'मेकअप'च्या सेटवर कोसळली भिंत

    दिनांक :13-Jan-2020
‘मेकअप’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि रिंकू राजगुरू ही नवीन जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अपघात घडला आणि त्यात चिन्मयला दुखापत झाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चिन्मयने याबद्दल सांगितले.
 
makeup_1  H x W
 
“आम्ही एक मोंटाज शूट करत होतो. तो मोंटाज बघण्यासाठी आम्ही मॉनिटर जवळ गेलो. तिथे एक भिंत आणि खांब होता. त्याला एका कमानीचा लूक दिला होता. मोंटाज बघताना मी त्या भिंतीला टेकून उभा होतो, अचानक ती भिंत कोसळली. त्यात मला आणि गणेश दादाला लागले. मला लागले आहे हे माझ्या लक्षात आले. मात्र गणेश दादाकडे लक्ष असल्यामुळे मी ही बाब एवढ्या गांभीर्याने घेतली नाही. थोड्या वेळाने माझ्या डोक्यातून रक्त येत असल्याचे मला कळले. सेटवरच्या लोकांनी आम्हा दोघांना दवाखान्यात नेले. माझ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली,” असे त्याने सांगितले.
‘मेकअप’ या चित्रपटात चिन्मय डॉक्टर निल ही भूमिका साकारत आहे. चित्रपटात तो डॉक्टरसोबतच एक मेकअपमॅनसुद्धा आहे. या चित्रपटानंतर चिन्मयची ‘टिक टॉक’ नावाची वेब सीरिज प्रदर्शनासाठी सज्ज आहे