फिरूनी पुन्हा जन्मेन मी...

    दिनांक :03-Jan-2020
जयवंती पांडे 
9422915636
 
सकाळी सकाळी पेपर वाचायला हातात घ्यावा, तर सगळ्यात पहिले याच बातम्या वाचायला मिळतात- चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कार, कुणावर ॲसिडहल्ला झाला, तर कुणा तरुणीला बलात्कार करून भररस्त्यात जाळून टाकले, चालत्या बसमधून फेकून दिले... पेपर हातात घेतल्यावर आज आणखी कोणती नवीन बातमी वाचायला मिळेल, याची धास्तीच वाटते. हे सगळे प्रकरण (गुन्हे) कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चालले आहे, असे नाही का वाटत?
 
 
 
हे सगळे वाचले की, रक्त कसं आतून सळसळून येतं, हाताच्या मुठी आपोआपच आवळल्या जातात. हे सगळे कधी थांबणार? चार-पाच वर्षांच्या मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधमांना काय वाटते? असे कृत्य करून आपण खूप मोठा पुरुषार्थ गाजवला, मोठी लढाई जिंकून आलो? या नाजूक जिवांना काय चांगले काय वाईट, सुखदुःख, आयुष्य, जन्म-मरण म्हणजे काय, याचा अर्थच समजलेला नसतो. अशा निष्पाप जिवावर बलात्कार करायला यांचे मन तरी कसे धजावते? हे असले कृत्य करताना यांच्या डोळ्यांसमोर यांच्या मुली-आया-बहिणी समोर येत नाही काय?
 
 
sir _1  H x W:
 
 
बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, तरीसुद्धा यांना शिक्षेची भीती वाटत नाही म्हणून गुन्हे अजूनही घडतच आहेत. अशा नराधमांना झाडाला उलटे टांगून त्यांचे ...... छाटून टाकले पाहिजे, रोज एक एक अवयव छाटून टाकला पाहिजे आणि रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांनी दगडांनी मारले पाहिजे म्हणजे या दुष्टांना मरणयातना काय असतात हे समजेल आणि हे बघूनच दुसर्‍याला हा गुन्हा करण्याची हिंमत होणार नाही व समाजातील विकृतीला आळा बसेल.
अशा माणसांना काय नाव द्यावे? जनावर की राक्षस? जनावर म्हणणेसुद्धा चुकीचेच ठरेल. कारण, जनावरांमध्येसुद्धा माणुसकी असते. या सगळ्या गोष्टींसाठी दोषी कुणाला ठरवायचे? सरकार, समाज की संस्कार?
 
 
जोपर्यंत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे ती आपल्या सुखासाठीच आहे, तिचा आपण आपल्याला पाहिजे तेव्हा उपभोग घ्यायचा, हा विचार जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तिच्या अंगावर हे वासनेचे ओरखडे ओढलेच जाणार. ज्या भावनेने नवरात्रात देवीची, दिवाळीत लक्ष्मीची आपण पूजा करतो तीपण एक स्त्रीच आहे ना? मग त्याच भावनेने एका स्त्रीकडे का पाहिले जात नाही? सदैव स्त्रीकडे बघताना पुरुष हा वासनांध नजरेने का बघतो? तिच्याकडे आदराने का बघत नाही?
 
 
सदैव डोक्यावर टांगती तलवार घेऊन, मनात भीती बाळगून, डोक्यावर भीतीचे ओझे घेऊनच तिने जगात वावरायचे काय? कधी या किळसवाण्या नजरा बदलतील आणि कधी एक स्त्री मोकळा श्वास घेऊ शकेल?
 
 
असे न हो की आई-वडील आपल्या मुलींना, शिकून मोठी हो, खूप नाव कमव, आई-वडिलांचे नाव मोठं कर, असे स्वप्नच पाहणे (दाखवणे) बंद करतील आणि तिलापण बघायला नाही सांगतील. कारण, आपणच तिला शिकवतो की जा, खूप शिक, मोठी हो, आकाशात उंच भरारी घे, कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नकोस. पण, जेव्हा ती उंच भरारी घ्यायला जाते, तेव्हा समाजातले राक्षस उडण्याआधीच तिचे पंख छाटून टाकतात. त्यामुळे तिची भरारी मारायची हिंमतच खचून जाते.
 
 
आता हेच पाहा ना- दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाचा अजून निकाल लागायचाच आहे, तोपर्यंत हैदराबादमध्ये दुसरा गुन्हा तयार! याचे कारण हेच की, पहिले प्रकरण निकालात लागेपर्यंत हळूहळू त्या गोष्टी विसरायला लागतात. हैदराबादमध्ये जो प्रकार घडला, ती उच्च शिक्षण घेतलेली एक पशुवैद्यक होती, पण तरीही तिचा बचाव नाही करू शकली. किती निर्दयपणे तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर अमानुषपणे तिला जिवंत जाळले. किती क्रूर... निर्दयी वृत्तीचे... त्यांना काय उपमा द्यावी हे समजत नाही!
 
 
ती एक पशुवैद्यक होती, मुक्या जनावरांची ती सेवा करणारी होती. आपल्यासाठी डॉक्टर म्हणजे देव असतो. कारण, त्याच्यामुळे अनेकांचे जीवन वाचत असते. ते अनेकांना जीवनदान देत असतात. ती जर आज असती तर अनेक मुक्या प्राण्यांची सेवा तिच्या हातून घडली असती. तिलाच या समाजातल्या नराधमांनी क्रूरपणे संपवले.
 
 
महाभारतात जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण झाले तेव्हा श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून आला, तसा आता का नाही एखादा श्रीकृष्ण जन्माला येत अशा अबलांचे रक्षण करायला?
 
 
कायद्याचे उल्लंघन करू नये, कायदा आपल्या हातात घेऊ नये, असे आपण म्हणतो. पण, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. आपण म्हणतो की अति ताणू नये, अति ताणल्याने तुटते. तसाच प्रकार हैदराबादमधल्या डॉ. मुलीच्या बाबतीत घडला. या घटनेची जितकी िंनदा करावी तेवढी कमीच आहे. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाच्या वेळी समाज जेवढा चिडला तितकाच आताही संतापला होता. गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून जनता खूप संतापली होती. लोक रस्त्यावर आले, आक्रोश करायला लागले, नारेबाजी करायला लागले, रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढायला लागले, पीडित मुलीच्या फोटोजवळ मेणबत्त्या लावल्या, पण न्याय मिळत नव्हता.
 
 
पीडित व्यक्तीच्या घरी जाऊन दोन शब्द सांत्वनाचे बोलून, दोन-चार अश्रू ढाळून, मदत म्हणून दोन-चार लाख रु. दिले की झाले, असे वाटते. पण, जो निष्पाप जीव गेला त्याची भरपाई काय पैशानी भरून निघणार होती का? गेलेली व्यक्ती परत येणार होती का? न्याय मिळत नव्हता, गुन्हे घडतच होते, अशा परिस्थितीत पोलिसांनी गुन्हेगारांना गोळ्या घालून ठार मारले तर काय बिघडले? लोकांनी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला, लोकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. काही लोकांनी विरोधही केला. काही का असेना, पण गुन्हेगारांना कशाही प्रकारे शिक्षा झाल्यामुळे जनता थोडी शांत झाली. त्यांना थोडा दिलासा मिळाला. कोर्टात जसे निर्णय न देता ‘तारीख पे तारीख...’ दिली जाते तसेच गुन्हेगाराला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत गुन्हे घडतच राहतील आणि घडतच राहतील... म्हणून गुन्हेगाराला जर लवकर शिक्षा मिळाली, तर कुणाला कायदा हातात घ्यायची गरजच पडणार नाही आणि गुन्हे कमी घडतील.
 
 
या सगळ्यात मात्र ज्या निष्पाप कळ्यांचा जीव गेला त्यांचे तर आपले आयुष्य जगण्याचे राहूनच गेले.
फिनिक्स पक्षी जसा त्याच्या राखेतून नवीन जन्म घेतो असे म्हणतात तसेच जर पुनर्जन्म असेल, (पुनर्जन्म आहे की नाही मला माहिती नाही, पण जर असेलच) तर या निष्पाप कळ्यांना खुलण्यासाठी परत स्त्रीचाच जन्म मिळू दे आणि समाजतली ही कीड नष्ट करण्यासाठी हेच त्यांना म्हणू दे-
 
 
''एकाच या जन्मी जणू,
फिरून नवी जन्मेन मी
भवती सुखाचे स्वर्गीय वारे...
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी...
भीती अनामी विसरेन मी...''