बिग बींनी केले रिंकूच्या चित्रपटाचे प्रमोशन

    दिनांक :04-Jan-2020
मुंबई,
अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या 'मेकअप' चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीत तसेच बॉलिवूडमध्येही रिंकूच्या या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे.
 

big b-rinku_1   
 
१०० टक्के संस्कारी, १०० टक्के लाजाळू अशी रिंकू म्हणजे 'पूर्वी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर पाहून पूर्वीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रिंकू या चित्रपटात दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. घरच्यांसमोर ती संस्कारी, सोज्वळ, लाजाळू असते तर घराबाहेर ती तेवढीच निर्भीड, बिनधास्त आणि स्वतःच्या मनाला वाटेल तेच करणारी असते.
 
एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसते. यातली खरी पूर्वी नक्की कोण असा प्रश्न प्रेक्षकांना ट्रेलर पाहून पडला आहे. रिंकू म्हणजेच पूर्वी तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट राहताना दिसतेय. या चित्रपटात अभिनेता चिन्मय उदगीरकर रिंकूसोबत दिसणार आहे. चिन्मय डॉक्टरच्या भूमिकेत असून ट्रेलरच्या शेवटी काही ट्विस्ट पाहायला मिळतोय.
 
गणेश पंडित यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले असून या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले आहे. चित्रपटाची निर्मिती दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी केली असून केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. येत्या वर्षी ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.