आसामचे पहिले दोन मुख्यमंत्री

    दिनांक :04-Jan-2020
ईशान्य वार्ता
सुनील किटकरू
 
आधुनिक आसामचा इतिहास गोपीनाथ बोरदोलई व विष्णुराम मेधी यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. कदाचित, ही नावे अनेकांना माहीतही नसतील. स्वतंत्र भारतात आसाम सामील करण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. तसेही कोलकात्यापलीकडील भारताबद्दल आम्हाला कमीच माहिती असते.
तीन कोटींच्या वर लोकसंख्या असलेला विशाल आसाम आज पुन्हा एनआरसीमुळे म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमुळे चर्चेत आहे. तेथे सुमारे 19 लाख घुसखोर आहेत. परंतु, या समस्येशी स्वातंत्र्यापूर्वीपासून गोपीनाथजी संघर्ष करीत होते. गोपीनाथजी आसामचे पहिले मुख्यमंत्री होते. 1946 ते 1950 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता, तर विष्णुराम मेधी 1950 ते 1956 पर्यंत मुख्यमंत्री होते. दोघेही कुशाग्र बुद्धीचे धनी होते. 1921च्या सुमारास आसाम कॉंग्रेसची निर्मिती झाली. असहकार चळवळीत दोघांनीही भाग घेतला. गोपीनाथजींना मुस्लिम लीगचे सादुल्लाशी नेहमी संघर्ष करावा लागला. उत्तम व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा आणि राजकीय चातुर्य यामुळे त्यांनी कॉंग्रेसची आसामात उभारणी प्रभावीपणे केली. घुसखोर (स्थलांतरित) मुस्लिमांना त्यांनी जमिनी देण्यास नकार दिला. अशा रीतीने स्थानिक लोकांच्या अधिकाराचे, अस्तित्वाचे त्यांनी संरक्षण केले.
 
 
sampadakiy 4 jan_1 &
 
गोपीनाथजींनी मुस्लिम लीग व ब्रिटिशांचा, आसामला पूर्व बंगालमध्ये सामील करण्याचा डाव उद्ध्वस्त केला. सरदार पटेलांबरोबर कार्य करून, एकीकडे चीन तर दुसरीकडे पाकिस्तानशी टक्कर घेत आसामचे भविष्य सुरक्षित ठेवले. पूर्व पाकिस्तानातून लाखोंच्या संख्येने आलेले शरणार्थी हिंदूंचे पुनर्स्थापन केले. गुवाहाटी विद्यापीठ, आसाम उच्च न्यायालय, वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती केली. ते उत्तम लेखक होते. अनासक्ती योग, श्री रामचंद्र, बुद्धदेव इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. गांधीजींचा त्यांच्या जीवनावर खोल प्रभाव होता. सल्लामसलतीसाठी ते सेवाग्रामला देखील येत. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत आसामात त्यांनी कस्तुरबा स्मारक ट्रस्ट स्थापन केला. गोपालन, कृषी, खादी ग्रामोद्योग कार्य सुरू केले. रचनात्मक कार्यासाठी ‘प्रशिक्षण विद्यालया’ची कल्पना प्रथम आसामातील महिलांनी गांधीजींसमोर मांडली. गांधींना याचे आश्चर्य वाटले. असे विद्यालय सेवाग्रामलादेखील सुरू झाले नव्हते.
गोपीनाथजी पर्वतीय जनजाती समुदायात सहज मिसळत. एकदा तर ते जेवायला बसले असताना आलेल्या भिकार्‍यास त्यांनी आपले भोजन देऊन शेवटपर्यंत त्याच्याजवळ ते थांबले. अशा गुणांमुळेच त्यांना ‘लोकप्रिय’ ही उपाधी मिळाली. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च नागरी उपाधी त्यांचे नावे घोषित केली व संसदभवन परिसरात पुतळा उभा केला. आपल्या निजी जीवनाबद्दल त्यांची एक कविता प्रसिद्ध आहे-
क्षणभंगुर छाया पर गिरता है परदा
मुरझा गई है पुष्पमालाएँ
गहन अंधकार में एकाकी
भूल गया मैं अपनी राह
तुमने दर्शाया फिर मार्ग
धुन से अपने बंसी की
मेरा वन है पुष्पविहीन
जीवन गीत मे निस्तब्ध
अर्पण की मेरी आरती, प्रार्थना
अर्पित है तेरे चरणों में।
केवळ 60 वर्षांचे आयुष्य गोपीनाथजींना लाभले. ते असते तर आसाम समस्येने उग्र रूप निश्चितच धारण केले नसते. 5 ऑगस्ट 1950 ला त्यांचे निधन झाले.
दुसरे व्यक्तिमत्त्व विष्णुराम मेधी, दीर्घायुषी होते. 92 वर्षे जगलेत. 1981 ला स्वर्गवासी झालेत. एवढा प्रदीर्घ काळ लाभून देखील राजकीय नेतृत्वाने त्यांना पुढे येऊ दिले नाही. 1950 ते 1956 या काळात ते आसामचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या वाडवडिलांपासून ‘हाजो’ येथील सुप्रसिद्ध हयग्रीव माधव मंदिराची त्यांनी सेवा केली. 1920 ला भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले. 1930 ला आसाम कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. गोपीनाथ बोरदोलाई यांच्यासोबत राहून आसामला बांगलादेशचा (पूर्व पाकिस्तान) भाग बनविण्यापासून रोखण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली.
 
बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक कृती केल्याने त्यांचे अनेक सहकारी त्यांच्यावर नाराज झाले होते. स्थिर होणारे लोक तेव्हाही अनेक नेत्यांना सुरक्षित व्होट बँक वाटत होती. विष्णुरामजींनी बंडखोर नागांबद्दलदेखील कठोर भूमिका घेतली. त्यावेळेस नागा नेता अंगामी फिजो स्वतंत्र नागालॅण्ड देशासाठी प्रयत्नात होता. मेधींनी बंडखोर चळवळ आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने पर्वतीय क्षेत्रात रोष देखील उत्पन्न झाला. विष्णुरामजींचे स्पष्ट मत होते की, पर्वतीय क्षेत्रात ख्रिश्चन मिशनरी फुटीरतावादी चळवळीला खतपाणी देतात. ही गोष्ट आजदेखील 2019 सालापर्यंत बदलेली नाही. कम्युनिस्ट चळवळ उभी करणारे विष्णुप्रसाद राभा, अराजकता पसरवित आहेत म्हणून त्यांच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षीस त्याकाळात विष्णुरामजींनी जाहीर केले होते. जाहीरपणे ते त्यांचा निषेध करत. त्यांच्या अशा राष्ट्रवादी धोरणामुळे केंद्रीय नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून मद्रास प्रांताचे गव्हर्नर केले. ते लोकप्रिय नेते होते. परंतु, इतरांच्या राजकीय स्वार्थामुळे त्यांना हटावे लागले.
 
त्यानंतर आसामात घुसखोरीचा सुकाळ सुरू झाला. तिसरे मुख्यमंत्री चलिहा यांना ही समस्या आवरता आवरता नाकी दम आला. यानंतर विष्णुराम साधे आमदार राहिलेत. त्यांना अपत्य नसल्याने आपली संपत्ती, घर त्यांनी शिशू कल्याण केंद्र, बाल वाचनालयास दान केली. त्यांची पत्नी निर्मला सुंदर वीणकाम करीत. मद्रास प्रांतात राज्यपाल असताना, राजभवनात निर्मलाजी सुंदर ‘आसामी गमछा’ विणत. तो राजभवनातल्या एका कर्मचार्‍याने बघितला. तसा गमछा त्याने बनविणे सुरू केले आणि तामिळनाडूतून ‘गमछा’ बनून आसामात विक्रीस येणे सुरू झाले. आज ‘असमिया गमछा’ची मोठी मागणी आहे. त्याने मोठे व्यवसायाचे रूप धारण केले आहे.
या वंदनीय महनीय व्यक्तींनी केलेले कार्य, समस्येशी केलेला संघर्ष, दूरदृष्टी, राजकीय मतभेदांच्यावर उठून ‘भारत राष्ट्र प्रथम’ या भूमिकेत राहून राष्ट्रीय एकता मजबूत केली. आसामसारख्या दूरवरच्या प्रदेशाची देशाशी नाळ बांधून ठेवली. त्यांच्या प्रकाशात आपल्याला मार्ग सापडू शकेल. म्हणूनच त्यांचे स्मरण!
9890489978