अनवाणी चालण्याचे फायदे

    दिनांक :03-Jan-2020
आपण सर्वजण घराच्या बाहेर पडताना बूट, चपला वापरतोच, पण आता बहुतेक लोक घराच्या आतमध्ये देखील पादत्राणांचा वापर करताना दिसतात. आता पादत्राणांचा वापर ही गोष्ट इतकी महत्त्वाची झाली आहे, की निरनिराळ्या कामांसाठी निरनिराळ्या प्रकारची पादत्राणे वापरली जातात. घरी वापरण्याची, बाहेर जाताना घालावयाची, पळताना किंवा खेळताना घालावयाची किंवा इतर काही कामांसाठी एका विशिष्ट प्रकारची ठराविक पादत्राणे वापरण्याची पद्धत आजच्या काळामध्ये सर्वमान्य आहे. पण नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘जर्नल ऑफ एन्व्हायरनमेंटल ॲण्ड पब्लिक हेल्थ’मधील एका शोधनिबंधामध्ये, आपल्या शरीराचा जमिनीशी येणारा संपर्क, अनेक व्याधींपासून आपल्या शरीराचे रक्षण करू शकतो, असे निदान करण्यात आले आहे. यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये अर्दिंग असे म्हटले गेले आहे. माती, गवत किंवा वाळूवर अनवाणी चालणे म्हणजेच अर्दिंग. 
 
anvani_1  H x W
 
 
अनवाणी चालल्याने आपल्या शरीराचा पायाखालील जमिनीशी किंवा मातीशी थेट संपर्क होत असून, जमिनीमधील ऊर्जा आपल्या शरीरामध्ये पायांच्या मार्फत शोषली जाते. अनवाणी चालल्याने मानसिक तणाव, निद्रानाश यासारखे विकार नाहीसे होण्यास मदत होते. इतकेच नव्हे, तर आपल्याला ज्याप्रमाणे हवा आणि पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे जमिनीशी किंवा मातीशी थेट संपर्क होणे ही देखील आपल्या शरीराची मूलभूत गरज असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
 
  
उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्तींना अनवाणी चालण्याचा सल्ला दिला जातो, तसेच दृष्टी कमकुवत असणार्‍या व्यक्तींनी दररोज काही काळासाठी का होईना, पण हिरवळीवर अनवाणी चालावे. त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच रोज थोडावेळ अनवाणी चालल्याने आपल्या शरीरातील पेशी व स्नायूंमध्ये इलेक्ट्रॉन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. पाषाणयुगामधील आपले पूर्वज मातीमध्ये, वाळूमध्ये चालत असत. त्यामुळे त्यांच्या पावलांवर असलेले, शरीरातील निरनिराळ्या अवयवांशी जोडल्या गलेल्या ॲक्यूप्रेशर पॉईंट्सना आपोआपच चालना मिळत असे. आजकाल ॲक्युप्रेशरच्या या बिंदूंना चालना देण्यासाठीची पादत्राणे देखील खास विकत आणली जातात. पण त्याऐवजी रोज काही काळ अनवाणी चालले तर ॲक्युप्रेशरचे सगळे फायदे मिळू शकतील.