धास्तावलेल्या कंपन्यांनी थांबविल्या दीपिकाच्या जाहिराती

    दिनांक :13-Jan-2020
‘टुकडे-टुकडे गँग’ला भेटल्याचा परिणाम
 
मुंबई,
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला आणखी एक धक्का बसला आहे. अनेक नामवंत ब्रॅण्ड्सनी दीपिकाच्या जाहिराती दोन आठवड्यांसाठी थांबविण्याचा किंवा  कमी दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिका ब्रिटानियाची गूड डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाईन्स आणि अॅक्सिस बँकेसह 23 ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती करते. दीपिकाची मालमत्ता 103 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी ती 10 कोटी रुपये तर जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते, असे म्हटले जाते.
जेएनयू मध्ये हिंसाचार माजविणार्‍या डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्यामुळे देशातील जनमानस अधिकच संतप्त झाले. जेएनयूमध्ये भेट देऊन दीपिकाने फुटीरवादी ‘टुकडे-टुकडे गँग’ला अप्रत्यक्षपणे बळच पुरविले असा संदेश देशभरात गेला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर 5 जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दीपिका आंदोलकांच्या भेटीसाठी जेएनयूमध्ये गेली होती. आपल्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन दिवस आधी म्हणजेच 7 जानेवारी रोजी दीपिका जेएनयू कॅम्पसमध्ये गेली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषची विचारपूस केली आणि काहीही न बोलता निघून गेली. आयषी घोषजवळ उभी राहिलेल्या दीपिकाचे अनेक फोटो समोर आले होते. मात्र, टुकडे टुकडे गँगच्या समूहात गेल्याने देशभर दीपिकावर टीकेची झोड उठली होती. अनेक मंत्री व राष्ट्रवादी विचारसरणीच्या नेटकर्‍यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.
 
 
dipika padukon 1_1 &
दीपिकाने आंदोलकांना दिलेल्या पाठिंब्यानंतर सोशल मीडियावर दीपिकाविरोधात एकच वादळ उठले. ‘बॉयकॉट दीपिका,’ ‘बॉयकॉट छपाक’ असे हॅशटॅग ट्रेण्ड केले. टुकडे-टुकडे गँगची अम्बॅसेडर अशीही उपमा दिली. त्याचा परिणाम बॉक्स ऑफीसवरही दिसला. अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाच्या तुलनेत ‘छपाक’ची कमाई खूप कमी झाल्याचे स्पष्ट झाले. ‘तानाजी’ने 62 कोटी कमावले, तर ‘छपाक’ने फक्त 19 कोटी रुपये.
 
राजकीय भूमिकेमुळे जाहिरातदारांची पंचाईत
दीपिकासारख्या मॉडेल्सच्या राजकीय भूमिकांमुळे जाहिरातदारांची मात्र पंचाईत झाली आहे. काही ब्रॅण्ड्सनी म्हटले आहे की, दीपिका असलेल्या आमच्या जाहिरातींचे प्रक्षेपण आम्ही कमी केले आहे. तर दुसरीकडे कलावंतांचे आर्थिक व्यवहार सांभाळणार्‍या व्यवस्थापकांनी सांगितले की, आगामी काळात जाहिरातींच्या करारात अशाप्रकारच्या अटी आणि शर्ती जोडल्या जातील, ज्यात कोणत्याही कलाकाराच्या राजकीय भूमिकेमुळे प्रशासनाच्या रोषाच्या जोखीमेचा उल्लेख असेल. सामान्यत: ब्रॅण्ड सावध पावले टाकतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या वादात अडकायचे नसते, असे आयपीजी मीडिया ब्रॅण्ड्सचे सीईओ शशी सिन्हा यांनी म्हटले आहे.
‘छपाक’ची कमाई 40 कोटींपेक्षा कमी
‘छपाक’ ने पहिल्या दोन दिवसात 11.67 कोटी रुपयांची कमाई केली होती. शुक्रवारी चित्रपटाने 4.77 कोटी रुपये कमावले होते. तर शनिवारी हा आकडा वाढून 6.90 कोटी रुपयांवर गेला. तर रविवारी चित्रपटाने 9 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाचा एकूण खर्च 40 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.
आमीर, शाहरुखलाही बसला होता फटका!
एखाद्या चित्रपट कलावंताच्या जाहिराती थांबविण्याची किंवा कमी दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. असहिष्णुतेच्या मुद्यावरून अभिनेता आमीर खानच्या जाहिरातीही बंद करण्यात आल्या होत्या. स्नॅपडीलसारख्या कंपनीला आमीर खानच्या वादाचा सर्वात मोठा फटका बसला. तर ‘माय नेम इज खान’ च्या प्रदर्शनाच्या वेळी शाहरुख खानच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूला धक्का लागला होता. तेव्हाही कंपन्यांनी वादात अडकलेल्या प्रत्येक स्टारपासून दूर राहणेच पसंत केले होते. पण जेव्हा प्रकरण थंड झाले तेव्हा जाहिराती पुन्हा एकदा सुरू झाल्या. त्यामुळे ब्रॅण्ड आणि स्टार्स दोघेही सध्या वाद शमण्याची प्रतीक्षा करत आहेत.