राजस्थाननंतर आता मध्यप्रदेशात बालमृत्यूचे सत्र

    दिनांक :14-Jan-2020
शहडोल,
राजस्थाननंतर आता कॉंगे्रसचीच सत्ता असलेल्या मध्यप्रदेशातही नवजात बालकांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. या राज्याच्या शहडोल येथील शासकीय रुग्णालयात मागील चोवीस तासात सहा बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री तुलसी सिलवत यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही सर्व बालके एक दिवस ते एक महिना या कालावधीत जन्माला आली होती. 13 व 14 जानेवारीच्या रात्री या बालकांचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पांडे यांनी सांगितले.
 
 
child_1  H x W:
 
या बालकांचा मृत नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या सर्व बालकांना जन्म झाल्यानंतर अतिशय गंभीर स्थितीत येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, असे ते म्हणाले. डॉक्टर िंकवा रुग्णालयातील अन्य कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा या बालकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आहे का, या दिशेनेही आम्ही तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
याच महिन्याच्या सुरुवातीला कॉंगे्रसची सत्ता असलेल्या राजस्थानच्या कोटा आणि जोधपूर येथे दोनशेपेक्षा जास्त नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या राज्यात बालमृत्यूचे सत्र अजूनही सुरू असताना, आता मध्यप्रदेशातही ते सुरू झाले आहे.