उद्याच्या मोहोंजोदडोचं वर्तमान...

    दिनांक :09-Jan-2020
 ऊन-सावली 
 
 
गिरीश प्रभुणे
 
 
सुखदा, कोंडाग्राम जवळच्या एका आश्रमातील कार्यकर्ती. कल्याण आश्रमाच्या बुधरी ताती या आश्रमाच्या प्रमुख. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरच्या या महिला आश्रमाची सुरवात भास्करराव कळंबींनी केली होती. नक्षलग्रस्त भागात येथील महिलांचा भाऊ-वडील-पती, कुणी ना कुणी दलम्‌-संघम्‌ मध्ये होते. नक्षलवाद्यांची ही सैन्यदले सशस्त्र होती. संन्यस्तपणे काम करणार्‍या या महिला-मुली बंदुकीला राखीने उत्तर देत होत्या. काही लाख राख्या बांधून संवाद साधला होता त्यांनी.
डॉ. राम गोडबोले आणि सुनीता यांच्या संपर्कातून मी प्रवास करीत होतो. मोठमोठे वृक्ष. त्यांच्या गळालेल्या पानांचं एक आच्छादन सर्वत्र पसरलं होतं. या झाडांच्या मधून वाट जात होती. विविध पक्ष्यांचे आवाज. त्यांच्या पंखांचं फडफडणं आणि पाण्याचं अविरत खळ्‌खळ्‌ वाहणं. आंब्याच्या झाडांना आंबे लगडले होते. बेलांच्या झाडांना तांब्याएवढी मोठी बेलफळं लोंबकळत होती. मध्येच एका झर्‍याजवळ पाच-पन्नास तरारून आलेलं केळीचं बन लागलं. हिरव्या जर्द लांब पानांच्या मधून केळांचे रसरशीत घड. केळफुलं. केळीचे तुकतुकीत खोड. सारंच अवर्णनीय.
‘‘ही कुणाची बाग...’’
‘‘ये सबकी। याने किसीकी भी नही। भगवान की। तीरथरात्री या प्रवासी खा सकते हैं। बाकी यहॉं तो हरेक के पास ऐसी बाग होती हैं।’’ सुखदाच्या उत्तराने मी थबकलो. ही तर ‘देवराई’!
मी तिला विचारलं-
‘‘या जमिनीला काय म्हणतात?’’
‘‘माता का वन...’’
सगळ्यांची आई. जन्मदात्री तीच. त्यामुळे ते ‘माता का वन’! पुढे जाता जाता एका गावाजवळ, देवळाजवळ दोन, आठ फुटांची विटांची ढासळत आलेली बांधकामं होती. गोल आकाराची.
‘‘हे काय आहे?’’
‘‘ती भट्‌टी आहे. लोहा, तांबे बनाने की...’’
‘‘कौन बनाते थे... और कैसे?’’ माझी उत्सुकता आता अधिक शिगेला पोहोचली.
‘‘या बंद आहेत. खूप जुन्या आहेत. शंभर वर्षांपूर्वी बंद पडल्या. हमारे गॉंव में बनाते है। हम जहॉं जा रहे हैं वहॉं...’’
थोडं चालल्यावर एक वस्ती लागली. काही मातीच्या घरांवर कौलं होती, तर काहींच्या घरावर गवत होतं. कौलं गोल पन्हाळीची. कुंपणाचा अडणा बाजूला सारून आम्ही अंगणात आलो. आमच्या मागोमाग काही महिला-मुली आपापल्या डोक्यावर वेताच्या उभट टोपल्या घेऊन आल्या. त्या टोपल्यातून माती होती. खडे-खडे असणारी मुरमाड अशी माती होती. त्या टोपल्यांची वीण फार सुरेख होती. गवताची एक दहा-बारा काड्यांची बारीक जुडी. चारएक फूट लांबीची. त्यातील प्रत्येक काडीचा या वीणीसाठी उपयोग केलेला. या टोपलीची जाळी खूप बारीक लहान आकाराची होती. पंचकोनी-षट्‌कोनी, त्रिकोणी, गोल असे जाळीचे प्रकार होते. या बाया-मुलींची बोटे जलदगतीने एखाद्या यंत्राप्रमाणे चालत होती. गरजेप्रमाणे या वस्तू बनत असत. कोलाम-कातकरी, कोकण गोंड या गवताच्या वस्तू बनवतात. ‘दर्भ’ या गवताच्या प्रकाराचं हे गवत. लवचिक. न तुटणारं. याचे झोपाळे, झोळ्या, अगदी फार पूर्वी कपडेसुद्धा बनवत असत. वल्कलं कुश गवतांची. घरं चटयांची. धातूच्या शिरस्त्राणाच्या आत या गवताचं अस्तर असे. त्यावर कोसा-रेशमाचं वस्त्र-अस्तर. पूर्वी याच्या चटया, टोपल्या घरांघरांत दिसत असत. त्याची जागा प्लॅस्टिकनं घेतली. एका काडीचं, गवताचं हे वर्तमान!
सुखमन कश्यप-सुखदा, बुधरी ताती अशा अनेकांच्या घरी जाण्याचा योग आला. सर्वत्र हीच समृद्धी. कलेची, ज्ञानाची. भाषेतला गोडवा. माडिगा-कोलाम गोंड यांचं बोलणं-चालणं-वावर झर्‍यासारखं. पाखरांच्या चिवचिवाटासारखं. बांगड्या िंकवा घुंगरांच्या किणकिणण्यासारखं. कपड्यांना जशी वेलबुट्‌टीची किनार, तशी यांच्या बोलण्याला, संवादाला एका नाजुक सुरावटीची किनार होती.
 
 
sampadakiy 9 jan_1 &
आम्ही इतके जण आलेलो पाहून लगेच एक जण जात्यावर बसली. एकीनं चुलीवर पाण्याचं आधण ठेवलं. दोन मुली बाहेरच्या अंगणातील भट्‌टी साफ करून ती त्यांनी सुलगावली. आम्ही चटईवर बसलो. एकीनं पाण्याचा, मातीच्या सुरईसारखा दिसणारा माठ आणून ठेवला. एक मध्यमवयीन महिला द्रोण, पत्रावळी बनवायला बसली.
एका चुलीवर भात शिजत होता, तर दुसरीवर बांबूच्या कोवळ्या कोंबांचं कालवण. त्यात शिंगाड्याचे कंद, मक्याची कणसं, कसलासा हिरवा पाला आणि काळे मीठ. भात झाल्यावर तांदळाच्याच भाकरी करायला घेतल्या. या तांदळात थोडं मुगाचं पीठ मिसळलं होतं. कोपर्‍यात दोन-तीन माठ होते. त्यातल्या एकातून द्रोणात वेगळंच लोणचं होतं. काही अख्या लहान कैर्‍या, काही अर्ध्या कापलेल्या कोईसहित, मोहरीचं तेल, हळदीचे तुकडे बारीक केलेले आणि काळ्या मिठाचे खडे बारीक बारीक, तसेच गुळाचे खडे. या सगळ्या भोजनाची चव, गोडी अवर्णनीय होती.
 
बाहेरच्या भट्‌टीत मातीचे खडे टाकले होते. धातूच्या तीन भट्‌ट्यांवर हळूहळू ती माती विरघळू लागली. त्याचा रस तयार होऊ लागला. आम्ही आश्चर्याने पाहू लागलो. अडीच-तीन फुटांची भट्‌टी. गोलाकार तळात एका बाजूने कोळसा-लाकडं घालायला जागा. त्याच्यावर मूस ठेवायला जागा. मूस कोळशातच कढईच्या आकाराची. एका बाजूला पन्हाळ असलेली. मातीचे खडे त्यात टाकले होते. साधारणत: पाऊण-एक तासात मातीची ढेकळं विरघळू लागली. त्याचं रसात रूपांतर झालं. तो रस मातीच्या गोल भाजलेल्या वाडग्यात जमा होऊ लागला. मोठ्या वाडग्याच्या आकाराचे लोखंडाचे गोल अर्धवर्तुळाकार गोळे तयार झाले. हे लोखंड कच्चं. प्रथम तयार झालेलं. याला लोहार-गाडी लोहार गरम करून त्यांना पाहिजे तो आकार देतात.
मी आश्चर्याने पाहात होतो. किती छोट्या जागेत, अगदी सहजतेने या महिलांनी हे काम केलं होतं. त्यांच्या जोडीला त्यांचे पुरुषही होते. दोघांमध्ये ज्ञानात, क्षमतेत काहीच फरक नव्हता.
मी त्या बाईंना विचारलं-
‘‘हे कसं समजलं की याच्यात लोखंड आहे?’’
‘‘सीधी तो बात है। मेरी मॉंके साथ मैं जाती थी, तो मुझे मालुम हुआ। हप्ते में एक-दो बार तो लेकर आतेही हैं हम। यहॉं के आठवडी बाजार में इसके हथियार, बर्तन बनाकर लेके आते हैं कारागिर...’’
दुसर्‍या दिवशी बाजार होता.
 
सुखदाचं घर आता जरा निवांत बघू लागलो. विटांच्या जोत्यावर एक फूटच उंचीवर चारी बाजूने मातीची दीड-दोन फुटांची िंभत होती. त्यावर कुडाची िंभत होती. आतून-बाहेरून िंलपलेली. पांढर्‍या मातीची. त्यावर बांबू आणि सागवानाचं छप्पर होतं. छपरावर जाडसर बांधलेलं तेच कुश गवताचं छप्पर. सर्वत्र शेणानं नितळ सारवलेलं! जमीन चोपून गुळगुळीत केलेली. त्यावर बांगड्यांच्या-कपबशीच्या काचांची वेलबुट्‌टीदार नक्षी. जात्याजवळच दोन-तीन कणग्यांतून साळ भात ठेवलेला. त्या कणग्या बांबू आणि गवताच्या नाजुक कलाकुसरीच्या वीणीच्या. त्याच्या जवळच तांदूळ घ्यायला एक, दोन शेराची-तीनएक किलोची रोळणी. तांदूळ यातून धुवून घेऊन शिजायला घालतात. भात शिजवायला ठोक्याचं तांब्याचं तपेलं होतं. दोन-तीन किलो भात शिजेल असं. काशाची भांडी, ताटं, वाट्या, पातेली. सारं घडीव.
 
याशिवाय छपराच्या आढ्याला एक बांबू टांगलेला होता. त्याला पांढरे कांदे, लाल कांदे, आलं, हळद, लसूण, लाल भोपळे, दुधी भोपळे, कोहळे. समोरच्या पडवीत एका बाजूला उखळ. उखळीजवळ दोन जाती. जात्यांच्या जवळ दोन मोठ्या लाकडी पराती. खुंटी ठोकायचे गोल दगड. त्याच्या अलिकडे अनेक प्रकारच्या बिया वाळत ठेवलेल्या. त्यांच्या शेजारी मोहाची फुलं, बिब्बे, वाळवलेले आवळे, कैर्‍या, आमसुलं. या सगळ्यांच्या शेजारी छोट्या कणग्यातून ते ते साहित्य भरून ठेवलेलं. आम्ही बसलो होतो त्याच्या जवळ सहा-सात दगडी वेगवेगळ्या आकाराचे खलबत्ते होते. त्याच्याजवळ माठ होते. माठावर मातीची झाकणं होती. काही माठांची तोंडं स्वच्छ फडक्यांनी बांधलेली होती. कोपर्‍यात एक छताला टांगलेल्या दोरीला आडवी अडीच-तीन फुटांची काठी होती. त्याला पुढे सुताचे धागे बांधलेले होते. मी चकितच झालो. हा कापड विणण्याचा माग होता. पूर्वांचलात घराघरात असतो तसाच. पूर्वी या भागात कोसा-रेशीम होत असे. बाहेर अंगणाला काठ्यांचं कुंपण होतं. त्या कुंपणावरही विविध प्रकारचे वेल चढलेले होते. शेजारीच गोठा होता. त्यात आठ-दहा गाई होत्या. एक समृद्ध घर होतं. ही समृद्धी बँक कर्जामुळे िंकवा सरकारी योजनांमुळे अथवा गावात असलेल्या शाळेमुळे आली नाही. इथला समाज अनादी काळापासून सार्‍या विश्वाशी जोडलेला होता. येथील तांब्याची भांडी, काश्याची भांडी, लोखंडाची शस्त्रे यांना खूप मागणी होती. निसर्गचक्राशी समन्वय साधून येथील समाजाने स्वत:चा सर्वांगीण विकास करवून घेतला होता. युद्ध कौशल्यातही ते अग्रणी होते. गेल्या दीड-दोनशे वर्षांत यांचं कमालीचे शोषण झालं. यांचं वन-जंगल, इंग्रजांनी कायदा करून सरकारचं केलं. येथील पहाडातून अनेक प्रकारची खनिजं निघतात. येथील धातूच्या- सोनं, तांबं, लोहाच्या भट्‌ट्यांचे अवशेष, यांच्या ज्ञानावर आधारित प्रगतीची ग्वाही देतात. इथल्याच कारागिरांनी दिल्ली-सारनाथ येथील लोकस्तंभ उभारले.
 
त्याचे अवशेष जिवंत माझ्यासमोर होते. इथं एक चालता बोलता इतिहास- मोहोंजोदडोकालीन, सरस्वतीकालीन संस्कृती आजही नांदतेय्‌. इथल्या लोकज्ञानाची उपेक्षा करून त्यांना आधुनिक बनविण्याचा जणू शासनाने विडाच उचललाय्‌. इथं अशी विद्यालये हवीत की जे ज्ञान यांच्याजवळ आहे त्याचा विकास होईल.
दुसर्‍या दिवशी बाजार होता. मी त्यांच्याबरोबर बाजारात गेलो. बाजारात त्या भागाच्या समृद्धीचं दर्शन घडत होतं. हातसडीचे तांदूळ-दाळी. खादीचं सुती कापड. साड्या-धोतरे, स्वयंपाकघरातील भांडी. शेतीची अवजारे. घाण्यातून गाळलेले खाद्य मोहरीचं तेल, मोहाच्या बियांचा साबण. विविध प्रकारचा भाजीपाला. उत्तम प्रतीच्या वस्तू बाजारात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी इथं बॉम्बस्फोट झाले होते. त्यामुळे फौजफाटा, बंदोबस्तही होता. शिक्षणानं आणि आधुनिक विकासामुळे विस्थापित होत नष्ट होणारं ज्ञान, लुप्त होणारी एक विलोभनीय संस्कृती पाहून, अस्वस्थ होण्यापलीकडे आपण काय करू शकतो...?