आर्थिक मरगळीचे कारण ओळखून उपचार हवा!

    दिनांक :15-Jan-2020
अर्थ

डॉ. भरत झुनझुनवाला
देशातील गुंतवणूक वाढवायला हवी आणि त्यासाठी नव्या उद्योगांची मागणी वाढायला हवी, सिमेंट आणि पोलादाची मागणी वाढावी व बेरोजगारांना रोजगार मिळायला हवा, असे देशातील प्रख्यात अर्थशास्त्री के. सुब्रमण्यम्‌ यांनी फार आधीच स्पष्ट केले होते. मात्र, हा उपाय आजारी व्यक्तीला तूप खाण्यास देण्यासारखा ठरेल. अर्थव्यवस्थाच जर आजारी असेल, तर गुंतवणूक वाढविल्यास मोठी समस्या निर्माण होईल. जसे, एखाद्या आजारी माणसाला भूकच लागत नसेल, तर त्याला तूप दिल्यास, त्याची प्रकृती आणखी बिघडेल, त्यात सुधारणा होणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर इतकी मरगळ येण्याचे नेमके काय कारण आहे, याचा अभ्यास आधी व्हायला हवा आणि त्यानुसार उपाययोजना करायला हवी.

गुंतवणूक आणि विक्रीचे चांगले आणि वाईट असे दोन्ही चक्र सुरू होऊ शकते. यातील प्रक्रिया काहीशी अशी आहे. गृहित धरा की, एका उद्योगपतीने कापडाची गिरणी सुरू करण्यासाठी गुंतवणूक केली, त्याच्या उत्पादनात वाढही झाली. कपड्यांचे उत्पादन वाढल्याने, दुकानांमध्येही कपड्यांची उपलब्धता वाढली. यामुळे कामगारांना वेतनही मिळू लागले. कामगारांनी याच वेतनातून जर दुकानात असलेल्या कपड्यांची खरेदी केली, तर दुकानदार कापड गिरणीकडे नव्या कपड्यांची मागणी नोंदवेल आणि दुकानदाराची मागणी पूर्ण करण्याकरिता गिरणीत नव्याने कपड्यांचे उत्पादन केले जाईल किंवा कपड्यांचा पुरवठा करण्यासाठी तो उद्योगपती नवीन गिरणी सुरू करेल आणि त्यासाठी पुन्हा नव्याने गुंतवणूक करेल.
या चक्राला आपण दुसर्‍या भाषेतही समजू शकतो. जर या चक्राला आपण खरेदीपासून सुरू केले, तर असे समजू या की, दुकानात कापड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. लोकांनी कपड्यांची खरेदी केली. दुकानदाराने कापड गिरणीकडे नव्याने मागणी नोंदवली आणि गिरणी मालकाने नवीन कारखाना सुरू केला. या कारखान्यात त्याने आणखी लोकांना रोजगार दिला. कामगारांना चांगला पगार मिळाला आणि या पैशातून त्यांनी पुन्हा कपड्यांची खरेदी केली. या प्रक्रियेत आपण पाहात आहो की, गुंतवणूक आणि खरेदीच्या या चांगल्या चक्राला आपण गुंतवणूक किंवा खरेदीतून सुरू करू शकतो. हा प्रकार अंडा आधी की कोंबडी, यासारखा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आधी समजून घ्यायला हवे.


sampadakiy 15 jan_1 

प्रख्यात अर्थशास्त्री के. सुब्रमण्यम्‌ यांच्या मते, या चांगल्या चक्राची कडी गुंतवणुकीतच आहे. मलाही असे वाटते की, यावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. समजा, एखाद्या उद्योगपतीने कापड गिरणीत गुंतवणूक केली आणि कपड्यांचे उत्पादन वाढविले. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळून, त्यांना चांगले वेतनही मिळाले. आता चित्र असे आहे की, दुकानात कपडे उपलब्ध आहेत आणि कामगारांच्या हातात पगाराचे पैसे आहेत. आता प्रश्न असा आहे की, हे कामगार आपल्या हातातील पैशातून कपडे खरेदी करतील की, तो पैसा बँकेत मुदत ठेवींच्या स्वरूपात जमा करतील किंवा त्या पैशातून सोन्याचे दागिने खरेदी करतील. या दोन्ही गोष्टींचा प्रभाव एकदम वेगळा आहे. जर कामगाराने पगाराच्या पैशातून कपडे खरेदी केले, तर दुकानातील कपड्याची विक्री होईल आणि दुकानदार कापड गिरणी मालकाकडे नव्या कपड्यांची मागणी नोंदवेल. ती पूर्ण करण्यासाठी तो मालक कपड्याची नवीन गिरणी सुरू करेल. या प्रकारे गुंतवणूक आणि खरेदीचे चांगले चक्र सुरू होईल. मात्र, यात दुसरी शक्यता अशीही आहे की, कापड गिरणी सुरू करण्यात आल्याने उत्पादन झाले आणि रोजगार मिळून कामगारांना वेतन मिळाले. या पगारातून जर कामगारांनी सोन्याचे दागिने खरेदी केले व ते आपल्या तिजोरीत ठेवले, तर दुकानातील कपड्यांची विक्री कदापि होणार नाही. दुकानात कपडे तसेच पडून राहतील. अशा स्थितीत दुकानदार गिरणी मालकाकडे नव्या कापडांची नोंदणी करू शकणार नाही आणि गिरणी मालकही नव्या गिरणीसाठी नवी गुंतवणूक करू शकणार नाही. यातून गुंतवणूक आणि खरेदीचे चांगले चक्र प्रस्थापित होणार नाही.

आपल्या मुख्य अर्थशास्त्रींच्या विचारात पेच असा आहे की, पगाराचा वापर खरेदीसाठीच होणे मुळीच आवश्यक नाही. वेतनाचा उपयोग कोणत्या पद्धतीने होतो, या निर्णयावरच गुंतवणूक आणि खरेदीचे चांगले चक्र अवलंबून असते. हीच गोष्ट आपण दुसर्‍या पद्धतीनेही समजून घेऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला तेव्हाच तुपाचे पदार्थ दिले जाऊ शकते, जेव्हा त्याला भूक लागलेली असते. जर व्यक्ती आजारी असेल आणि त्याला भूकच लागत नसेल, तर अशा स्थितीत त्याला तुपाचे पदार्थ दिल्यास, त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतील. त्याच प्रकारे, जर कामगारांमध्ये खरेदी करण्याची क्षमता नसेल, तर अशा स्थितीत गुंतवणूक केल्यास अर्थव्यवस्थेची प्रकृती आणखी खालावेल आणि करण्यात आलेली गुंतवणूक व्यर्थ ठरेल.

आपण या चक्राला खरेदीच्या दृष्टीने पाहिले, तर ही अनिश्चितता दिसणार नाही. जसे, दुकानात कपडे ठेवण्यात आले आहेत आणि खरेदीदारांनी त्या कपड्यांची खरेदी केली. या स्थितीत दुकानदार कापड गिरणी मालकाकडे नक्कीच नव्या कपड्यांची मागणी नोंदवेल. तो उद्योगपती नव्याने गुंतवणूक करेल आणि नवीन गिरणी स्थापन करेल. यात पुन्हा नवे कामगार मिळतील आणि त्यांना पगारही मिळेल. या वेतनातून कामगार पुन्हा कपड्यांची खरेदी करतील. या चांगल्या चक्रात ग्राहकांकडून कपड्यांची खरेदी केली जाणार की नाही, ही अनिश्चितताच संपलेली असेल. पण, या चांगल्या चक्रातही दुसरी अनिश्चितता निर्माण होऊ शकते. ती अशी की, समजा, ग्राहकाने दुकानातून कपडे खरेदी केले. दुकानदाराने कापड गिरणी मालकाकडे नव्याने मागणी नोंदवेल. मात्र, उद्योगपतीने नवीन गुंतवणूक केली नाही. अशा स्थितीत गुंतवणूक आणि खरेदीचे चांगले चक्र संपुष्टात येत असते. तथापि, सहसा असे होत नाही. जेव्हा नव्या मालाची नोंदणी प्राप्त होत असते, त्यावेळी उद्योगपती त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नव्याने गुंतवणूक करीत असतोच. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे, म्हैसूर येथील एसडीएम इन्स्टिट्यूटतर्फे 1992 पासून 2015 पर्यंतच्या काळात, देशातील आर्थिक विकासाचा अभ्यास करण्यात आला. यात असे आढळून आले की, आर्थिक विकासात 26 टक्के योगदान खरेदी क्षेत्राचे आणि फक्त चार टक्के योगदान गुंतवणुकीचे राहिले आहे. दुसर्‍या अभ्यासांवरूनही खरेदी क्षेत्राचे आर्थिक विकासात फार मोठे योगदान राहिले असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या सर्व बाबींवर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आणि गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यापेक्षा, बाजारात मालाची खरेदी का होत नाही, याचा अभ्यास करायला हवा. कर्मचारी वर्ग आपल्या पगाराचा वापर खरेदीसाठी का करीत नाही, त्याच्या मनात नेमकी काय भीती आहे. तो आपल्या पगारातील बहुतांश भाग सोन्याची खरेदी किंवा बँकेत मुदत ठेवीच्या रूपात का ठेवू इच्छितो, या कारणांचा शोध घ्यायलाच हवा. आपण जेव्हा या सुचक्रातील अडचणी दूर करून, तेव्हाच देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत येईल. तात्पर्य इतकेच की, गुंतवणूक आणि खरेदीच्या चांगल्या चक्रात खरेदी सर्वांत समोर आणि गुंतवणूक मागे चालत असते.