कांद्याची सरकारी किंमत २२ रुपये; मात्र, सामान्यांना मिळतोय ७० रुपये किलो

    दिनांक :14-Jan-2020
नवी दिल्ली,
देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडल्याच्या पार्श्वभूमीवर अठरा हजार टन कांदा आयात करण्यात आला असून तो सध्या २२ रुपये प्रति किलोने विकला जात आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, प्रत्यक्षात अद्यापही सर्वसामान्य ग्राहकांना ७० रुपये प्रति किलोनेच किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध आहे. 

ramukaka _1  H  
 
केंद्र सरकारच्यावतीने नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कमी किंमतीत कांदा विकला जात आहे. मात्र, तरीही सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या चढ्या भावातून अद्याप दिलासा मिळालेला नाही. दरम्यान पासवान म्हणाले, सरकारने आजपर्यंत १८ हजार टन कांदा आयात केला आहे. मात्र, अनेक प्रयत्न करुनही आत्तापर्यंत कवेळ २००० टन कांद्याचीच विक्री होऊ शकली आहे. कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार हरएक प्रयत्न करीत आहे. आसाम (१०,००० टन), महाराष्ट्र (३४८० टन), हरयाणा (३००० टन) आणि ओडिशा (१०० टन) या राज्यांनी कांद्यांची मागणी केली होती. मात्र, आता या राज्यांनी आयात करण्यात आलेला कांदा खरेदी करण्यास नकार दिल्याचेही पासवान यांनी सांगितले.
 
सन २०२० साठी कांद्याचा बफर स्टॉक वाढवून १ लाख टन करण्यात येणार असल्याचेही पासवान यांनी सांगितले आहे. सरकारच्यावतीने नाफेड कांद्याचा बफर स्टॉक तयार करते. नाफेड गेल्या मार्चपासून जुलै महिन्यापर्यंत रब्बीच्या मोसमात तयार होणारा कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे.
कांद्याच्या प्रमुख उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने तसेच कांदा पिकाला उशीर झाल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. हेच कारण होते की, कांद्याच्या किंमतीत सातत्याने मोठी तेजी पहायला मिळाली. कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त कांद्याचे उत्पादन घेतले जाते.