बिनपैशाचे मुद्दे अन्‌ कवडीमोल तमाशा!

    दिनांक :15-Jan-2020
वादाचा बागुलबोवा, मग तो सीएए प्रकरणावरून असो, जयभगवान गोयल यांनी त्यांच्या पुस्तकातून नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी केलेल्या तुलनेवरून असो, की मग छपाक-तानाजी या चित्रपटांवरून वादळ उठविण्याचा प्रयत्न असो, सार्‍याच बाबी, फालतू मुद्यांवरून उकरून काढलेल्या क्षुल्लक वादातून पराचा कावळा करणार्‍या आहेत. कदाचित, जे लोक हा वाद उत्पन्न करताहेत, त्यांनाही हे सारे विषय कवडीमोलाचे असल्याची पूर्ण जाणीव असावी. पण, हा देश अशाच कुठल्याशा बिनपैशाच्या मुद्यावरूनच पेटवला जाऊ शकतो, याची खात्री बाळगून बसलेल्यांना कुठे कशाची काळजी वाहायची आहे? त्यांना तर निवडणुकीच्या मुहूर्तावर लोकहिताच्या होळ्या पेटवतच लोकशाहीचा शिमगा करायचा आहे. आता पुढ्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक तर आहेच सर्वांच्या नजरेपुढे. तोवर या असल्या शिमग्याच्या भरवशावरच स्वत:चा राजकीय प्रवास टिकून राहण्याची आस असलेल्यांकडून असले बिनबुडाचे मुद्दे आणि त्यासंदर्भातील काही लोकांचे बेगडी प्रेमच येत्या काळात उफाळून येणार आहे. या देशात सर्वांच्या लेखी स्वस्त, सहज मूर्ख बनवता येईल, केव्हाही लुटता येईल असा घटक म्हणजे इथला सामान्य माणूस. शेवटी काय, ‘एका’ मताएवढीच त्याची िंकमत! तेवढी किंमत वसूल करण्यासाठी त्याला वाट्‌टेल तसे नागवणे सुरू आहे सगळीकडे. सरळ सरळ निवडणुकी िंजकता येत नाही म्हटल्यावर कॉंग्रेस, राष्ट्रवादीपासून तर डाव्या, अतिडाव्या, भाजपाविरोधक म्हणवून घेणार्‍या तमाम लोकांकडून याच निलाजर्‍या पद्धतीचा वापर सुरू झाला आहे अलीकडे. दुर्दैवाने त्याचे प्रमाणही दिवसागणिक वाढते आहे. कधी त्याला मोदी विरोधाची किनार असते, कधी अमित शाह विरोधाचा गंध, तर कधी संघ विरोधाचा मुलामाही त्याला दिला जातो. तेवढ्यानेही हुरूप येतो बघा इथे लोकांना तमाशा मांडायला.


agralekh 15 jan_1 &n

तानाजी कुठे आणि छपाक नावाचा चित्रपट कुठे, कशाचा कशाशी काही संबंध नाही. दोन्हीच्या निर्मात्यांना सामाजिक प्रश्न, इतिहासाशी काही घेणेदेणे नाही. लोकांनी मारलेल्या उड्यांच्या माध्यमातून गल्ले केवळ चित्रपट निर्मात्यांचे भरले जाणार आहेत. रस्त्यावरच्या वादात मात्र जनता उतरली आहे. पदरचा पैसा खर्च करून हा चूक, तो बरोबर ठरवू लागली आहे. चित्रपटांचे विषय आणि त्याचे महत्त्व बाजूला ठेवून दोहोंमध्ये स्पर्धा लावण्याच्या क्लृप्त्या केवळ चित्रपटाचा धंदा वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे, एवढी एक बाब ध्यानात आली तरी प्रश्न निकाली निघेल. पण, प्रश्न असे निकाली काढणे इथे हवे आहे कुणाला? भट्‌ट्या पेटवत ठेवल्या नाही तर खिचडी शिजेल कशी कुणाची? त्यामुळे वाद निर्माण करणे, तो पेटवत ठेवणे आणि काळ मागे पडला तरी त्याची धग कायम राहील याची काळजी वाहणे सुरू आहे. लोकांच्या मनात विविध विषयांवर भ्रम तयार करून त्याची व्यवस्थित जपणूक करण्याचे कारस्थान हा याच कटाचा भाग आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणमधून जे लोक 2014 पर्यंत भारतात आलेले आहेत, त्या हिंदू , बौद्ध, शीख, खिश्चन, जैनांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यासाठी सीएएचे विधेयक तयार करण्यात आले होते. याचा अर्थ, जे लोक आधीच या देशात आलेले आहेत, त्यातील 2014 पर्यंतच्या लोकांना नागरिकत्व बहाल करण्याचा सरकारचा मानस आहे, हे स्पष्ट आहे. पण, काही व्हिडीओ क्लिप्स तयार करून, त्या व्हायरल करून चित्र असे काही निर्माण केले जात आहे की बस्स! आता मोदी अन्‌ शाह निमंत्रणंच घेऊन निघाले आहेत या देशांमध्ये अन्‌ आवतन देणार आहेत तिथल्या लोकांना, की या भारतात! मग या निमंत्रितांना जागा कुठे देणार, खायला काय घालणार, त्यांना रोजगार कसा देणार, अशा वेगवेगळ्या प्रश्नांनीही भंडावून सोडले आहे काही लोकांना. त्यावरून अकारण भ्रम पसरविण्याचा प्रयत्न चाललाय्‌ त्यांचा. कुणीतरी मोदींची छत्रपतींशी तुलना केली, तर तीळपापड झाला काही लोकांचा. मग ज्यांची तुलना झाली त्यांच्या नावाने शिमगा आरंभला गेला. कालपर्यंत कुणाला ‘जाणता राजा’ म्हटलं गेलं, कुणाला दुर्गा म्हटलं गेलं, कुणी स्वत:चे फोटो जिजाऊंसोबत छापून घेतले, कुणी शाहिस्तेखानाची बोटं कापतानाचे फोटो काढून स्वत:ची हौस भागवून घेतली, कुणी इंदिरांची थेट भारताशी तुलना केली होती, यासंबंधी इतिहासाचा विसर पडलेल्यांनी यंदाच्या प्रकरणात मांडलेला उच्छाद पुरेसा बोलका ठरावा.

शरद पवार कुठून झाले हो जाणते राजे? ‘इंदिरा इज इंडिया’ म्हटलं गेलं तेव्हा नाही भावना दुखावल्या कुणाच्याच? का? ती तुलना इंदिरा गांधी अन्‌ शरद पवारांची होती म्हणून? अन्‌ यंदा मोदींचे नाव पुढे आले तर पोटं दुखू लागलीच सर्वांचीच? लगेच विरोधाची राळ उडवली जाऊ लागली? यातून अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा कांगावाही नाही बघा कुठेच! एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीएएला समर्थन देणारी पत्रं लिहिली तर राज्याच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी लागलीच आडकाठी आणली. विद्यार्थ्यांनी राजकारणात पडण्याची गरज नसल्याची मल्लिनाथी करायलाही विसरल्या नाहीत त्या. मग जेएनयूमधले विद्यार्थी जो िंधगाणा घालताहेत, ते काय आहे, याचे उत्तर देऊ शकतील वर्षाताई? की राजकारणात फक्त त्यांनी पडायचे अन्‌ यांनी नाही, अशी काही लक्ष्मणरेषा आखली आहे त्यांच्या सरकारने? पण करता काय, एकदा राजकारणातली नीचातली नीच पातळी गाठण्याचा चंग बांधला, समाजमन कलुषित करण्याचा निर्धार केला, देश पेटविण्याचा अन्‌ सर्वदूर विखार पखरण्याचा विडा उचलला की, बर्‍या-वाईटाच्या संकेतांना अर्थ उरतोच कुठे? मग मोदींची हिटरलशी तुलना केली की, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा स्तोम माजवला जातो अन्‌ छत्रपतींशी तुलना झाली की मात्र ती खपत नाही कुणालाच. बरं, शिवरायांचे कर्तृत्व एवढे मोठे की, त्यांच्या पायाशी बसण्यासही पात्र ठरणार नाही कदाचित कुणीच. ही बाब तर सर्वमान्य आहे. पण, तरीही त्यांच्याशी शरद पवारांची तुलना झाली तर कुणालाच आक्षेप नसतो, पण मोदींची तुलना झाली त्या प्रतिमेशी की मात्र विरोधाचा आगडोंब उसळतो, याचा राजकारणाच्या पलीकडे कुठला अर्थ गवसू शकेल सांगा? एरवी, पुरस्कार वापसीचा घोळ घालत मिरवणार्‍या साहित्यिक, विचारवंतांना यातील एक तुलना योग्य वाटते आणि दुसर्‍यात मात्र मोदींचे नाव असल्याने त्याबाबत त्यांचा तीव्र आक्षेप असतो, हे न कळण्याइतके खुळे कोण आहे इथे? पण, असले वाद निर्माण करून राजकारणाच्या पोळ्याही भाजता येतात, भाजपा-संघाविरुद्ध गरळही ओकता येते, समाजात दुहीही माजवता येते, सामान्य नागरिकांमध्ये भ्रमही पसरविता येतो... एक मुस्लिम माणूस केरळातल्या एका मशिदीत सीएएच्या बाजूने बोलू लागला तर केवढा गहजब झाला. तिथल्या ‘सहिष्णू’ लोकांनी पाऽऽर झोडपून काढले त्याला! मशिदीच्या बाहेरचा डाव्या-कॉंग्रेसी लोकांचा जमाव तर काय त्याहून ‘सहिष्णू.’ परिणाम हा की, कुणाच्याच तोंडून विरोधाचा, निषेधाचा चकार शब्द निघत नाहीय अजून. जेएनयूमध्ये कायदा राखायला पोलिस घुसले तर पोटशूळ उठला होता याच दीडशहाण्यांना. पण हकरत नाही. त्यांच्या राजकारणाची रीत ही ‘अशीच’ आहे. पुढेही ती अशीच सुरू राहणार आहे- निवडणुका पार पडेपर्यंत...