मागील दशक ठरले सर्वाधिक उष्ण

    दिनांक :13-Jan-2020
न्यू यॉर्क,
2019 हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे; तसेच गेल्या पाच वर्षांचा कालावधी हा इतिहासातील सर्वाधिक उष्ण कालावधी ठरला आहे. इतकेच नव्हे, तर मागील दशक हे पृथ्वीवरील सर्वाधिक उष्ण ठरले आहे. युरोपीय महासंघाच्या ‘कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’ने ही माहिती जाहीर केली आहे.
 

temperature1_1   
 
 
गेले वर्ष हे 1981 ते 2010 च्या कालावधीच्या तुलनेत 0.6 अंश सेल्सिअसने उष्ण होते, असा अहवाल या संस्थेने दिला आहे. ही संस्था जागतिक तापमानाची नोंद घेत असते. आमच्या निरीक्षणानुसार 2019 हे वर्ष दुसरे सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले आहे. या वर्षातील महिन्यांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास, या वर्षातील प्रत्येक महिन्याने विक्रम मोडले असल्याचे लक्षात येते, अशी माहिती संस्थेचे प्रमुख कार्लो बौनटेम्पो यांनी दिली.
 
 
गेल्या पाच वर्षांतील तापमान सरासरीच्या 2 ते 2.3 अंशाने अधिक होते. पॅरिसमध्ये झालेल्या हवामान परिषेदतील करारानुसार 2100 पर्यंत 2 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान ही जागतिक तापमानवाढ समजली जाते. हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण, हरितगृहातील वायूच्या उत्सर्जनांचे प्रमाण वाढत असल्यामुळे जागतिक तापमानवाढ होत आहे. कोपरनिकस संस्थेच्या अहवालानुसार 2019 मध्ये हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण 2.3 पार्ट्स पर मिलियनने (पीपीएम) वाढले आहे. 2018 च्या (2.9 पीपीएम) तुलनेत वाढीचा दर अधिक आहे. सध्याचे हवेतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण मानवी इतिहासातील सर्वाधिक आहे. त्यामुळे पॅरिस करारानुसार कार्बन उत्सर्जन वेगाने खाली आणणे गरजेचे आहे.