जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज!

    दिनांक :07-Jan-2020
अमेरिकेने, इराणचे अध्यक्ष अयातुल्ला अली खामनेई यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे तसेच इराणी लष्कराचा भाग असणार्‍या कुदुसचे प्रमुख मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारल्यानंतर दोन देशांतील तणाव आणखी वाढला आहे. इराणने सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याचा इशाराही दिला आहे. इराणच्या बदल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इराणमधील 52 ठिकाणांवर प्रतिहल्ला करण्याचा इशाराही अमेरिकेने दिला आहे. परिणामी, अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
जग तिसर्‍या महायुद्धाच्या जवळ पोहोचल्यासारखे दिसते आहे. आता फक्त सुरुवात कोण करतो, त्यावर तिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. एकदा ही ठिणगी पडली, तर त्याचा वणवा व्हायला फारसा वेळ लागणार नाही, त्यामुळे संपूर्ण जगाने धास्तावणे स्वाभाविक आहे. मुळात आज जग इतके छोटे झाले आहे की, एका देशाला सर्दी झाली की दुसर्‍या देशाला शिंक येते. त्यामुळे दोन देशांतील युद्ध हे युद्ध राहात नाही, तर ते महायुद्ध होऊन जाते. युद्ध सुरू करणे सोपे असते, पण ते थांबवणे कठीण. सुरू करणार्‍याच्या हातातही नंतर युद्ध थांबवणे राहात नाही. मुळात सध्या युद्धाचे स्वरूपच बदलले आहे. आधी युद्ध तलवारीने लढले जायचे, नंतर ते बंदुकीमार्गे एके 47 वर आले आता तर ते त्याच्याही वर गेले आहे, म्हणजे अण्वस्त्र आणि रासायनिक युद्धाच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अशा युद्धातून होणारी प्राणहानी प्रचंड असते. त्यामुळे युद्ध टाळण्याचा बहुतांश जगाचा प्रयत्न असतो. मात्र, काहीवेळा युद्धाची खुमखुमी असलेले देश युद्ध करण्यासाठी समोरच्याला भाग पाडतात, अमेरिकेची ताजी कृती त्याच मालिकेतील आहे. याचा अर्थ, इराणची संपूर्ण वागणूक सभ्यपणाची आणि संयमाची होती, असे नाही.
 

agralekh 7 jan_1 &nb
अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य युद्धात कुणी ठरवले तरी त्याला तटस्थ राहता येणार नाही, जगातील देशांना एकतर अमेरिकेची बाजू घ्यावी लागेल वा इराणची. या युद्धात तटस्थ राहणार्‍या देशांची संख्या मूठभर राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या दोन देशांतील युद्धाचा फटका जसा अमेरिकासमर्थित देशांना बसणार आहे, तसा तो इराणसमर्थित देशांनाही बसणार आहे. यातून तटस्थ समजणार्‍या देशांचीही सुटका होणार नाही. युद्धाच्या ज्वाळांचे चटके तटस्थ म्हणवणार्‍या देशांनाही बसल्याशिवाय राहणार नाहीत. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध झाले तर संपूर्ण जग त्यात होरपळून निघणार आहे. त्यामुळे भारतानेच तणावाच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी, इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ तसेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्याशी चर्चा करत, दोन्ही देशांना शांततेचे आणि संयमाचे आवाहन केले आहे. इराण आणि अमेरिका हे दोन्ही देश भारताचे मित्र आहेत. अमेरिकेशी भारताचे असलेले मैत्रिपूर्ण संबंध लपलेले नाहीत, तर इराणही भारताचा जुना मित्र आहे. या जुन्या संबंधातूनच इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्याची जबाबदारी भारताने उचलली आहे. त्यामुळे भारताने तिसर्‍या महायुद्धाची चाहूल लागताच या दोन देशांशी संपर्क साधण्याला महत्त्व आहे. इराण हा देश अण्वस्त्रसज्ज आहे की नाही, याची खात्रीपूर्वक माहिती नाही. मात्र, इराण अण्वस्त्रसज्ज देश असेल, तर या युद्धाचे अतिशय घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांनी संयमाने वागण्याची गरज आहे. युद्धखोरीची भाषा दोन देशांतीलच नाही तर जगातील तणाव वाढवणार आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अमेरिकेने केलेल्या अणुहल्ल्याचे परिणाम जपानमधील त्या दोन शहरांनाच नाही, तर जगालाही आतापर्यंत भोगावे लागत आहेत. कासीम सुलेमानी यांना ठार मारण्याच्या आपल्या कृतीचे अमेरिकेने समर्थन करणे स्वाभाविक आहे. अमेरिकी दूतावासावर तसेच अमेरिकन नागरिकांवर हल्ले करण्याचे षडयंत्र कासीम सुलेमानी यांनी रचल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तो जसा नाकारता येणार नाही, तसेच खरा असल्याचेही आता सिद्ध करता येणार नाही. मात्र, अमेरिकेची सुलेमानी यांना ठार करण्याची कृती प्रक्षोभक ठरते. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून कुख्यात अतिरेकी ओसामा बिन लादेनची हत्या केली होती. मात्र, अमेरिकेची ती कृती आणि ही कृती यांची तुलना होऊ शकत नाही. कारण, ओसामा बिन लादेन हा कुख्यात अतिरेकी होता, तर कासीम सुलमानी हे अतिरेकी नव्हते. इराणच्या लष्करातील कमांडर होते. अमेरिकेला त्यांची भूमिका मान्य नसल्यामुळे त्यांना ठार मारण्याचा नैतिक अधिकार हा अमेरिकेला मिळत नाही. अमेरिकेच्या इराणसोबतच्या युद्धात कासीम सुलमानी मारले गेले असते तर प्रश्न नव्हता, अमेरिकेवर त्याचा दोष आला नसता. पण, अमेरिकेने आपल्या युद्धपूर्व कारवाईत सुलेमानी यांना लक्ष्य करून ठार मारले. त्याचा बदला घेण्याची कृती इराणने करण्यापूर्वी वा त्याला तशी संधी मिळण्यापूर्वीच इराणला धमकावण्यासाठी अमेरिकेने इराणमधील 52 प्रमुख शहरांवर अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या साह्याने हल्ला करण्याचा इशाराही दिला आहे. अमेरिकेची वागणूक ही तशी नेहमीच स्वत:ला जगाचा पोलिस असल्यासारखी राहिली आहे. दुसर्‍या देशाच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची तशी अमेरिकेची जुनी सवयच आहे. मात्र, अमेरिकेच्या या भूमिकेला आता त्याच्या देशातच विरोध सुरू झाला आहे. जगातील प्रत्येक घडामोडीत आपण नाक खुपसलेच पाहिजे, असे नाही, असे आता अमेरिकेतील जनता म्हणू लागली आहे. मध्यंतरी अमेरिकेत एक सर्वेक्षण झाले होते, त्यात जगातील प्रत्येक घडामोडीत हस्तक्षेप करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेचे फक्त 27 टक्के लोकांनी समर्थन केले होते. उर्वरित 73 टक्के लोकांनी याचा विरोध केला. या भूमिकेमुळे जगभरातील अमेरिकेतील लोकांचा जीव धोक्यात येतो, अशी याला विरोध करणार्‍यांची भूमिका होती. 1950 च्या दशकात अमेरिकेने इराणमधील लोकनियुक्त सरकार उलथवून लावत आपल्या सोयीचे सरकार तेथे आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोन देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला होता. आपल्या राजकीय फायद्यासाठी अमेरिकेच्या याआधीच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणमधील धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांच्याशी गुप्त करार केल्याचीही चर्चा होती.
 
इराणवरील अमेरिकेच्या कारवाईत एक योगायोगही दिसतो. ज्या ज्या वेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग प्रस्ताव येतो, त्या वेळी अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई केली. याआधी 1998 मध्ये अमेरिकेने अध्यक्ष बिल क्लिटंन यांनी इराणवर लष्करी कारवाई केली, यावेळीही महाभियोगाची कारवाई सुरू असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई केली. खुद्द अमेरिकेतच ट्रम्प यांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या वर्षी अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या डोळ्यांसमोर ठेवून ट्रम्प यांनी ही कारवाई केल्याचा लोकांचा आरोप आहे.
अमेरिकेतील अनेक शहरांत युद्धविरोधी निदर्शनेही सुरू झाली आहेत. युद्धाने कुणाचेच भले झाले नाही आणि होणार नाही, याची अमेरिकेतील जनतेला खात्री पटली आहे. त्यामुळेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धाचे मनसुबे हाणून पाडण्याचे प्रयत्न अमेरिकेत सुरू झाले आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवास या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे फलक या लोकांच्या हातात आहेत. मुळात आज जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाची गरज आहे! बुद्धाने दाखवलेल्या शांततेच्या मार्गानेच जगाचे हित आहे. भारत याच भूमिकेचा सातत्याने पुरस्कार करत आला आहे. याची जाणीव अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश ठेवतील आणि तिसर्‍या महायुद्धापासून जगाला वाचवतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही...