शर्यत अजून संपली नाही

    दिनांक :03-Jan-2020
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
 
आयुष्यात प्रत्येक घटना आपल्याला आपल्या मनासारखी घडते असं होत नाही. माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो, तितक्याच सहजतेने प्रेमही व्यक्त केले असतं तर जगायला किती मजा आली असती. कारण माणसाच्या निम्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात. शब्द बोलताना शब्दाला धार नाही तर आधारच असायला हवा कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात. आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे, की आपल्या आयुष्यात जे घडतं ते फक्त आपणच घडवत असतो. 

sharyat _1  H x 
 
 
आयुष्यातले निर्णय चुकतात आणि आयुष्य चुकत जातं, त्यातला प्रश्न आपल्याला कधीच कळत नाही आणि त्यामुळे उत्तर मात्र चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. आपलं कुठे चुकतं हे कळत नाही आणि दाखवणार्‍याला वाट माहीत नसते, त्यामुळे त्याच्या सल्ल्याचा उपयोग होऊ शकत नाही, चालणार्‍याचं ध्येय मात्र हरवून जातं. काही गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात पण अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं. असे हास्य बनवा, ज्याला रहस्य असणार नाही. कायम अशी माणसं सोबत ठेवा, की जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळ येईल तेव्हा ती तुमचा आरसा बनायला तयार असतील. कारण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही. एखादं स्वप्न पूर्ण झालं नाही, म्हणून रडायचं नसतं.
 
 
असंख्य चांदण्यांनी भरून आपलं आभाळ मात्र कायमच रिकामं असतं. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणार्‍याच गोष्टी माणसाला का हव्या असतात. याचं उत्तर आपल्यालाच माहीत नसतं. म्हणूनच सुरेश भट म्हणतात-
आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे....
रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे....
 
 
चारचौघात बसण्यापेक्षा कधीकधी सुमद्र किनार्‍यावर जाऊन बसावं, आठवणीला घेऊन बसावं, आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय्‌, यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत, याचा सुद्धा कधीतरी विचार करायचा असतो. कारण अथांग आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही, तशाच माणसाच्या गरजा कधीच पूर्ण होत नाही. शक्य तितके तारे मोजून आपण मात्र समाधानी राहावं. मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद, पण गंमतीची गोष्टी अशी की ती मौल्यवान असूनही आपल्याला ती विनामूल्य मिळते, पण त्याहूनही गंमतीची गोष्ट अशी की आपल्यापैकी बर्‍याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो. उगवणार्‍या प्रत्येक सूर्याला आनंदाने सामोरी जा, तो मावळताना आपल्याला प्रचंड प्रमाणात समाधान देऊन जाईल.
 
 
 
खरं सांगायचं झालं, तर आनंद हा फुलपाखरासारखा असतो. त्याचा पाठलाग केला की तो दूर पळतो, पण आपण निश्चल बसलो की अलगद आपल्या खांद्यावर येऊन बसतो. प्रश्न सुटण्यासारखा असेल, तर काळजी करण्यासारखे त्यात काय आणि तो सुटत नसेल, तर काळजी करून उपयोग काय? पराभवाने माणूस कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. आपल्या कठीण काळात सतत स्वत:ला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. सतत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वत:ला विश्वास देत रहा, कारण आपलं आयुष्य आपण घडवायचं आहे. आपण ठरवल्याशिवाय त्यात सकारात्मक बदल घडू शकत नाही आणि कधीच सोबत कोणी नसलं तरी आपण कायम आपल्यासाठी उभं राहणं महत्त्वाचं.
संस्कृत शिक्षिका, सेंटर पॉईंट स्कूल, नागपूर