गृहमंत्री करणार मूकबधिर ‘वर्षा’चे कन्यादान

    दिनांक :14-Jan-2020
 
sakshagandh_1  
 
वझ्झर येथील बालगृहाला भेट
 
अमरावती,
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवार, 14 जानेवारी रोजी अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद मूकबधिर बेवारस बालगृहाला भेट दिली व या बालगृहात राहून मोठी झालेली मूकबधिर मुलगी वर्षा हिचे कन्यादान आपण स्वतः करणार असल्याचे जाहीर केले.
गृहमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी या बालगृहात जाऊन तेथील मुलांची भेट घेतली व विचारपूस केली. यावेळी त्यांनी तेथील मुलांना स्वतः चुलीवर चहा तयार करून पाजला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आश्रमातील मूकबधिर मुलगी वर्षा हिचा तेथील मुलगा समीर याच्याशी विवाह ठरला असून, वर्षाचे कन्यादान गृहमंत्र्यांनी करावे, असे पापळकर यांनी सांगताच गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ सकारात्मकता दर्शवत नागपूरला हा विवाह केला जाईल व आपण वर्षाचे कन्यादान करू, असे सांगितले. या वेळी वर्षा व समीर या दोहोंचे आज साक्षगंध होत असल्याचे सांगून त्यांनी पुष्पहार घालून दोहोंचेही अभिनंदन केले.
वर्षा ही मुलगी एक दिवसाची असताना नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली होती. या आश्रमात तिचे पालनपोषण झाले. ती आता 22 वर्षांची आहे. पापळकर बाबा हे मतिमंद मूकबधिर बेवारस मुलांसाठी अत्यंत मोलाचे कार्य करीत आहेत, असेही ते यावेळी गृहमंत्रीम्हणाले. या आश्रमात 123 विकलांग मुले आहेत. वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की नियमानुसार या विद्यार्थ्यांना बालगृहात राहता येत नाही. तथापि, हा नियम या मुलांसाठी जाचक असल्याने त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे पापळकर यांनी सांगितले. या मागणीबाबत आपण सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले.