आशुतोष पत्की साकारणार ‘शहीद भाई कोतवाल’ यांची भूमिका

    दिनांक :02-Jan-2020
इंग्रजांच्या गुलामीतून भारताची सुटका करताना कित्येक क्रांतिवीरांनी हौतात्म्य स्वीकारले. यातलेच एक नाव म्हणजे क्रांतिवीर ‘शहीद भाई कोतवाल’. त्यांची शौर्यगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर साकारण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऋतुजा बागवे ही शहीद भाई कोतवाल यांच्या पत्नीची भूमिका साकारणार असून आता भाई कोतवाल यांच्या भूमिकेवरील पडदाही दूर सारण्यात आला आहे.
 
 
ashutosh patki_1 &nb
 
छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रियता मिळविलेला अभिनेता आशुतोष पत्की या चित्रपटात झळकणार असून तो शहीद भाई कोतवाल यांची भूमिका साकारणार आहे. ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण ऊर्फ भाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या धाडसाला वंदन करणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून आशुतोष भाई कोतवाल यांची भूमिका साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
आशुतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वडिलांपेक्षा वेगळी वाट धरत त्याने अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटातून त्याला पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.
 
स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले.