हिमस्खलनात पाच जवान शहीद

    दिनांक :14-Jan-2020
- पाच नागरिकांचाही मृत्यू
श्रीनगर,
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने आज मंगळवारी सकाळी नियंत्रण रेषेवरील तीन वेगवेगळ्या ठिकाणी हिमस्खलन झाले. यात लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाचे पाच जवान शहीद, तर पाच नागरिकांचा मृत्यू झाला.
 
 
land_1  H x W:
 
माचील सेक्टरमधील लष्करी तळावर मोठे हिमकडे कोसळले. त्याखाली पाच जवान दबल्या गेले. घटनेची माहिती मिळताच, जवान आणि अधिकार्‍यांनी तातडीने मदत व बचाव मोहीम हाती घेतली. यातील एका जवानाला वाचविण्यात त्यांना यश आले; मात्र चार जवानांचे मृतदेहच हाती आले, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. नियंत्रण रेषेवरील नोगाम सेक्टरमध्येही हिमस्खलन झाले. या हिमकड्याखाली सीमा सुरक्षा दलाचे सात जवान दबले गेले. त्यातील सहा जवानांना वाचविण्यात आले, तर एक जवान शहीद झाला.
 
 
 
दुसरी घटना गंदेरबाल जिल्ह्यातील गगनगिर भागातील एका गावात घडली. या गावातील एका घरावर हिमकडे कोसळले. त्याखाली नऊ जण दबले गेले. यातील चार जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले, तर पाच नागरिकांचा मृत्यू झाला, असे सूत्रांनी सांगितले. या गावातील हिमस्खलनाच्या घटनेत अनेक घरांचेही नुकसान झाले. लष्करी जवान आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बचावकार्य हाती घेतले आहे. बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेजच्या दासी बक्तूर गावातही हिमस्खलन झाले. तेथील तीन घरे बर्फाच्या ढिगार्‍याखाली दबली.