रामदेव बाबांनी दीपिकाला दिला 'हा' सल्ला

    दिनांक :14-Jan-2020
नवी दिल्ली,
जेएनयू विद्यापीठात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर, अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने विद्यापीठात जाऊन झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवत, तेथील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. यानंतर भाजपा नेत्यांसह अनेक संघटनांकडून तिच्यावर टीका करण्यात आली. तर, दुसरीकडे डाव्या आघाडीच्या संघटनांसह काँग्रेस व अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी तिचे या कृतीबद्दल समर्थनही केले आहे. यावरून सध्या जोरदार राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता योगगुरू रामदेव बाबा यांनी तिला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. 
  
deepika _1  H x
 
दीपिका पदुकोणला राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. तिने आपल्या देशाबद्दल अधिक जाणून घेतलं पाहिजे. केवळ ज्ञान मिळवल्यानंतरच तिने निर्णय घ्यावेत. मला असे वाटते की तिच्याकडे योग्य सल्ल्यासाठी स्वामी रामदेव सारखी व्यक्ती असावी, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.
 
 
सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए) चे समर्थन करताना त्यांनी म्हटले की, ज्या लोकांना सीएएचा फुल फॉर्म देखील माहिती नाही, ते याचा विरोध करत आहेत. अल्पसंख्यांक हिंदू हे भारतात येणार नाहीत, तर मग कुठं जाणार? एकाही अवैध नागरिकास भारतात राहू दिले नाही पाहिजे.
 
देशातील आर्थिक मंदीवरून बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींची पाठराखण केल्याचे दिसून आले. आर्थिक मंदीच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींनी डोळे मिटलेले नाही, सरकार आपल्या पातळीवर प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर जेएनयूमधील परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, जेएनयूमध्ये अभ्यास सोडून स्वातंत्र्याबद्दल घोषणाबाजी करणारे आपला वेळ वाया घालवत आहेत व देशाची प्रतिमा देखील खराब करत आहेत, यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. जेएनयूमध्ये कधी नेहरू तर कधी जिन्ना यांच्या नावावर स्वातंत्र्य मागितले जाते, यामुळे देशाचे नाव खराब होत आहे.