हे विश्वाचे आंगण...!

    दिनांक :02-Jan-2020
ऊन-सावली
गिरीश प्रभुणे  
 
इंदरला मी प्रथम पाहिलं गुरुजींच्या कला आश्रमात. आदिलाबादला. तेलंगणात. विविध प्रकारच्या घंटा, हत्ती, घोडे. दिवे झळाळणारे पितळी. नाजुक नक्षीकाम केलेले. जवळच पहाडात त्यांची वस्ती. रामपूरजवळ. इंदरवनात.
गुरुजी- रवींद्र शर्मा म्हणाले, ‘‘देखो, ये कैसे सीखा है? कहां से शुरुवात हुई? कोई किताब नहीं। पाठशाला नहीं। कोई बाहर का गुरु नहीं। ये अपना भारत है। वो अंदरसे आता है यह प्रवाह।’’
 
 
मी दुसर्‍या दिवशी रामपूरला इंदरवनात गेलो. रस्ता खराब. विरळ अरण्यात रामपूर वसलंय्‌. चारी बाजूने पहाड. त्यातच भातशेती. ही गोंड समाजाची वस्ती. दीड-दोनशे घरं. काही तेलुगू. काही गोंड. गोंडी भाषा हे बोलतात. यांना तेलुगू-हिंदीपण येतं. इथं कुणीच शाळेत नाही जात. शेजारच्या गावात पाच किमीवर शाळा. वीस-बावीस घरात हा कलाकुसरीचा उद्योग चालतो. घरं बरीचसी कुडाची. वर कंजाळ. कौलं-पत्रे. कौलं खापराची-पन्हाळीची. इथं पूर्वी गोंड कुंभार होता. तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत तो कौलं बनवायचा. नंतर मंगलोरी कौलं आली. आता टीनचा-टाटाचा पत्रा आला. गावागावातले एक एक उद्योग बंद पडत चालले. 
 
shind _1  H x W
 
 
इंदरचं घर दगड-विटांचं. वर पत्रे. समोरची पडवी कुडाची. वर कंजाळ टाकलेलं. सर्व अंगणात बसून काम करीत होते. कुणी मातीचे हत्ती, घोडे, तर कुणी विविध आकाराचे दिवे बनवीत होते. सर्व जण मिळून एक मोठं पितळी झुंबर बनवीत होते. सहा थरांचं. छताला टांगल्यावर अडीच फूट लोंबणारं. वेगवेगळ्या आकारांचे चौकोन गोल. त्याच्यावर नाजुक फुलं-झाडं, माणसं, पक्षी, सूर्य-चंद्र. एक नवं विश्व मी पाहात होतो. हाताची बोटे आणि डोळे एकरूप झाले होते. मातीला आकार देत होतं. तर कुणी मेणाच्या नाजुक मऊ धाग्यानं त्या मातीच्या आकाराला सजवीत होतं. मातीच्या आकारत तो प्राणी कोण आहे कळत नव्हतं. मेणाच्या नक्षीनं तो एकदम डौलदार झाला. हत्ती-घोडे-हरणं प्रत्यक्षातली खूप पाहिली होती. पण यांनी त्यांना एक वेगळंच सौंदर्य दिलं होतं. त्यांच्या लकबी हालचाली अधिक मोहक बनल्या होत्या. हत्ती सोंड हलवत आता सलाम करणार! घोडा एकदम वेग घेणार! आणि हरीण तर कुठल्याही क्षणाला मान वळवून आपल्या नजरेला नजर देणार! व्वा...!
 
 
इंदरच्या घरातले सर्वच जण सहजतेनं मेणाला आकार देत होते. पहिल्या थराला हत्ती लोंबणार होते. दुसर्‍या थराला घोडे... तिसर्‍या थराला पोपट... चौथ्या थराला स्त्रिया, पुरुष... आणि शेवटी एक मोर होता. या मोराचं काम जी करीत होती तिला पाहताच मला पु. शि. रेग्यांच्या सावित्रीतली लच्छीच आठवली. ‘मोर हवा तर स्वत: मोर बनलेली’ मी येईन परत, पण तू नाचत असली पाहिजेस. आणि लच्छी नाचतच राहिली. तो इतक्यात येईल म्हणून... भान हरपून... इथं या वनात ही लच्छी मोराला आकार देत होती, सजवीत होती. पिसारा फुललेला मोर. प्रत्यक्षातला मोर तर सौंदर्यानं बहरलेलाच असतो. पण हिचा मोर अत्यंत नाजुक... पिसारा एका बिंदुतून फुलत जाणारा. नाजुक रेषांनी बनलेला पिसारा. त्याचा डौल! मान एका बाजूला झुकलेली. कमानदार, वळण घेत गेलेली. एक पाय दुमडून नाचाच्या पवित्र्यात. मानेवरची लव चमचमणारी विविधरंगी... मऊशार... त्याचा पिसारा सुद्धा काहीसा एका बाजूला झुकलेला. सारंच अद्भुत... अलौकिक...! केवळ दोन बोटांच्या हालचालींनी तो मोर पिसारा फुलवून आपलं सर्व कौशल्य सुंदरता पणाला लावून डौलदारपणे नाचत होता. सर्वांगातून सौंदर्य खुलून आलं होतं.
 
 
त्या वस्तीतल्या अंगणात सर्व कलाकार नि:शब्दपणे एका अजोड अप्रतिम कलाकृतीला जन्माला घालत होते. ‘हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण...’ यांचं विश्व वेगळे... यांचं आंगण आगळे! एका आडरानातल्या या अंगणातलं हे सर्वस्व ओतून भान हरपून जगणं हे केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी निश्चितच नाही.
 
 
 
इंदरची ही वस्ती म्हणजे एक कवडसा होता. भारताच्या ज्ञानाचा, कलेच्या वारसाचा... हे कलेचे चालते-बोलते वारसदार. यांच्या कलेची कदर कोण करणार? इंदर सांगत होता. याला दहा किलो पितळ लागेल. तीनशे रुपये किलोप्रमाणे तीन हजार पितळेचे. चार किलो मेण. ते इथूनच जंगलातून आणले. राळ पाव किलो बाजारातून आणली. वीस रुपयांची. वारुळाची माती इथलीच. वनातली. कोळसा दोनशे रुपयांचा. सारं मिळून चार हजार रुपयांपर्यंत जाईल. याला गिर्‍हाईक कोण?... माहीत नाही. कोण घेईल, कितीला घेईल? काहीच माहिती नाही. वीस-पंचवीस ते एक लाखांपर्यंतसुद्धा जाईल. कलेची जाण असणारे देतात मागेल ती किंमत...
 
 
आम्ही हे समाधानासाठी करतो. या कलेत खूप शिकण्यासारखं असतं. हाताने प्रत्यक्ष करूनच हे शिकता येतं. निरीक्षणाने हे आत्मसात होतं. सगळ्यांना हे जमतंच असं नाही. अशा वेळी आमचे नातेवाईक येतात पंचक्रोशीतले. इथं आपल्या मुलाबाळांसहित आलेत. ऐसी चीज बार बार नहीं बनती। सीखना है तो जहां बनती है वहां जाना पडता है। दोन-चार वर्षात अशी एखादी वस्तू बनते. आम्ही बनवतो. तसं केलं नाही तर कला विरून जाईल. हरपून जाईल...
 
 
इंदर जे सांगत होता ते भारताच्या शिक्षण व्यवस्थेतलं मर्म होतं. पूर्वी या कलेला राजाश्रय होता. अगदी कालपरवापर्यंत सातारजवळच्या औंध संस्थानचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधींनी आपल्या छोट्याशा संस्थानात अखेरच्या काळात हे कार्य केलं होतं. भारताच्या अनेक चित्रकार-कलाकार कारागिरांना प्रोत्साहन दिलं होतं. रस्ते, वीज, पाणी-दुष्काळावर सरकारने उपाय काढले पाहिजेतच. पण ज्यामुळे भारत ‘भारत’ म्हणून ओळखला जातो, तेही करायला हवं. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. अत्यंत क्रूरपणे आपली पकड घट्‌ट केली. त्याचवेळी त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट, एशियाटिक लायब्ररीही उभारली. साधं रेल्वे स्टेशन मुंबईचं सीएसटी. कोपरान्‌ कोपरा कलेनं बहरून गेलाय! दीड-दोनशे वर्षांपूर्वी केवढी भव्यता...!
 
 
 
रवींद्र शर्मा गुरुजी म्हणत, ‘इंदूजैसे आचार्य-शास्त्री-शिक्षक हर गाव में होंगे, हर स्कूल में होंगे तो भारत फिरसे सभी क्षेत्रों में खड़ा हो जायेगा...’
माझ्या डोळ्यांसमोर मोहोनजोदारोची नर्तिकेची मूर्ती उभी राहिली. हजारो वर्षांपूर्वी सिंधूच्या पुरात गाडलं गेलेलं शहर. त्यातली ती सुबक धातूची मूर्ती बनविणारे हात हेच तर नाहीत! साक्षात्‌ आठ-दहा हजार वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांशी नातं सांगणारी ही वस्ती.
 
 
 
रात्री भोजनानंतर इंदूनं भट्‌टी पेटवली. भट्‌टी मधोमध आणि चहूबाजूंनी मातीचे साचे उभे ठेवण्यात आले. पहाटेपर्यंत मुशीत वितळवलं जाणारं पितळ साच्यातून ओतलं गेलं. प्रथम जे बुजुर्ग अनुभवी आहेत त्यांनी मोठ मोठ्या साच्यातील ओतकाम केलं. ओतकामापूर्वी सारे साचे भट्‌टीतून भाजून काढले गेले. त्यातलं मेण जळून साचे भक्कम तयार झाले होते.
 
 
दहा-बारा वर्षांच्या मुलं-मुलीसुद्धा पळीत तप्त रस साच्यातून ओतत होत्या. अगदी सहजतेनं. कुणाचा कुणालाही धक्का न लागता. कुणी कुणावर खेकसत नव्हतं. ओरडत नव्हतं. सर्व कामे नि:शब्दपणे होत होती. सर्व कामे अगदी नेमून दिल्याप्रमाणे! सार्‍या सृष्टीचक्राशी ती वस्ती तादात्म्य पावली होती. भट्‌टीच्या उजेडात सर्वांचे चेहरे चमकत होते. पहाटे-पहाटे सर्व साचे मोकळे झाले. गेल्या आठ-पंधरा दिवसांचे चीज झाले होते. झळाळणार्‍या वस्तू आकाशातल्या तार्‍यांप्रमाणे चमचमत होत्या. आता एक एक वस्तू जणू जिवंत झाली होती. सारं कौशल्य त्यातून सौंदर्यरूपाने ओसंडत होतं. तो मोर तर डौलानं थुई थुई नाचतच होता. सर्वांच्या चेहर्‍यावर एक समाधानाचं तेज पसरलं होतं. अख्खी रात्र सर्वांनी जागून काढली होती. आपण आपल्या हातांनी निर्माण केलेलं ते विश्व त्या अंगणात अवतरलं होतं.
 
 
पुढे सात-आठ वर्षे व्यस्ततेमुळे मला इंदूकडे जाता नव्हतं आलं. यावर्षी ठरवून गेलो.
रस्ता उत्तम झाला होता. गावात व वस्तीतही सिमेंटचे रस्ते झाले होते. छपरांवरचं कंजाळ गवत-खापराची कौलं जाऊन टाटाचे टीनाचे पत्रे आले होते. इंदरवनातल्या पहाडांवर तुरळक वनश्री दिसत होती. पूर्वीचा निळासावळ्या धुक्यानं वेढलेला डोंगर उघडा बोडका झाला होता. मनात धस्सं होत होतं.
सारी वस्ती निर्मनुष्य वाटत होती. अंगणात गवत वाढून वाळून गेलं होतं. वस्तीतलं चैतन्य हरपलं होतं. मी इंदूकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत खंत होती.
 
 
‘‘इंदू, क्या हो गया... ये?’’
‘‘क्या बताऊं... वो... देखो... पाठशाला. गावमें पाठशाला आ गयी. बच्चे स्कूल जाने लगे. पूरे बस्ती के बच्चे आश्रमशालामें पढने गये तो ये आंगन-बस्ती सुनी सुनी हो गयी। बस्ती में सिर्फ मेरी ही भट्‌टी लगती है। मैंने अपने बच्चों को घरमें ही रखा हैं। लेकिन कबतक रखू? वो भी जायेंगे। शिक्षा का कानून आया है नं...’’
शिक्षणानं बस्ती, घर उजाड झाल्याचं चित्र अस्वस्थ करणारं होतं. शिक्षण तर प्रत्येकाला मिळायलाच हवं. मूल लहान वयातच दूर झाल्यामुळे परंपरागत कला, ज्ञान लुप्त झालं. आधुनिक शिक्षणानं काहीतरी हरवलंय्‌. बीजाचा वृक्ष होऊन बहरून यायला हवा, त्या ऐवजी हा रमणीय वृक्ष डेरेदार वृक्ष खुरटला. खुजा होऊ लागला.
  
 
इंदरच्या जवळचं ज्ञान. या वस्तीतलं ज्ञान. ही संपन्न पंचक्रोशी. एकमेकांशी नाते संबंधानं ज्ञानाच्या देवाणघेवाणीत संपन्न स्वावलंबी होती. इथला गोंड-कोरकू-भिल्ल-पटेला-कोलाम ज्ञानसंपन्न होते. समृद्ध होते. पूर्वी अरण्यातच आश्रम होते. ज्ञानाचा प्रकाश इथूनच येत असे. आता एक एक करत वस्ती, गाव ओस पडत चालली. विज्ञानावर आधारित परस्परपूरक जीवनशैली सोडून आम्ही कुठे चाललो आहोत काहीच कळेना.
 
  
इंदू... निराश नको होऊस. पुन: शाळा तुझ्या अंगणात येईल. आधुनिक तर व्हायलाच हवं. आजही तुझ्या या कलेला बाजारात, जगात मान आहे. मोल आहे. इथंच आपण आश्रम सुरू करू. तुझ्या वस्तीत. पुन: परततील सर्व...
‘‘हो सकता है... ऐसा...?’’ इंदू अविश्वासानं उद्गारला.
‘‘क्यों नही... होगा... अवश्य होगा... सारी व्यवस्था यही करेंगे...’’ मी म्हणालो.
हे विश्वाचे आंगण आम्हां दिले आहे आंदण... खरंच, हे अंगण फुलायला हवे. शेणाचा सडा-रांगोळी. ती भट्‌टी. ती कुशल सरसर चालणारी बोटं... सारं सारं परत यायला हवं... या झाडांवरची पाखरं परतायला हवीत.
या चिमण्यांनो, परत फिरा रे... घराकडे अपुल्या...
इंदूनं एव्हापर्यंत अंगण साफ करत भट्‌टी लिंपायला घेतली होती...
9766325082