रणवीरशिवाय दीपिका साजरा करणार वाढदिवस

    दिनांक :02-Jan-2020
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 'छपाक' हा चित्रपट ॲसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारीत आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सगळ्या व्यग्र वेळापत्रकात एक आनंदाची गोष्ट म्हणजे ५ जानेवारीला दीपिका तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करणार आहे.
 
 
deepika_1  H x
 
दरवर्षी दीपिका तिचा वाढदिवस रणवीर सिंगसोबत साजरा करते. पण यावेळी तिने काही वेगळेच प्लॅन आखले आहेत. या वाढदिवसाला मोठी पार्टी देण्याऐवजी तो दिवस ॲसिड हल्ला पीडित तरुणींसोबत साजरा करण्याचे तिने ठरवले आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, दीपिका तिचा ३४ वा वाढदिवस लखनऊ येथील शिरोज कॅफेला उपस्थित राहणार आहे. ॲसिड पीडित महिला मिळून हा कॅफे चालवतात.
 
काही दिवसांपूर्वी छपाक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला असून अनेकांनी दीपिकाच्या अभिनयाचे कौतुकही केले. येत्या १० जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अजय देवगण आणि सैफ अली खानचा तानाजी- द अनसंग वॉरिअर सिनेमाही प्रदर्शित होत आहे. आता प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देतात हे पाहणे औत्सुक्याचे असेल.