दिव्यांगांसाठी सिरोंचात आज शिबिर व मेळावा

    दिनांक :13-Jan-2020


handicaped people_1 

गडचिरोली,
दिव्यांग नागरिकांसाठी मंगळवार, 14 जानेवारी रोजी सिरोंचा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर अलीमको सेवाभावी संस्थेमार्फत महसूल विभाग, पंचायत समिती व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सिरोंचा तालुक्यात विविध प्रकारचे 1438 दिव्यांग नागरिकांची नोंद झालेली आहे. अलीमको सेवाभावी संस्थेच्या निकषानुसार साहित्य देण्यासाठी पात्र आहेत हे तपासण्यासाठी आणि लाभास पात्र असणार्‍यांचे कागदपत्र गोळा करण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून दिव्यांगाची तपासणी करुन निवड झालेल्या व्यक्तींना पुढील कालावधीत अवयव प्रत्यारोपण मोफतपणे करण्यात येणार आहे. दिव्यांगांना शिबिरात येताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, दोन पासपोर्ट आणणे आवश्यक आहे. तालुक्यातील सर्व दिव्यांग नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिरोंचाचे तहसीलदार आर. बी. जयवंत यांनी केले आहे.