महाराष्ट्रातील 42 मंत्र्यांपैकी 41 कोट्याधीश

    दिनांक :13-Jan-2020
कॉंग्रेस नेत्याकडे 216 कोटींची मालमत्ता
 
मुंबई,
महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मालमत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांपैकी तब्बल 41 मंत्री हे कोट्यधीश आहेत. त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 21.9 कोटी रुपये आहे. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालामध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मालमत्तेबाबत खुलासा करण्यात आला आहे. या अहवालात मंत्र्यांच्या इतर माहितीच्या व्यतिरिक्त वित्तीय तसेच गुन्हेगारी पृष्ठभूमीबाबतही माहिती देण्यात आली आहे. कॉंग्रेसचे विश्वजित कदम हे सर्वात धनाढ्य मंत्री असल्याचा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. विश्वजित कदम यांची संपत्ती 216 कोटी आहे. 2014च्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या तुलनेत सध्याच्या मंत्रिमंडळातील 82 टक्के मंत्री कोट्यधीश आहेत. त्यांच्यापैकी तीन मंत्र्यांनी तर आपली सर्वाधिक मालमत्ता जाहीर केली आहे. यात कॉंग्रेसचे विश्वजित कदम यांचा समावेश आहे. विश्वजित कदम यांच्याकडे 216 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांच्याकडे 75 कोटींची तर राष्ट्रवादीचेच नेते राजेश टोपे यांच्याकडे 53 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोट्याधीश आहेत की नाही हे समजू शकले नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढल्यामुळे त्यांच्या मालमत्तेबाबत विश्लेषकांकडे माहिती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पहिल्यांदा निवडून आलेल्या एकमेव आमदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे कोट्यधीश नाहीत. अदिती तटकरे यांच्याकडे 39 लाख रुपयांची मालमत्ता आहे. असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या वार्षिक उत्पन्नाबाबतही खुलासा करण्यात आला आहे. अजित पवार यांचे उत्पन्न 3 कोटी 86 लाख आहे. तर अमित देशमुख यांचे 3 कोटी 26 लाख आणि विश्वजित कदम यांचे 2 कोटी 35 लाख रुपये उत्पन्न आहे.

mahavakas_1  H
विश्वजित कदम यांच्यावर सर्वाधिक कर्ज
42 मंत्र्यांपैकी 37 मंत्र्यांनी त्यांच्यावरील कर्जही जाहीर केले आहेत. या यादीत सर्वाधिक तीन मंत्री आहेत. यापैकी विश्वजित कदम यांच्यावर 121 कोटी, जितेंद्र आव्हाड यांच्यावर 37 कोटी आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर 22 कोटी रुपये कर्ज आहे. एकूण 18 मंत्री (43 टक्के) ज्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता जाहीर केली आहे. यानुसार 22 (52 टक्के) मंत्री पदवीधर आहेत. एकूण 17 (40 टक्के) मंत्र्यांचे वय 25 आणि 50 च्या दरम्यान आहे. तर 25 मंत्री (60 टक्के) 51 ते 80 वयाच्या दरम्यान आहेत. मंत्रिमंडळात केवळ 3 महिला आहेत.
27 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे खटले
सध्याच्या कॅबिनेटमध्ये 27 (64 टक्के) मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत. तर 18 मंत्री (43 टक्के) मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये 64 टक्के मंत्र्यांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तर 46 टक्के मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे खटले दाखल होते.