अमृताने केलं १२ किलो वजन कमी

    दिनांक :13-Jan-2020
आलिया भट्टच्या राझी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेणाऱ्या अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने साऱ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. आता अमृता लवकरच मलंग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. या चौघांशिवाय अमृताचीही भूमिका लक्षवेधी असेल असं म्हटलं जात आहे.

amruta_1  H x W 
'मलंग' हा नव्या वर्षातला बहुचर्चित सिनेमा असून अमृतासाठीही हा चित्रपट महत्त्वाचा आहे. ७ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी अमृतानं तब्बल १२ किलो वजन कमी केलं. आता भूमिकेसाठी अमृताला १२ किलो वजन कमी का करावं लागलं हे तर तिची भूमिका पाहिल्यावरच कळेल. पण तरीही एखाद्या व्यक्तिरेखेसाठी कलाकारांकडून घेण्यात येणाऱ्या मेहनतीमुळेच त्यांच्या कामाचं चीझ होतं.
गेल्या काही वर्षांमध्ये अमृताने तिच्या कामातून प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पाडलं आहे. फक्त अभिनय पातळीवरच नाही तर फॅशन सेन्स आणि मादकतेच्या बाबतीतही ती अनेक अभिनेत्रींच्या पुढे आहे. इन्स्टाग्रामवरील तिचे फोटो पाहून तिच्या फॅशनसेन्सची झलक पाहायला मिळते.
अमृता खानविलकरच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती प्रियदर्शन जाधवच्या चोरीचा मामला या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमेही दिसतील. ३१ जानेवारी २०२० मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सचिन कुंडलकर दिग्दर्शित पॉण्डिचेरी सिनेमातही ती दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, सई ताम्हणकर, नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.