जनसेवा करणे हाच माझा छंद

    दिनांक :09-Jan-2020
 
vikas thakre 1_1 &nb
 
 
शहर काँग्रेस अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांचा निर्वाळा
तभा थेट भेटमध्ये मनमोकळा संवाद
 
 नागपूर, 
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद असतो. कसलाच छंद नाही अशी व्यक्ती सापडणे विरळाच! जनतेची कामे तडफेने करणे मला फार आवडते. हा एक प्रकारे माझा छंदच आहे. आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात छंद मला आनंद मिळवून देतात. या छंदामुळे मला खरी ओळख मिळाली, जगण्याचा अर्थ अन्‌ समाधानही मिळते, असे प्रतिपादन काँग्रेस चे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी केले.
 
दैनिक तरुण भारतच्या थेट भेट कार्यक्रमात आमदार विकास ठाकरे यांनी संपादकीय विभागातील सहकार्‍यांशी मनमोकळा संवाद साधला. प्रारंभी शहर संपादक चारुदत्त कहू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, तभा दिवाळी अंक भेट देऊन स्वागत केले. नागपूरचे महापौर राहिलेले देवेंद्र फडणवीस, प्रा. अनिल सोले हे आमदार झाले. त्यानंतर महापौर राहिलेले विकास ठाकरे यावर्षी आमदार झाले. आमदार निवडून द्या, नगरसेवक फ्री देतो, असे त्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेला सांगितले होते. ते आता कृतीत उतरवीत आहो, असे आ. ठाकरे म्हणाले.
 
रस्ते, वीज, पाणी या मूलभूत समस्या आहेत. मात्र काही आमदार ही कामे नगरसेवकांची असल्याचे सांगून टाळाटाळ करतात. परंतु, मी अशा कामांना प्राधान्य देतो. मी नेता नव्हे तर अजूनही कार्यकर्ताच आहे. सामाजिक कार्याची सुरुवात केली तेव्हा आमदार बनेल, असे वाटले नव्हते. मात्र, मतदारांनी मला जनसेवा करण्याची संधी दिली. या संधीचे मी सोने करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. कविवर्य सुरेश भटांच्या ‘रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा’ ही कविता ते आचरणात आणत आहेत. इतर आमदारांपेक्षा आपला वेगळा ठसा उमटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 
 
vikas thakre 1_1 &nb
 
पश्चिम नागपूर हा माझा मतदारसंघ असला तरी ‘सबके लिए है खुला मंदिर मेरा’ या उक्तीनुसार शहरातील सहाही मतदारसंघातील लोकांची कामे ते हिरिरीने करीत आहेत. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून लोकांच्या कामांसाठी धावून जाण्यातच मला आनंद मिळतो. मित्र जोडणे ही माझी खासीयत आहे. त्यामुळे शहरात मित्रांचा मोठा गोतावळा निर्माण झाला आहे. महालक्ष्मी फाऊंडेशनच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक कार्य करीत असतो. गरजूंना सर्वोपरी मदत करताना गरिबांच्या मुलींचे विवाह फाऊंडेशनतर्फे लावून दिले जातात. मात्र, याची कुठेही वाच्यता अथवा प्रसिद्धी केली जात नाही. 2002 साली नागपूरचा महापौर झाल्यानंतर माझ्याच वॉर्डातील 12 हजार लोकांची घरे तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. तत्कालीन मु‘यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे विनवणी करून ही घरे वाचविली होती. त्यातूनच पुढे विकास कामे करण्याची ऊर्जा मिळाल्याचे आ. विकास ठाकरे यांनी सांगितले.
 
नागपूर काँग्रेस मुक्त करण्यात भाजपा अपयशी
गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने विकास कामांचा खूप गाजावाजा केला. प्रत्यक्षात मात्र सामान्य जनतेचा फायदा झाला नाही. वीज, पेट्रोल, डिझेल, टॅक्सचे दर वाढले. मिहान जैसे थे आहे. मेट्रोची गरज नसताना ती आणली. परिणामत: आज ती रिकामी धावत आहे. अच्छे दिन दिवास्वप्न ठरले, हेच आम्ही निवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान जनतेला पटवून दिले. त्यामुळे शहरातून काँग्रेस चे दोन आमदार निवडून आले. मध्य आणि दक्षिण नागपूरची जागा थोड्या फार फरकाने गेली. अन्यथा शहरातील चित्र वेगळे राहिले असते. मात्र ज्यांनी पक्ष वाढविण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही, त्यांना पक्षाने बरेच काही दिले आणि पक्षवाढीसाठी झटणार्‍यांना काहीच मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 
काँग्रेस मध्ये गटबाजी
काँग्रेस मध्ये काम करणारा एक गट तर काहीच न करणारा दुसरा गट आहे. काहीही न करणारा हा गट काम करणार्‍यांचा विरोध करीत असतो, असे सांगून आ. ठाकरे यांनी काँग्रेस मध्ये गटबाजी असल्याचीच कबुली दिली.
 
नवीन काँग्रेस भवन उभारणार
बहुतांश राजकीय पक्षांची स्वतंत्र पक्ष कार्यालये तयार झाली. मात्र काँग्रेस पक्षाला शंभर वर्षांचा इतिहास असूनही त्याचे कार्यालय देवडिया भवनात आहे. हे भवन व्यवस्थेच्या दृष्टीने तोकडे पडत असून, तेथे पार्किंगचीही व्यवस्था नाही. त्यामुळे काँग्रेस मंत्र्यांच्या सहकार्याने नवीन काँग्रेस भवन बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आ. ठाकरे यांनी दिली.
 
रस्ते, वीज, पाण्याला प्राधान्य
पश्चिम नागपुरात अनेक वस्त्या अजूनही अविकसित आहेत. पावसाळ्यात तर चिखलामुळे घराबाहेर पडणे कठीण असते. वाहने हातात घेऊन पायी जावे लागते. त्यामुळे रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणार आहे. मिहानमध्ये उद्योग आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. जनतेकडून प्राप्त पत्रांचा गठ्ठा दर मंगळवारी होणार्‍या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी संबंधित मंत्र्यांना देऊन त्या समस्यांचा निपटारा करीत असल्याचे आ. विकास ठाकरे यांनी शेवटी सांगितले.