छेडखानी, आत्महत्या आणि समाज

    दिनांक :03-Jan-2020
छाया अभय दिढे
 
 
एकतर्फी प्रेम करायचे, जिच्यावर करायचे तिने प्रतिसाद दिला नाही तर तिचा पाठलाग करायचा, तिला त्रास द्यायचा, तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करायचे, धमक्या द्यायच्या, काहीच उपयोग झाला नाही तर तिच्या अंगावर ॲसिड फेकायचे, हे असले प्रकार वाढीस लागणे आपल्या समाजाला परवडणारे नाही. गेल्या काही महिन्यात एकतर्फी प्रेमातून झालेल्या त्रासामुळे कंटाळलेल्या शाळकरी मुलींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना मुलींच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करून गेल्या. गतवर्षात ज्या घटना घडल्या, त्या मुलीच्या मातापित्याची चिंता वाढवणार्‍या आहेत.
 
  
एखाद्या तरुणाला एखादी मुलगी आवडली म्हणून ती त्याचीच झाली पाहिजे हा दुुराग्रह संस्कारांअभावी अशा मुलांमध्ये निर्माण झाला आहे आणि सुसंस्कार, मूल्यशिक्षण हाच समस्येवरील उपाय आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हैदराबाद येथे डॉ. दिशावर अत्याचार करून तिला जाळून मारल्याची, उन्नाव येथील बलात्कारपीडिता न्यायालयात जात असताना तिला जाळून मारल्याच्या घटनाही ताज्याच आहेत. काय चाललंय तरी काय, हे कळायला मार्ग नाही. मुलींनी, महिलांनी एकटीने घराबाहेर पडूच नये का, असा प्रश्न पडला आहे. 

atma _1  H x W: 
 
 
राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांचे संगनमत कोणापासूनही लपून राहिलेले नाही. हे वास्तव आहे. देशात गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. ज्याच्या हाती सत्ता आहे, ज्याच्या मनगटात बळ आहे, त्याचाच बोलबाला आहे. सर्वसामान्य नागरिकाचा कोणीही वाली राहिलेला नाही. देशात लोकशाही असली तरी ती नावालाच आहे. प्रत्यक्षात सामान्य माणूस ठोकशाहीचा अनुभव घेत आहे. देश स्वतंत्र होऊन सात दशकं उलटली आहेत. पण, सामान्य माणूस खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगत आहे काय, हा प्रश्नच आहे. देशाला भ्रष्टाचाराच्या कॅन्सरने पोखरले आहे, महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला आहे. महिलांवरील अत्याचार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. तरुण मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच भक्षक बनले आहेत. हे सगळे याठिकाणी लिहिण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यात महिलांवरील अत्याचार वाढतच चालले आहे. मध्यंतरी गोंदिया आणि नागपूर येथे ज्या घटना घडल्या, त्या चिंताजनक आहेत. छेडखानी सहन होत नाही म्हणून मुलींनी आत्महत्या करण्याचे प्रकार पुरोगामी म्हणविणार्‍या महाराष्ट्राला शोभणारे नाहीत. आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या अनेक मुली वाचतात. पण, त्यांचे पुुढले आयुष्य हे सुकर असत नाही, ते अधि बिकट बनते, हे लक्षात घ्यावे लागेल. त्यांची मानसिक हिंमत खचलेली असते. त्या नाउमेद होतात. निराश होतात. याकडे कोण लक्ष देणार?
 
 
वारंवार अशा घटना घडतात, त्यांचा निषेध होतो, मोर्चे निघतात, काही काळ उलटला की पुन्हा नव्या घटनेच्या प्रतीक्षेत आम्ही सगळे गाफील होऊन जातो. हे सगळे का घडते? भ्रष्ट पोलिस यंत्रणा हे जसे एक कारण आहे, तसेच संवेदनहीन समाज हेही त्याचे एक कारण आहे. दुसर्‍याच्या मुलीची छेडखानी होते आहे, आपल्याला त्याचा काय त्रास आहे, आपल्याला काय करायचे आहे, असा विचार आपण करतो आणि म्हणूनच गुन्हेगारांचे फावते. म्हणूनच भ्रष्ट सरकारी यंत्रणेसोबतच आपणही अशा घटनांना जबाबदार आहोत, हे मान्य केले पाहिजे.
 
 
सामान्य नागरिकाच्या घरी चोरी झाली, सामान्य माणूस अपघातात मरण पावला, सामान्य माणसाच्या कुटुंबातील महिलेवर बलात्कार झाला, एखाद्या सामान्य कुटुंबातील तरुणीची छेडखानी झाली तरी नेत्यांचे आणि बड्या अधिकार्‍यांचे काहीच बिघडत नाही. गतकाळात घडलेली एक घटना अजूनही माझ्या मनात घर करून आहे. काी केल्या मला त्या घटनेचा विसर पडत नाहीय. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यातील औरंगाबाद येथे घडलेली घटना बोलकी होती. औरंगाबाद येथील श्रुती कुळकर्णी या 22 वर्षीय तरुणीची सातत्याने छेड काढली जात होती, तिने याची तक्रारही पोलिस ठाण्यात केली होती. पण, तिच्या तक्रारीची दखल घेऊन स्वप्नील मणियार या टपोरीबाजाला धडा शिकविण्याऐवजी पोलिसांनी श्रुतीवरच गलिच्छ आरोप केले. या आरोपामुळे व्यथित होऊन अन छेडखानीला कंटाळून श्रुतीने आत्महत्या केली होती. त्या उर्मट पोलिस अधिकार्‍याच्या मुलीची अशीच कोणी छेडखानी केली असती आणि तिला पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाली असती तरच त्याचे डोळे उघडले असते?
 
 
ज्या दुर्घटना सामान्य माणसांच्या बाबतीत घडतात, त्या नेते आणि मस्तवाल अधिकार्‍यांच्या बाबतीत घडल्या तरच यांचे डोळे उघडतील काय? सामान्य माणसांचे अधिकार, त्यांचे हक्क, त्यांच्या मालमत्तेचे अन जीविताचे संरक्षण, त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण ह्या काय फक्त कागदोपत्रीच बाबी राहिल्या आहेत की काय? घटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केले आहेत. पण, आपल्याकडची उर्मट नोकरशाही या अधिकारांपासून नागरिकांना वंचित ठेवत आहे. स्वत:कडे असलेल्या अमर्याद अधिकारांचा दुरुपयोग अधिकार्‍यांकडून केला जात आहे आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांकडून अशा मस्तवाल अधिकार्‍यांना संरक्षण मिळत आहे, ही दुर्दैवी बाब होय. आपल्याकडे सगळेच राजकीय नेते आणि सगळेच अधिकारी वाईट आहेत असे अजिबात नाही. पण, प्रामाणिक नेते आणि अधिकारी यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करता येत नाही, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.
 
 
अनेक प्रामाणिक अधिकार्‍यांना सरकारांनी बेईमान नेत्यांच्या सांगण्यावरून अडगळीत टाकल्याची उदाहरणे कमी नाहीत. औरंगाबादच्या घटनेत श्रुतीचा हकनाक बळी गेल्यानंंतर त्यासाठी जबाबदार धरत खटावकर नावाच्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबितही करण्यात आले होते. अशा अनेक घटनांमध्ये पोलिसांवर कारवाई जरूर झाली आहे. पण, त्याचा उपयोग काय? गेलेला जीव तर आता परत येणार नाही. मग, या निलंबनाचा, अन्य कारवाईचा उपयोग काय? तक्रार करायला आलेल्या व्यक्तीला घाबरवायचे, त्याची तक्रार न घेता ज्याच्याविरुद्ध आरोप आहेत त्याच्याकडून लाच खाऊन त्याला अभय द्यायचे, असे प्रकार सर्रास वाढत चालले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी आणि पीडित व्यक्तींंना उचित न्याय मिळावा यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करणे गरजेचे आहे. राज्यातील प्रत्येक पोलिस निरीक्षकाच्या कक्षात आणि पोलिस ठाण्यात जिथे तक्रार नोंदविण्याचे काम होते, त्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले पाहिजेत. म्हणजे तक्रारदार व्यक्ती काय म्हणाली, पोलिसांनी त्या व्यक्तीला कशी वागणूक दिली, तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ तर केली नाही ना, अशा सगळ्या बाबी स्पष्ट होतील. शिवाय, या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे एक कनेक्शन पोलिस मुख्यालयात असावे. म्हणजे पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी मूळ रेकॉर्डिंगमध्ये काही गडबड केली तरी त्यांचे पाप झाकले जाणार नाही.
 
 
छेडखानीला आणि पोलिसांच्या असहकार्याला कंटाळून जर मुली आत्महत्या करणार असतील आणि आपण कोणतीही उपाययोजना करणार नसू, तर ही अनंताचीच यात्रा ठरेल. एकामागोमाग मुलींना आत्महत्या कराव्या लागतील. ज्या मुलींनी आत्महत्या केल्यात त्यांचा काहीही दोष नव्हता. पोलिसात भरती होऊ इच्छिणार्‍यांनी अतिशय गांभीर्याने विचार करून मगच पोलिसाची नोकरी पत्करली पाहिजे. आपण पोलिसात भरती झालो आहोत, ते नागरिकांच्या जीविताची, त्यांच्या मालमत्तेची आणि त्यांच्या प्रतिष्ठेची सुरक्षा करण्यासाठी, ही बाब प्रत्येक पोलिसाने लक्षात घेतली पाहिजे. नोकरीपूर्वी जे प्रशिक्षण होते, त्या प्रशिक्षणाच्या शेवटी पोलिसांना जी प्रतिज्ञा दिली जाते, त्या प्रतिज्ञेची आठवण प्रत्येक पोलिसाने ठेवली पाहिजे. पण, आपल्याकडची एकूणच राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर ही बाब आज तरी शक्य असल्याचे दिसत नाही.
 
 
राजकारणात काम करणारे नेते आणि त्यांचे चेलेचपाटे पोलिसांवर अनेकदा दबाव आणतात. ज्याने घृणित कृत्य केले आहे, त्याच्या सुटकेसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आणला जातो. अनेकदा आरोपीला शिक्षा व्हावी अशी पोलिसांची इच्छा असते. पण, राजकीय नेतृत्व हस्तक्षेप करीत असल्याने पोलिसांचे हात बांधले असतात. अनेकदा कारवाई करण्यासाठी राजकीय नेते दबाव आणतात, तेव्हा पोलिसांनी गुन्हेगारांकडून लाच खाल्लेली असते. अनेक प्रकरणांमध्ये लाखोंची उलाढाल होते. अनेक प्रकरणांमध्ये पोलिस आणि राजकीय नेते यांचेच संगनमत असते. अनेक ठिकाणी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी असंवेदनशील असतात. तक्रार करायला आलेली व्यक्ती पाहून पोलिसांच्या कपाळावर आठ्या पडतात. आपल्या पोलिस ठाण्याचे रेकॉर्ड खराब होऊ नये म्हणून अनेक प्रकरणात तक्रार देण्यास आलेल्याला धाक दाखविला जातो. पाहा, या प्रकरणात आम्हाला तुझीही चौकशी करावी लागेल, त्यासाठी तुला पोलिस ठाण्याचे हेलपाटे खावे लागतील, तुझा वेळ वाया जाईल, तुला प्रचंड मनस्ताप होईल अशी भीती दाखवून त्याला पळवून लावले जाते.
 
 
पोलिस जर तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत असतील तर सामान्य नागरिकांनी, असहाय मुलींनी, तरुणींनी जायचे तरी कुठे? गेल्या राखी पौर्णिमेला व्हॉटस ॲपवर एक चांगला संदेश सगळीकडे फिरला. भावाने बहिणीला जर विचारले की तुला काय गिफ्ट हवे आहे, तर बहिणीने त्याला असे सांगावे की जशी तू माझी काळजी घेतोस, तशीच ती इतर मुलींचीही घे. मुलींची छेडखानी करू नकोस. घरोघरी हा संदेश पोचला पाहिजे. सगळ्या भगिनींनीच आपल्या टवाळखोर बांधवांना धडा शिकविला पाहिजे. नाही तर, आज एक श्रुती गेली, उद्या दुसरी जाईल अन क्रम सुरूच राहील. याला कुठे अंतच राहणार नाही. दुसर्‍याला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करावी आणि सुरक्षित समाज निर्मितीची मुहूर्तमेढ रोवावी. पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करावेत. त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. म्हणजे मुलं नेमकं करतात काय, चांगल्या वळणावर आहेत का, याची माहिती पालकांकडे राहील. त्या आधारे त्यांच्या भविष्याचा निर्णयही करता येईल. तेव्हा कुटुंब आणि समाज संवेदनशील असणे गरजेचे आहे. केवळ कायद्याचा धाक दाखवून काही साध्य होईल, असे वाटत नाही. भारत हा हजारो वर्षे जुनी श्रीमंत अशी संस्कृती लाभलेला देश आहे. त्या संस्कृतीला शोभेल अशीच प्रत्येकाची वर्तणूक असायला हवी.