उद्धवजी, बांधावर चला!

    दिनांक :04-Jan-2020
महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, कृपया विदर्भात या आणि शुक्रवारच्या बेसुमार गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीच्या बांधावर जरा फेरफटका मारा. शुक्रवारच्या गारपिटीने विदर्भातील पाच जिल्ह्यांतील शेतकरी व बागायतदार कसा मातीत मिसळला आहे, हे आपल्या डोळ्यांनी बघा आणि किमान 25 हजार रुपये हेक्टरी मदत तरी जाहीर करा. शेतकरीप्रेमाचे नाटक करण्यासाठी तरी या! उद्धवजी, बांधावर या!
 
तसे तुम्ही अत्यंत नाटकी आहातच. फार दिवस नाही झालेत. निवडणुकीत जनतेने तुम्हाला सत्तेत बसण्याचा जनादेश दिला होता. भाजपासोबत सत्तेत सहभागी होऊन पाच वर्षे राज्यकारभार करण्याची बहुसंख्य जनतेची इच्छा होती. परंतु, तेव्हा सत्ता स्थापन करण्याचे सोडून तुम्ही आणि तुमचा अनभिषिक्त राजपुत्र पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्‍यांवरील संकटाने इतके गहिवरून गेले होतात की, थेट शेतीच्या बांधावरच पोहोचलात. हातात कुजलेल्या सोयाबीनची झाडे कॅमेर्‍यांसमोर नाचवीत, हेक्टरी 25 हजार रुपये मदत सरकारने (तेव्हा सरकारच नव्हते. राष्ट्रपती राजवट होती तरीही) जाहीर करावी म्हणून डरकाळी फोडली होती. शेतकर्‍यांच्या दु:खाने तुम्ही सतत फोडत असलेले टाहो बघून नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीच केले. राज्याच्या तिजोरीच्या चाब्याच तुमच्या हातात दिल्या. म्हणून आग्रह आहे उद्धवजी, बांधावर चला!
सत्तेच्या उबदार गादीवर बसूनही, तुम्हाला अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत करता आली नाही. ही मागणी काही भाजपाने केली नव्हती. स्वत: तुम्ही तुमच्या मुखकमलातूनच याचा उच्चार केला होता. परंतु, तरीही तुम्ही ही मागणी, तुमच्या अधिकारात असतानाही पूर्ण केली नाही. मग ते शेतकरीप्रेमाचे नाटक समजायचे का? ठीक आहे. परंतु, तसे नाटक करण्यासाठी तरी विदर्भात या आणि उद्ध्वस्त शेतीच्या बांधावर चला, उद्धवजी!
तसेही तुम्ही दिलेले शब्द पाळणारे आहात, असे म्हणतात. मुख्यमंंत्रिपदी शिवसैनिकाला बसवीन, असा शब्द दिला होता म्हणे तुम्ही! भाजपाची पालखी कायमची वाहणार नाही, असाही शब्द दिला होता म्हणे तुम्ही! स्वत: मुख्यमंत्री बनून अननुभवी पुत्राला थेट कॅबिनेट मंत्री बनविण्याचाही शब्द दिला असावा कदाचित... मग तसा शेतकर्‍यांना दिलेला शब्दही पाळावा, उद्धवजी! की फक्त पिताश्रींनाच दिलेले शब्द पाळायचे ठरविले आहेत तुम्ही!

agralekh 4 jan 2020_1&nbs
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा नागपूर अधिवेशनात करून टाकली. ती करतानाही आधीच्या भाजपा सरकारला बोचकारे काढलेत. पण, शेतकर्‍यांच्या ताटात काय येऊन पडले? आश्वासनाच्या कागदांचे बोळे! दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करणार, असे सांगून स्वत:ची पाठ तर थोपटून घेतली; परंतु खरेच किती शेतकर्‍यांना ही रक्कम मिळणार आहे, हे नाही सांगितले. मार्चमध्ये ही रक्कम खात्यात जमा होईल, हे मात्र सांगितले. तोपर्यंत शेतकर्‍यांनी काय करायचे? आश्वासनाचे बोळे चिवडत बसायचे का? गेल्या एक महिन्यात राज्यात 300 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची बातमी आहे. मन नाही द्रवले तुमचे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तर तुम्हाला वेळी-अवेळी शेतकरीप्रेमाचा उमाळा येत होता. मग आता काय झाले? सत्तेच्या उबेने शेतकरीप्रेमाचा पान्हा आटला की काय! ही ऊब इतकी जिव्हारी असते का हो?
उद्धवजी, फक्त नाटक करता तुम्ही, फक्त नाटक! तुम्हाला नाटकाशिवाय काहीही येत नाही! खरे नाटक पडदा वर गेल्यावर सुरू होते; परंतु तुमच्या नाटकावर तर सत्तेची ऊब मिळताच पडदा पडू लागला आहे. हे नाटक थांबवा आणि शेतकर्‍यांच्या संकटाकडे जरा माणुसकीने बघा. विदर्भातील शेतकर्‍यांना या गारपिटीने जखमी केले आहे. त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी विदर्भात या! ‘हीच वेळ आहे’ उद्धवजी, बांधावर चला!
 
तिकडे पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान सत्तेत येण्याआधी अशाच डरकाळ्या फोडत होता. मी यँव करीन, मी तँव करीन! जनतेने (खरे म्हणजे लष्करानेच) त्याला पंतप्रधानपदीच बसविले. आता दीड-पावणेदोन वर्षे झालीत, इम्रान खान फक्त ‘घूमजाव’च करीत आहे. त्याच्या सरकारला ‘यू टर्न सरकार’ असे नाव पडले आहे. उद्धवजी, तुम्हाला तर मुख्यमंत्री बनून एखाद् महिनाच झाला असेल आणि तरीही तुम्ही त्या इम्रान खानच्या रांगेत जाऊन बसलात! आरे कारशेडच्या विरोधाचे काय झाले? नाणार प्रकल्पाच्या विरोधाचे काय झाले? दहा रुपयांत शिवभोजन थाळीचे काय झाले? शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करण्याचे काय झाले? अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीचे काय झाले? उद्धवराव, तुम्ही तर सत्तेचे बािंशग बांधण्यासाठी तुमच्या पिताश्रींचे हिंदुत्वही  सोडले हो! युती तोडली म्हणजे आम्ही धर्मांतर केले नाही, असे तुम्ही गुरगुरलात. परंतु, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले धर्मांतरित आहेत, असे कुणी म्हटले होते? तरीही तुम्ही गुरकावलात ना! तो अस्लम शेख आठवतो? कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुमच्याशी हस्तांदोलन केलेला? याकुब मेमनची फाशी रद्द व्हावी म्हणून अर्जविनंत्या करणारा? नाही आठवणार! परंतु, भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर शिवसेना बंड करून उठेल, अशी धमकी देऊन तुम्ही त्या अत्यंत कार्यक्षम व्यक्तीला खासदारकीपासून वंचित केले होते. भाजपाच्या तिकिटावर लढणारा किरीट सोमय्या तुम्हाला तेव्हा चालला नाही; परंतु तुमच्या मंत्रिमंडळात, तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा हा अस्लम शेख मात्र चालतो का? कुणाला मंत्री करायचे हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न असेल, तर कुणाला उमेदवारी द्यायची, हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न होऊ शकत नाही का? उद्धवजी, या डरकाळ्या, या धमक्या, ही टिंगलटवाळी फक्त रंगशारदा किंवा षण्मुखानंद हॉलमध्येच शोभते. तिथे तुमच्या नाटकीपणाला कुणीच आक्षेप घेणार नाही. परंतु, आता तुम्ही जनतेच्या दरबारात, जनतेच्या रंगमंचावर संपूर्ण राज्याचे नेते म्हणून आला आहात. याचे भान ठेवले पाहिजे.
 
आतापर्यंतची, म्हणजे अगदी वानखेडे स्टेडियमची पिच खोदण्यापासून ते मुंबईत दक्षिण भारतीय व उत्तर भारतीयांच्या अश्लाघ्य विरोधाची आणि आता आताच्या हिंदुत्वाच्या पुळक्याची सर्व नाटके सोडून द्या... विसरून जाऊ या हे सर्व! पण, कृपया शेतकर्‍यांप्रती कळवळ्याचे नाटक करू नका. तो या निसर्गकोपाने इतका पिचलेला आहे की, तुमची ही नाटके त्याला सहन होणार नाहीत. जितक्या तडकाफडकी तुम्ही नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले, तितकीच नाही पण त्या स्तराची तडफ, अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना तुम्ही स्वत:च जाहीर केलेली मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात दाखवा आणि आता वैदर्भीय शेतकरीही गारपिटीने गारद झाला आहे. त्यालाही मदतीची गरज आहे. केवळ पिताश्रींनाच दिलेले शब्द पाळणारा हा सुपुत्र नाही, तर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून रयतेला दिलेले शब्दही, प्रसंगी आकाशपाताळ एक करून पाळतो, हे दाखविण्यासाठी तरी, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, विदर्भात या... उद्ध्वस्त शेतीच्या बांधावर या... मातीमोल झालेल्या केळी, संत्री, गहू हातात घेऊन या शेतकर्‍यांना किमान हेक्टरी 25 हजार रुपयांची त्वरित शासकीय मदत जाहीर करा! चला उद्धवजी, बांधावर चला!