शिवसेनेऐवजी ठाकरे सेना करा

    दिनांक :14-Jan-2020
- महाशिवआघाडीतून ‘शिव’ शब्द का काढला
- उदयनराजे भोसले यांचा घणाघाती हल्ला
पुणे,
शिवसेना स्थापन केली, तेव्हा वंशजांना विचारले होते का? सत्तेसाठी तुम्ही महाशिवआघाडी स्थापन केली आणि नंतर कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसच्या अटींपुढे झुकत या आघाडीतून ‘शिव’ हे नाव का काढले, अशा प्रश्नांचा भडिमार करीत, सातार्‍याचे माजी खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेना, कॉंग्रेस व राकॉंसह राज्य सरकारवर चौफेर टीका केली. जयभगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाल्यानंतर उदयनराजे यांनी आज मंगळवारी पत्रपरिषदेत प्रथमच आपली भूमिका मांडली.
 
 
uday_1  H x W:
 
शिवाजी महाराजांच्या नावाचे फक्त राजकारणच सुरू आहे. शिवसेना या नावाला आम्ही कधी आक्षेप घेतला नाही, पण शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारले होते का, असा सवाल करताना, त्यांनी मुंबईतील शिवसेना भवनाचा फोटो दाखविला आणि यात बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र कुठे आणि शिवाजी महाराजांचे छायाचित्र कुठे आहे, अशी विचारणा त्यांनी केली. शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील आमदार गजभिये मुजरा करीत असतानाचे छायाचित्र दाखवत, याचे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
 
 
 
बटाटावड्याला शिववडा नाव देण्यावरून व तीन शिवजयंती साजरी करण्यावरून उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिववडा हे नाव का दिले? तीन शिवजयंती का साजरी करता? महाराजांची अजून किती मानहानी करणार आहात, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावे. नाव बदलल्यानंतर राज्यातील किती तरुण तुमच्यासोबत राहतात, हे मला पाहायचे आहे, असे थेट आव्हान त्यांनी यावेळी दिले.
 
 
 
महाराजांचे नाव लावले, तर त्या हिशेबाने वागा, अन्यथा त्यांचे नावच घेऊ नका. गलिच्छ राजकारणाचे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करू नका. आता मी फक्त समज देत आहे, नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. मी जनतेला सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराज फक्त आमच्या कुटुंबाचे नाहीत, ते तुमचेही आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्या विचारांचे वारस आहात, असेही त्यांनी सांगितले.
 
 
जाणता राजा फक्त छत्रपतीच!
महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का, असा प्रश्न अनेकदा पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी करणे चुकीचे आहे. महाराजांसोबत तुलना होईल, इतकी उंची जगात कुणाचीही नाही. जाणता राजा फक्त छत्रपतीच आहेत, असे सांगत त्यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला. आरक्षणासारखे विषय प्रलंबित का ठेवले, याचे उत्तर स्वत:ला जाणता राजा म्हणवणार्‍यांनी द्यायला हवे, असेही ते म्हणाले.
 
 
 
जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही इतर कुणालाही ही उपाधी देता, तेव्हा विचार करायला हवा. ज्यांना ही उपाधी लावली, त्यांचाही मी निषेध करतो, असे सांगताना ते म्हणाले की, भोसले घराण्यात आम्ही जन्माला आलो, याचा सार्थ अभिमान आहे. टीका करणार्‍यांपेक्षा आम्ही नक्कीच जास्त पुण्य केले आहे, म्हणूनच या घराण्यात आमचा जन्म झाला. असे असतानाही मी कधीच या घराण्याच्या नावाचा दुरुपयोग केला नाही.