अक्षय कुमार बनला बॉक्स ऑफिसचा किंग

    दिनांक :03-Jan-2020
मुंबई,
एकामागोमाग एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरला आहे. अक्षयसाठी 2019 हे वर्ष फारच दमदार ठरले. मागील वर्षी अक्षयने केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल 4 आणि गुड न्यूज यासारखे चित्रपट केले. या चित्रपटांच्या कमाईत अक्षय कुमारने इतर कलाकारांना मागे टाकले आहे. अक्षयच्या चित्रपटांनी यावर्षी बॉक्स ऑफिसवर एकूण 665.89 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
 

akshay kumar _1 &nbs 
 
 
अक्षयने 2019 ची सुरुवात दमदार केली होती. मार्च महिन्यात प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘केसरी’ चित्रपटाने जवळपास 151.87 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘केसरी’च्या यशानंतर अक्षयने विद्या बालन आणि इतर कलाकारांसोबत मिळून ‘मिशन मंगल’ हा स्पेस ड्रामा बनवला. मिशन मंगलने 100 कोटी क्लबमध्ये सहजरित्या प्रवेश केला आणि चित्रपटाने एकूण 192.66 कोटी रुपयांची कमाई केली होती.
 
 
या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर अक्षय कुमारने ‘हाऊसफुल 4’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हा विनोदी चित्रपट 205.60 कोटी रुपयांच्या कमाईसह 2019 मधील सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांपैकी एक ठरला. भारतीय बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. केवळ सहा दिवसातच चित्रपटाने 115.75 कोटी रुपये कमावले आहेत. या चार चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण 665.89 कोटी रुपये कमावण्यात अक्षय कुमारला यश आले आहे. मागील वर्ष अतिशय चांगले गेल्यानंतर अक्षय 2020 मध्येही आपल्या चाहत्यांसाठी अनेक चित्रपट घेऊन येत आहे. यंदा अक्षयचे ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वीराज’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘बच्चन पांडे’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
 
 
कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारनंतर अभिनेता हृतिक रोशनचा क्रमांक लागतो. 2019 मध्ये हृतिकच्या दोन चित्रपटांनी 464.01 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर आयुष्मान खुरानाच्या तीन चित्रपटांनी 386.18 कोटी रुपयांची कमाई केली. याशिवाय बॉलीवूडचा दबंग सलमान खानच्या दोन चित्रपटांनी 2019 मध्ये बॉक्स ऑफिसवर 383.77 कोटी रुपये कमावले आहेत. तर अजय देवगणने दोन चित्रपटांमधून 305.47 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.