Blog...छपाक्‌ आणि तान्हाजी

    23-Jan-2020
Total Views |
- श्याम पेठकर 
 
या देशांतला सामान्य माणूस हा नेहमीच ‘काळजीवाहू सरकार’ असतो. कुठलीही आणि कुणाचीही काळजी तो स्वत:हून ओढून घेतो. म्हणजे तसा तो काळजी चुंबकच असतो. काळजी करावे असे आणि काहीच कारण नसलेले असेही तो ओढून घेतो, त्याची काळजी करतो. तसे त्याच्या आयुष्यांत काळजी करावे असे भरपूर असते. म्हणजे त्याचे आयुष्यच काळजीने काजळलेले असते. तरीही तो फुकटच्या काळज्या विकत घेत सुटला असतो. म्हणजे ऋषभ पंतला इतक्या संधी मिळूनही त्याचा खेळ काही लयीत लागत नाही, याचीही काळजी आमचा सामान्य माणूसच करतो. उद्धव ठाकरे आता कुठून निवडून येतील, याचीही काळजी त्यालाच असते... करीनाच्या लेकराला पडसं झालं तरीही यालाच वाटतं की तिला काही घरगुती उपाय सुचविले पाहिजेत. कांदा महागला आहे, अवकाळीने शेती नासविली आहे, सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, परीक्षांच्या दिवसांतच आयपीएलच्या मॅचेस आहेत, महागाई सतत वाढतेच आहे... असे खूप काही आहे, तरीही हा आपला अनुष्का अद्याप पोटुशी कशी नाही, याच्या काळजीत असतो!
 
chapak_1  H x W
 
तर आता करंट काळजीचा विषय हाच की दीपिका पदुकोनचा ‘छपाक्‌’ हा सिनेमा काही चालला नाही. त्याच्या तुलनेत ‘तान्हाजी’ करोडोत खेळतो आहे. त्यावर मग चर्चा रंगततात. एकतर सध्या छानपैकी थंडी आहे. एखादी मालिका पाणी टाकत लांबवत न्यावी, तशी थंडी वाढतेच आहे. मध्यंतरी थंडी संपली असे वाटत असताना लीप घेऊन थंडीने नवे कथानक सुरू केले. त्यामुळे अशा सुरम्य थंडीच ही हॉट चर्चा मस्त वाटते आहे. मेघना गुलजारचा हा सिनेमा आहे. तो नाही चालला म्हणून गुलजारांना वाईट वाटले. वास्तविक त्यांच्या वाईट वाटण्याचे संदर्भ कौटुंबिक नाहीत. खासजी अजिबातच नाहीत, तरीही गुलजारांना वाईट वाटल्याचीही काळजी आम्हाला वाटलीच.
  
दीपिकाने सिनेमाचा प्रचार तंत्राचा भाग म्हणूनही जेएनयुत जायला नको होते... त्याच मुळे नंतर तिच्या सिनेमाला लोकांनी एकमुस्त वाळीत टाकले म्हणे... तसे काहीच होत नसते. ती जेएनयुत गेली म्हणून सिनेमा बघायचा नाही, असेही होत नसते. प्रचाराची तंत्र आता लोकांनाही माहिती झाली आहेत. सिनेमा पाहूनच लोक काय ते ठरवित असतात... मग हा सिनेमा काय वाईट आहे का? कथा, मांडणी, तंत्र, अभिनय या सगळ्याच पातळ्यांवर चित्रपट उत्तमच आहे. मग काय झाले? खरेतर बॉलिवुडच्या बाजारांत एकाच वेळी दोन सिनेमे एकत्र उतरवित नाहीत. निर्माते एकमेकांशी साटेलोटे करतात. तुझा आधी येऊन जाऊदे, मग मी माझा आणतो... म्हणजे समोरासमोर दोन गाड्या यायच्या नि मग कुणी कुणाला वाट द्यायची, यात दोन्ही गाड्या अरुंद रस्त्यावर अडून पडायच्या, असे होऊ दिले जात नाही. आधी तू जा, मग मी मागाहून येतो, अशी समज दाखविले जाते. यावेळी मात्र छपाक्‌ आणि तान्हाजी एकत्रच आलेत... 
 
आता तान्हाजी खूप सुपर चित्रपट आहे, असे नाही. तो भावनेशी जोडला आहे. शिवाजी महाराजांबद्दलच्या पूजनिय अभिमानाशी जोडला आहे. तरीही त्याचा परिणाम महाराष्ट्रांत व्हायचा. तान्हाजी हा व्हीएफएक्स तंत्राचा सिनेमा आहे. त्यात सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यांत आली आहे. देवगण हा सिंघमच वाटत राहतो... तरीही लोक तान्हाजीला पसंती देत आहेत...
 
लोक सिनेमा बघायला कशाला जातांत? आनंद वाटला पाहिजे, विरंगुळा वाटला पाहिजे. मनोरंजन... एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट... बॉलिवुडचे संस्कार आहेत. नायक संघर्ष करतो. खलनायकाला संपवितो. वास्तविक जीवनांत आपण सतत तडजोडी करतो. कराव्या लागतात. नाडविणार्‍या व्यवस्थेला बुकलून काढावे, असे वाटत असते; पण शेतकरी सावकाराला नमस्कार करतो, खाबुुगिरीसाठी नाडविणार्‍या बाबूला आपण साहेब म्हणतो, शाळेत अव्वाच्या सव्वा फी भरून मुलाला उच्च शिक्षण देतो, नगरसेवक होण्याच्या आधी पैदल असलेला नेता चारचाकीत योतो, बंगलेवाला होतो अन्‌ तरीही आमदारकीसाठी आम्ही त्याला मतदान करतो... अशा तडजोडी. सिनेमांत नायक आमचा हा दाबला गेलेला (आम्हीच दाबून ठेवलेला) आक्रोश बाहेर काढतो. सगळेच तर्काला धरून नसते. आजकाल तर अजिबातच नसते. नायक कचाकचा काड्या मोडाव्यात तसे गुंडांची तोडमोड करतो. भडाग्नी दिल्यावरही चितेवरून उठतो नि दे दणाण्‌ फाईट करतो. हा संघर्ष आम्हाला हवा आहे.
 
तान्हाजीत तो आहे. खर्‍या तान्हाजीच्या शौर्याला सिनेमा तंत्राने आणि मंत्राने अधिक ठसठशित करण्यांत आले आहे.
 
छपाक्‌ मध्येही संघर्ष आहे. वर्तमानांतला संघर्ष आहे. भीषण समस्या मांडली आहे. अत्यंत संयत असा संघर्ष आहे. लक्ष्मी अग्रवाल नावाच्या मुलीच्या चेहर्‍यावर अॅसीड टाकल्यावरचा तिचा संघर्ष आहे. आयुष्यात उभं राहणं आहे. एकटीचा एकाकी लढा आहे... मात्र त्यात आमच्या सिनेमातला संघर्ष नाही. थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेत लक्ष्मीचे पात्र तिच्यावर अॅसीड टाकणार्‍यांना बुकलून काढते, बदला घेते, असे दाखविले असते तर पिटांत शिट्या आणि टाळ्या वाजल्या असत्या. सिमिंग्ली नॅचरल अशी ट्रीटमेंट या सिनेमाला दिली असल्याने तो बघावा वाटत नाही. वेदना, यातना पैसे देवून बघायच्या का? त्या तर आमच्या वास्तविक आयुष्यांत आहेतच... समस्या अशा कराल पद्धतीने पडद्यावर बघायच्या का? आम्हाला समस्यांचा सामना करायचा नसतो, त्यांच्याकडे पाठच फिरविण्याची आमची पद्धत आहे. आमचा जगण्याचा धर्म बुडत असेल, श्वासांना ग्लानी येत असेल तर कुणीतरी अवतार घेत असतं आणि आमची त्यातून सुटका करत असतं, हेच आमच्यावरचे संस्कार आहेत. एक सामान्य घरची मुलगी तिचा संघर्ष स्वत: करते, हे आम्हाला बघवत नाही. अॅसीड टाकलेला तिच्या चेहर्‍याचा सामना करण्याचे धैर्य आमच्यात नाही. आमच्यासाठी कधीतरी संघर्ष करणारा तान्हाजी आम्हाला बघावासा वाटतो, कारण ते आमचे आजचे आयुष्य नाही. तान्हाजी स्वप्न दाखवितो आणि छपाक्‌ भीषण वास्तव... त्याकडे आम्ही पाठच फिरवितो. हजारो लक्ष्मी अशा विद्रूप केल्या गेल्या तरीही अद्याप अॅसीडवर बंदी आलेली नाही, त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायचे नाही. तान्हाजी जबाबदारी घेतो म्हणून तो आम्हाला हवासा आहे, छपाक्‌ तुमच्या जबाबदारीचे भान देतो, म्हणून आम्हाला तो नको आहे... समस्यांचा सामना आमचा आम्हीच करायचा आहे, आम्ही इतके गर्भगळीत नि ढोंगी आहोत की चित्रपटांतदेखील समस्या बघण्याची आमची इच्छा नाही. घाबरट आहोत आपण...
 
 
इतिहासांतल्या शौर्याची पूजा करण्याची कुवत तेव्हाच असते जेव्हा वर्तमानांतल्या प्रश्नांशी दोन हात करण्याचा आमच्यांत लोहा असतो. आम्ही तर प्रश्नांना सामोरेही जाऊ बघत नाही. 
 
छपाक्‌ का नाही चालला? पुन्हा एक पुळचट, बाजारू आणि स्त्रियांबद्दलच्या पुरुषी मानसिकतेतून आलेले कारण, दीपिकाचे आता लग्न झाले आहे, नायिकांचे लग्न झाल की प्रेक्षक त्यांना नायिका म्हणून स्वीकारत नाहीत. म्हणून तिचा हा चित्रपट पडला... रणवीरचा लग्नानंतरचा चित्रपट चालतो आणि दीपिकाचा पडतो, म्हणजे काय? 
 
एक मित्र म्हणाला, वर्तमानांतले तान्हाजी, झाशीची राणी छपाक्‌ बघायला गेले आणि अवताराची वाट बघणारे आणि वर्तमानांत तडजोडींनाच व्यवहार समजणारे तान्हाजी बघत छाती पीटत टाळ्या वाजवित राहिले... 
 
भारतीय चित्रपट अद्यापही प्रगल्भ झालेला नाही. सत्व फार कमी मांडले जाते. कस कळला असता तर कडूिंलबाच्या रसाच्या रसवंत्या लागल्या असत्या रस्तोरस्ती!
 
आम्ही पोसून ठेवलेल्या विकृतींनी विद्रुप केलेल्या चेहेऱ्याचा सामना करण्याच धाडस आमच्यात नसल्यामुळे छपाकला प्रेक्षक नाहीत.