अध्यक्ष पदाच्या विभाजनाची मुदत वाढवली-सेबीचा निर्णय

    दिनांक :14-Jan-2020
मुंबई,
कॉर्पोरेट कंपन्यांमधील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदांचे विभाजन करून त्यांची भूमिका देखील वेगवेगळी करण्याबाबतची मुदत भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) दोन वर्षांनी वाढवली आहे. देशातील कित्येक आघाडीच्या कंपन्या आणि उद्योजकांनी केलेला विरोध आणि तीव्र स्वरूपाच्या लॉिंबगमुळे ही मुदत वाढवण्यात आली. पद आणि भूमिकेच्या विभाजनासाठी 1 एप्रिल 2020 मुदत देण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
sebi_1  H x W:
 
हा नियम लागू करण्यासाठी आता 1 एप्रिल 2022 ही मुदत असेल, असे भांडवल बाजार नियंत्रकांनी जाहीर केले आहे. मात्र, मुदतवाढीसाठी कोणतेही अधिकृत कारण सेबीने दिलेले नाही. मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी सेबीला विविध कामगार संघटनांसह कित्येकांची निवेदने प्राप्त झाली होती. सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कॉर्पोरेट कंपन्यांवर अतिरिक्त जबाबदारी टाकली जाऊ नये, असा निर्णय सेबीने घेतल्याची माहिती या नियंत्रक संस्थेतील अधिकार्‍यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.
 
 
 
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद परस्परांशी संलग्न असू नये या अटीवर कॉर्पोरेट क्षेत्र आणि औद्योगिक संघटनांचा सर्वांत मोठा आक्षेप आहे. ही अट काळजीचा विषय असल्याचे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले. पदांचे विभाजन करण्यामागे केवळ कंपनीच्या नव्हे, तर भागीदार आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे हित सुरक्षित ठेवण्याची भूमिका आहे, यात दुमत नाही. विविध कंपन्यांमधील या पदावरील व्यक्तींची जबाबदारी आणि दायित्व या माध्यमातून सुनिश्चित केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
या नव्या नियमामुळे केवळ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकच नव्हे, तर कंपनीच्या प्रवर्तकांमध्येही भीती पसरली आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या (फिक्की) सदस्याने सांगितले. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पद परस्परांशी संलग्न राहणार नाही, अशी कोणतीही शिफारस कोटक समितीने केलेली नाही, असे फिक्कीचे माजी अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी सांगितले. भारतातील 70 ते 80 टक्के कंपन्या प्रवर्तक आधारित असतात. अशा प्रकारचा कोणताही नियम जगात इतरत्र नाही. आमच्या मुलांना व्यवसाय शिकवण्यासाठी आठ ते दहा वर्षे लागतात. वारसाहक्क नियोजनासाठी हा नियम अडचण ठरत आहे, असे त्यांनी सांगितले.