पाठदुखीचा त्रास?

    दिनांक :31-Jan-2020

backpain _1  H

पाठदुखी हा अलीकडच्या काळातील एक सर्वसामान्य आजार बनला आहे. सतत एकाच जागी बसून काम करणं, वाकून काम करणं, एखादं ओझं उचलणं ही पाठदुखीची सर्वसामान्य कारणं असतात. सहसा संगणकावर दीर्घ काळ काम करणं, कार्यालयात बैठी कामं करणं ही यामागची कारणं असतात. त्याबरोबरच खराब रस्त्यांवरून दुचाकी वेगानं चालवल्यामुळेही पाठदुखी सुरू होते आणि वाढू शकते. पाठदुखीकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. मात्र सुरुवातीलाच उपचार घेण्यास सुरुवात केली तर पाठदुखी लवकर आटोक्यात येते. काम करताना अधूनमधून उठणं आणि दोन-चार मिनिटं फिरून येणं, हात-पाय ताणून शरीर मोकळं करणं या गोष्टी छोट्या असल्या तरी पाठदुखी टाळण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. विशेषतः पाठ आखडली असेल तर काही शारीरिक हालचालींनी ही पाठदुखी दूर होते. मात्र गंभीर पाठदुखीमध्ये मणक्यांमध्ये दोष असू शकतात. म्हणून उपचाराआधी पाठदुखीचं नेमकं कारण शोधावं लागतं. यासाठी एक्स रे आणि एमआरआय काढले जातात. ते नॉर्मल असतील तर मणक्यांमध्ये फारसा दोष नाही असा अर्थ असतो. अशा वेळी मागे-पुढे वाकण्याच्या आणि पाठीच्या कण्याच्या साध्या व्यायामांनी आणि साध्या वेदनाशामक औषधांनीही पाठदुखी बरी होऊ शकते. पोहणे हा पाठदुखीवरचा आणि खरं तर पाठीच्या कण्याच्या आजारांवरचा उत्तम उपाय मानला जातो. परंतु मणक्यांमध्ये दोष असेल तर खास उपचार घ्यावे लागतात. ट्रॅक्शन, फिजिओथेरपीपासून शस्त्रक्रियेपर्यंतचे उपचार टप्प्याटप्प्याने करावे लागतात. शस्त्रक्रिया हा अखेरचा उपाय असतो.