ऋषी कपूर यांच्या बहिणीचं निधन

    दिनांक :14-Jan-2020
नवी दिल्ली,
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांची बहीण आणि अमिताभ बच्चन यांच्या मुलीची श्वेता नंदाची सासू रितू नंदा यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्या ७१ वर्षांच्या होत्या. ऋषी यांची मुलगी रिद्धीमा कपूरने आत्याच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत दिली.
 
nanda_1  H x W:
 
रिद्धिमाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'आजपर्यंत ज्या लोकांना मी भेटले त्यातील सर्वात दयाळू आणि सज्जन तुम्ही होता. आता ते तुमच्यासारखं कोणी घडवत नाहीत. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.' रिद्धिमाच्या या पोस्टवर एकता कपूरने कमेन्ट करत 'हृदयाला भिडणारा हा मेसेज होता' असं म्हटलं.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात श्वेता बच्चन- नंदाचे सासरे रंजन नंदा यांचं निधन झालं होतं. रंजन यांच्या मृत्यूनंतरही रिद्धिमाने सोशल मीडियावर एक भावनिक मेसेज लिहितं म्हटलं होतं की, 'तुम्ही होता.. आहात आणि नेहमी लेजेन्ड राहणार. एवढं भरभरून प्रेम देण्यासाठी धन्यवाद.'
ऋषी कपूर यांची बहीण रितू नंदा या रंजन नंदाच्या पत्नी असून श्वेता बच्चन यांची सासू होती. निखिल नंदा यांच्याशी श्वेताचं लग्न झालं. निखील हे जगप्रसिद्ध एस्कॉर्ट्स लिमिटेड या इंजीनिअरिंग कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. रितू नंदा या स्वतः आंत्रप्रुनर होत्या आणि लाइफ इन्शुरन्स व्यवसायाशी निगडित होत्या.
रणधीर कपूर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रितू या कर्करोगाशी लढा देत असल्याचं सांगितलं होतं. दिल्लीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. २०१३ मध्ये ऋतू यांना कर्करोग झाल्याचं कळलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.