, तर सायनाला तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावणार्‍या स्पेनच्या कॅरोलिना मरिनने 8-21, 7-21 ने एकतर्फी लढतीत पराभूत केले.
 
 
इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत सिंधूला पाचवे मानांकन देण्यात आले असून, पहिल्या फेरीत तिची लढत जपानच्या आया ओहोरीसोबत होणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या मलेशिया स्पर्धेत तिने ओहोरीचा दुसर्‍या फेरीत पराभव केला होता. सायनाला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत जपानच्या सायाका ताकाशाकीसोबत झुंजावे लागणार आहे. पहिल्या फेरीत दोन्ही भारतीय खेळाडू सहजपणे जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसर्‍या फेरीत त्या दोघी समारा-समोर येतील.
 
 
किदम्बी श्रीकांतची पहिल्या फेरीतील लढत इंडोनेशियाच्या शेसर हिरेन र्‍हुस्टॅव्हिटोसोबत होईल. मलेशिया स्पर्धेत चांगली कामगिरी करू न शकलेला साईप्रणितला पहिल्या फेरीत आठवे मानांकन मिळालेल्या चीनच्या शी यू कीसोबत झुंजावे लागणार आहे. मलेशियात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या केन्टो मोमोटाने पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणयला धूळ चारली होती. भारताच्या या दोन्ही खेळाडूंची पहिल्या फेरीतील लढत स्थानिक ॲन्थोनी सिनिसुका गिन्टिंग आणि जोनाथन ख्रिस्टीसोबत पडणार आहे.