इसिसच्या कृष्णछायेत दक्षिण आशिया

    दिनांक :14-Jan-2020
आंतरराष्ट्रीय
वसंत गणेश काणे
दक्षिण आशियाच्या प्रचलित व्याख्येनुसार अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका हे आठ देश येतात. आज या सर्वच देशांवर इसिसची कृष्णछाया पडलेली आहे. विशेष नोंद घेण्याचा मुद्दा हा आहे की, त्यात एरवी दहशतवाद्यांचा अड्डा असलेला पाकिस्तानही आहे.
1.अफगाणिस्तान : सुमारे 3.8 कोटी लोकसंख्येचे अफगाणिस्तान हे इस्लामिक रिपब्लिक असून यातील 90 टक्के सुन्नी असून 9 .5 टक्के शिया आहेत. उरलेल्या 0.5 टक्क्यांमध्ये झोराष्ट्रीयन, हिंदू, शीख, ख्रिश्चन आहेत. तालिबानी दहशतवाद्यांचा प्रभाव देशातील फार मोठ्या भूभागावर आहे. याशिवाय सुन्नींचे शियांवर व अहमदियांवर सतत आक्रमण सुरू असते.
2. बांग्लादेश : सुमारे 16 कोटी लोकसंख्येचे बांगलादेश हेही इस्लामिक रिपब्लिक असून 91 टक्के मुस्लिम असून 8 टक्के हिंदू, 0.6 टक्के बौद्ध, 0.3 टक्के ख्रिश्चन व 0.1 टक्के अन्य आहेत. नुसते इस्लामिक स्टेट म्हणवून घेणे पुरेसे नाही तर बांगलादेशाचा कारभार शरियतनुसार चालावा, असा दहशतवाद्यांचा आग्रह आहे.
3. भूतान : सुमारे 8 लक्ष लोकसंख्येचे भूतान हे बौद्ध धर्मीय राष्ट्र असून यात 72 टक्के बौद्ध असून 24 टक्के हिंदू , 3 टक्के बॉन (प्राणी, वनस्पती व भू-जलादी सृष्टीत चैतन्य पाहणारे), 1.0 टक्के ख्रिश्चन, 0.5 टक्के मुस्लिम व उरलेले अन्य धर्मीय आहेत. खून, खंडणी व अपहरणाच्या घटना भूतानमध्ये वाढत आहेत. इंटरनेटचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याच्या घटना निदर्शनाला आल्या आहेत.
4. भारत : सुमारे 130 कोटी लोकसंख्येचे भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून 80 टक्के हिंदू असून 14 टक्के मुस्लिम, 1.7 टक्के शीख, 2.3 टक्के ख्रिश्चन व 0.7 टक्के बौद्ध आहेत. 2014 नंतर दहशतवादी हल्ले करणार्‍यांना पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना अपूर्व यश मिळत आहे. पण दहशतवादाचे सावट कायम आहे.
5. मालदीव : सुमारे 5 लाख लोकसंख्येचे मालदीव हे इस्लामिक राष्ट्र आहे. यात 98.5 टक्के मुस्लिम व 1.5 टक्क्यांमध्ये अन्य धर्मीयही आहेत. दहशतवादी कारवाया करणार्‍यांचे प्रमाण मालदीवमध्ये वाढत असून 2017 नंतर अनेकांना अटक करण्यात आली आहे.
6. नेपाळ : सुमारे 3 कोटी लोकसंख्येचे नेपाळ हे आज धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून 81 टक्के हिंदू , 4.4 टक्के मुस्लिम, 3.1 टक्के किरंत/किरात, 1.4 टक्के ख्रिश्चन, 9.0 टक्के बौद्ध व उरलेले अन्य धर्मीय आहेत. भारतात प्रवेश करण्याचा राजमार्ग नेपाळमधून जातो, असे दहशतवादी उघडरीत्या सांगत असतात.
7. पाकिस्तान : सुमारे 21 कोटी लोकसंख्येचे पाकिस्तान हे इस्लामिक रिपब्लिक आहे. यातील जनसंख्येत सुमारे 96 टक्के मुस्लिम असून मुस्लिमात सुन्नी 98 टक्के व शिया 2 टक्के आहेत. उरलेल्या 4 टक्क्यांमध्ये हिंदू 2 टक्के, शीख 0.5 टक्के, ख्रिश्चन 1.5 टक्के आहेत. दहशतवाद्यांना साह्य, सहकार्य, प्रशिक्षण आणि आसरा देणारे प्रथम क्रमांकाचे राष्ट्र म्हणून पाकिस्तानचा दुर्लौकिक आहे.
8. श्रीलंका : सुमारे 2 कोटी 16 लाख लोकसंख्या असलेले लोकशाही, समाजवादी, प्रजासत्ताक राष्ट्र आहे. श्रीलंकेत सुमारे 70 टक्के बौद्ध, 13 टक्के हिंदू , 10 टक्के सुन्नी मुस्लिम, 6 टक्के रोमन कॅथोलिक ख्रिश्चन आणि इतर जेमतेम 1 टक्का आहे. ख्रिश्चन प्रार्थनास्थळांवर झालेला दहशतवादी हल्ला कायमस्वरूपी लक्षात राहील, असा आहे.
सच्छिद्र, अस्पष्ट व विवादित सीमा
दक्षिण आशियात दहशतवाद्यांशिवाय इतरही अतिरेकी गट सक्रिय आहेत. काही वंशभिन्नतेमुळे आहेत. काही साम्यवादी विचारसरणीचे आहेत. काही धार्मिक कट्टरतेमुळे आहेत, तर काही पंथोपपंथातील भेदामुळे आहेत. या विस्तीर्ण प्रदेशात काही जंगली व पर्वतीय भूभाग असे आहेत की, शासन नावाची व्यवस्थाच नाही. अशा प्रदेशात दहशतवादी आपले तळ ठोकतात, छावण्या उभारतात, नवीन भरती झालेल्यांचे बौद्धिक, भावनिक व सैनिकी प्रशिक्षण वर्ग चालवीत असतात. पाकिस्तानसारखे देश तर अशांना उघडपणे आसरा, पािंठबा देतात व रसदही पुरवितात. अनेक देशांमधल्या सीमाही अस्पष्ट व विवादित आहेत. त्यांना सच्छिद्र सीमाच म्हटले पाहिजे. येथे निगराणी ठेवतो म्हटले तरी कठीण जाते. गुप्तहेर खाती सुद्धा या प्रदेशात अपेक्षेप्रमाणे काम करू शकत नाहीत.

sampadakiy 14 jan_1 
 
भरभराटीला आलेला अफू उद्योग
तालिबान्यांचा एकाधिकार असलेला अफू हा उद्योग त्यांची आर्थिक तरतूद करीत असतो. तालिबानी आपल्या उत्पन्नाचा 60 टक्के हिस्सा या व्यापारातून मिळवितात. एखाद्या राज्याचे असावे तसे हे उत्पन्न असते. त्यांच्या उत्पन्नाचा हा कधीही न आटणारा स्रोत आहे. अल-कायदा, जेशे महंमद, लष्कर-ए-तोयबा यासारख्यांचे तालिबान्यांशी हिश्शावाट्यांवरून संघर्षही होत असतात. यातून मिळणारा पैसा भारताविरुद्ध वापरला जातो. भारताविरुद्ध प्रचारयुद्ध सतत चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसाही या मार्गाने येत असतो.
 
इसिसमधील भरती भारतावरील हल्ल्यासाठी
आशियातून इसिसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरती झाली आहे. मध्यपूर्वेतील संघर्ष पुष्कळसा थांबला आहे. त्यामुळे हे तसे रिकामेच आहेत. हे आपल्या कामात निष्णात आहेत. मोठ्या हल्ल्याची जोखीम त्यांच्यावर टाकण्यात कोणताही धोका नाही, असा विश्वास त्यांच्या धुरिणांच्या मनात निर्माण झाला आहे. पूर्वीप्रमाणे भारत, बांगलादेश, श्रीलंका एवढेच देश नव्हेत तर एकवेळचा त्यांचा पोिंषदा असलेला पाकिस्तानही आता त्यांच्या निशाण्यावर आहे/असणार आहे.
दहशतवादाचा सामना कसा करणार?
झालेला हल्ला यशस्वीरीत्या परतवण्यापेक्षा हल्ला होणारच नाही, अशी व्यवस्था करणे व तशी तयारी ठेवणे केव्हाही चांगले. दहशतवाद्यांच्या आतल्या गोटातल्या बातम्या मिळवण्यासाठी गुप्तहेर खाते तरबेज असले पाहिजे. तसे ते आपले आहे. स्थानिक स्तरावर पािंठबा देणारी श्रृंखला हुडकून तिचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. कारण, असा पूरक पािंठबा असेल तरच हल्ला यशस्वी होत असतो. स्थानिक पातळीवर पािंठबा देण्याची प्रवृत्ती कमी होते आहे. कारण, हल्ला करणारे करून जातात व देशवासीयांची नाराजी आम्हाला सहन करावी लागते, असे आता स्थानिक पाठीराख्यांना कळू लागले आहे. तरीही एखाद्या देशांतर्गत प्रकरणी िंकवा प्रश्नाबाबत जेव्हा अवाजवी क्षोभ निर्माण होत असेल तर दहशतवादी हल्यासाठी ही अनुकूलतम वेळ असते. ही शक्यता गृहीत धरून वेळीच काळजी घेतली पाहिजे. लोकांना बंधनांचे महत्त्व व आवश्यकता समजावून दिली पाहिजे. म्हणजे स्थानिक पातळीवर असंतोष निर्माण होणार नाही. निरनिराळ्या सुरक्षा यंत्रणात सहकार्य, सहयोग आणि समन्वय हे व्यवस्थापनाचे सूत्र असले पाहिजे. त्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन झाला असून तो समन्वयाचे व सहयोगाचे काम करीत असतो. त्यामुळे हल्लेखोरांचे अनेक बेत वेळीच उघडकीलाही आले आहेत. थोपवलेल्या हल्ल्याचे वृत्तमूल्य कमी असते पण झालेल्या हल्ल्याचे वृत्तमूल्य जास्त असते. पण यावर उपाय नाही/ नसतोही. तरीही दिल्लीत व बंगळुरूत तीन दहशतवाद्यांना अटक करून सुरक्षा यंत्रणेने फार मोठी भूमिका पार पाडली आहे, याची दखल प्रसार माध्यमांनी घेतली, हे एक सुचिन्ह आहे.
बोभाटा होऊ न देता निगराणी
इंटरनेट, समाज मध्यमांची व्यासपीठे यासारखी संपर्काची माध्यमे एरवी वरदान असली तरी यावर घातलेल्या वाजवी बंधनांचा सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर विनाकारण बोभाटा होत असतो. अशावेळी घातक कारवायांवर योग्य निगराणी ठेवली पाहिजे, त्यांना सुरवातीलाच थोपवता आले पाहिजे, व शेवटी त्या निष्प्रभ करता आल्या पाहिजेत. अशाप्रकारे पायरी पायरीने जात राष्ट्रीय सुरक्षा जपता आली पाहिजे. हे सर्व कायद्याच्या चौकटीत राहून करणे ही सुद्धा तारेवरची कसरत असते. तसेच बंधने केवळ असामाजिक तत्त्वांविरुद्धच वापरली जावीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची िंकवा नेट निष्पक्षतेची गळचेपी होऊ नये, हेही महत्त्वाचे असते. तसेच विकृत प्रचाराचा भंडाफोड तात्काळ होणे, हाच खरा पर्यायी उपाय आहे, हे लक्षात ठेवले तर दहशतवादी प्रचारयंत्रणेची विश्वसनीयताच नष्ट होईल. अफवा पसरवणे जेवढे सोपे आहे तेवढेच तिचे निवारण करणे कठीण असते. संभाव्य अपप्रचाराची चाहुल लागताच तीव्रतेने व तातडीने उपाययोजना करता आली पाहिजे. रचनात्मक कार्य करणार्‍यांचा भर यावर असावा, हे उत्तम.
9422804430