मकरविलक्कू उत्सवासाठी शबरीमलै सज्ज

    दिनांक :14-Jan-2020
-अयप्पा मंदिर परिसरात चोख बंदोबस्त
शबरीमलै,
शबरीमलैतील दोन महिन्यांच्या वार्षिक भाविक हंगामाची सांगता उद्या बुधवारी मकरविलक्कू उत्सवाने होत आहे. यासाठी स्वामी अय्यप्पा मंदिरात जय्यत तयारी सुरू असून, यासाठी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात भाविकांची उसळणारी गर्दी लक्षात घेता, गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात पोलिस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि जलद प्रतिसाद दलाचे (आरआरएफ) जवान मोठ्या प्रमाणात तैनात केल्याची माहिती या मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या त्रावणकोर देवासम्‌ मंडळाने (टीडीबी) दिली.
 
 

pti_1  H x W: 0
 
रविवारपासून भाविकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मंदिराच्या भोवती विविध पदांवरील 200 पोलिस कर्मचारी ठेण्यात आले आहेत. ते गर्दीचे व्यवस्थापन करतील, असे टीडीबीने जारी केलेल्या निवेदनात सांगितले. मंदिराची मुख्य इमारत असलेल्या सन्नीधनम्‌ परिसरात 15 पोलिस उपअधीक्षक आणि 36 मंडळ निरीक्षकांसह 1400 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 70 सदस्यांचे बॉम्बशोधक व नाशक पथक आणि 20 सदस्यांची दूरसंचार शाखा देखील सज्ज ठेवण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.
 
 
 
मकरविलक्कू दर्शनानंतर पवित्र टेकडीवरून परतणार्‍या भाविकांचे व्यवस्थापन करण्यासाठी, तसेच भाविकांच्या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी पोलिस, एनडीआरएफ, आरआरएफ आणि अग्निशमन विभागाला सज्ज ठेवण्यात आले. दरम्यान, मंदिराचे कार्यकारी अधिकार्‍यांच्या नेतृत्वातील चमू मंदिर मार्गावरील पवित्र स्थळ सरमकुठी येथे बुधवारी सायंकाळी स्वामी अय्यप्पा यांचे पवित्र दागिने- तिरुवभरणम्‌ची मिरवणूक काढणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.