हाथरसचे राजकारण!

    दिनांक :11-Oct-2020
|
- गजानन निमदेव
दलितांचे कैवारी आम्हीच आहोत, पीडितेप्रती सहानुभूती फक्त आम्हीच दाखवली आहे. आमच्याशिवाय त्यांचे कुणी वाली नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न लाजिरवाणा आहे. घडलेल्या घटनेला जातीय रंग द्यायचा, राजकारण करायचे आणि स्वत:चा संकुचित स्वार्थ साधायचा, हा राजकीय नेत्यांचा गोरखधंदा कायमचा बंद पाडण्याची वेळ आली आहे. दलित आणि पीडित कुटुंबाची चिंता फक्त आम्हालाच आहे, हे देशाला दाखवण्याच्या प्रयत्नात ज्यांनी राजकीय तमाशा सादर केला तो अभूतपूर्व असाच होता. हाथरसच्या, बहीण-भावाच्या दौर्‍याला राजकारणाचा घाणेरडा वास होता. प्रकरण संवेदनशील होते, तणाव निर्माण होऊ नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उत्तरप्रदेश सरकारने हाथरसला जाण्यापासून राजकीय नेत्यांना बंदी घातली होती. पण, बहीण-भाऊ अडूनच बसले होते. त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायचीच होती. उत्तरप्रदेश सरकारचे सगळे निर्बंध झुगारून हे बहीण-भाऊ आपला सगळा लवाजमा घेऊन हाथरसकडे रवाना झालेच. पोलिसांनी अडवल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला. ढकलाढकली झाली. धक्काबुक्कीही झाली. त्यात भाऊ खाली पडला. असे म्हणतात की, भाऊ जाणूनबुजून खाली पडला. झाले, माध्यमांनी छोट्या पडद्यावर दिवसभर भाऊ खाली कसा पडला तेच दाखवले. बहिणीनेही आक्रोश केला.
 

andola_1  H x W 
 
शेवटी दुसर्‍या दिवशी सरकारने या भावा-बहिणीला पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याची अनुमती दिली. तासभर हे बहीण-भाऊ पीडितेच्या घरी होते. मदतही केली म्हणतात. चांगली गोष्ट आहे. देशात जिथे कुठे अशा घटना घडतात, त्या प्रत्येक ठिकाणी हे बहीण-भाऊ पोहोचले आणि त्यांनी पीडित कुटुंबांचे सांत्वन केले, त्यांना आर्थिक मदत केली, तर भविष्यात बहीण-भावाचे सरकार सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. पण, असे कधी होईल, याची शक्यता दिसत नाही. ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे आणि घटना दलित कुटुंबाच्या बाबतीत घडली आहे, अशाच ठिकाणी हे बहीण-भाऊ आणि त्यांचे पाठीराखे भेटायला जातात, हे वास्तव नाकारता येईल का? मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या असंख्य घटना देशाच्या विविध भागात दररोज घडत असतात. पण, त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. बहीण-भावाच्या पक्षाला पीडितांची एवढीच काळजी आहे, तर त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत सगळीकडे मदत पोहोचवली पाहिजे. पण, हे असे करणार नाहीत. कारण, प्रत्येक ठिकाणी यांना राजकीय फायदा मिळत नाही. जिथे राजकीय फायदा नाही, तिथे कशाला जायचे? 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये जनतेने यांना यांची जागा दाखवून दिल्यानंतरही हे सुधरायला तयार नाहीत. छत्तीसगढ, पंजाब, राजस्थानसारखी दोन-तीन राज्ये सोडली, तर देशातील बहुतांश राज्यांमध्ये यांनी सत्ता गमावली आहे. लोकसभेत यांना विरोधी पक्षनेतेपद मिळेल एवढेही संख्याबळ जमवता आले नाही. देशातील सर्वाधिक जुन्या राजकीय पक्षाची ही अवस्था आताचे अकार्यक्षम, अपरिपक्व नेतृत्व आणि या नेतृत्वाला भरकटवणारी त्यांच्याभोवतीची चौकडीच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.
 
 
मागे उत्तरप्रदेशातल्याच दादरी येथे एक प्रकरण घडले होते. अखलाख नावाच्या तरुणाची हत्या झाली होती. त्याची हत्या का झाली, कारण काय होते, हे काहीही जाणून न घेता भाऊ दादरीला गेला होता. सोबत पक्षाच्या नेत्यांनाही घेऊन गेला होता. तेव्हाही प्रकरणाला जातीय, सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. पण, नंतर जेव्हा घटनेमागचे वास्तव समोर आले, तेव्हा यांचे राजकीय कपडे टराटरा फाटले. यांचे पितळ उघडे पडले. खरे रूप जनतेपुढे आले. असेच हैदराबादच्या घटनेनंतरही घडले होते. रोहित वेमुलाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणालाही या भावाने जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. भावना भडकावून जनमत आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करून पाहिला. यांच्यातली संवेनदशीलता देशात घडणार्‍या प्रत्येक घटनेबाबत का जागृत होत नाही? काही विशिष्ट प्रकरणांमध्येच यांची संवेदनशीलता का जागृत होते आणि हे का हाथरससारख्या ठिकाणीच फक्त पोहोचतात, याचा विचार देशवासीयांनी केला पाहिजे. दादरी, हैदराबादनंतर आता हाथरस यांच्यासाठी जणू तीर्थक्षेत्र बनले आहे. पीडित कुटुंबाला भेटण्याची आणि त्यांना मदत करण्याची जणू स्पर्धा लागली आहे यांच्यात. यांच्या तीर्थयात्रेने देशातील वातावरण गढूळ करून टाकले आहे. जनता मूर्ख नाही. जनतेला सगळे कळते आणि वळतेही. म्हणूनच तर जनतेने देश सुरक्षित हाती सोपविला आहे. पण, तरीही हे त्यावरून धडा घ्यायला तयार नाहीत. आपली नौका हे लोक दिवसेंदिवस खोल पाण्यात नेताना दिसत आहेत आणि ही नौका यांच्यासह कधी बुडेल, हे यांनाही कळणार नाही बघा!
 
 
आपल्याकडची काही टीव्ही चॅनेल्स अशी आहेत, ज्यांची संवेदनशीलता या बहीण-भावाप्रमाणेच काही विशिष्ट प्रकरणांमध्येच का जागृत होते, हाही प्रश्नच आहे. याचे उत्तर आपण त्यांना विचारले तर ते म्हणतील, आमची मर्जी. काय दाखवायचे आणि काय नाही, हे ठरवण्याचा अधिकार आमचा. बहुतांश चॅनेल्सना घटनेशी काही घेणेदेणे नसते. त्यांना हवा असतो टीआरपी. टीआरपी वाढवण्याच्या नादात आपण प्रेक्षकांना काय दाखवतो आणि ऐकवतो आहोत, दिशाभूल करतो आहोत की सत्य स्थिती सांगतो आहोत, भ्रम पसरवतो आहोत की जागृत करतो आहोत, त्याचे भान या चॅनेलवाल्यांना नसते. मध्यंतरी रिया चक्रवर्ती, कंगना राणावत यांच्या संदर्भात या चॅनेलवाल्यांनी जे काही दाखवले, ते थोडे होते की काय म्हणून यांनी दीपिका, श्रद्धा, सारा यांच्या बाबतीतही नुसता धुमाकूळ घातला होता. देशातल्या सगळ्या समस्या संपल्या आहेत, काहीही महत्त्वाचे दाखवण्यासारखे नाही, या थाटात हे लोक नट्यांच्या मागे लागले होते. नटी घरात काय करते आहे, तिची मानसिकता काय आहे, ती किती वाजता घराबाहेर पडणार, कोणत्या कारमधून बाहेर जाणार, कपडे कसे घातले आहेत, चेहर्‍यावरचे भाव कसे आहेत, तणावात आहे की आनंदी आहे... अशा अनेक अंगांनी बातमी दृश्यस्वरूपात सादर करण्याचे कौशल्य या लोकांनी पणास लावले होते. किळस यावी एवढे ओंगळवाणे प्रदर्शन घडवण्यात काही दूरचित्रवाहिन्या आघाडीवर होत्या. शेवटी लोकांमधूनच अशा प्रतिक्रिया यायला लागल्या की, आता टीव्हीवर बातम्या बघायच्याच नाहीत. लोक सिनेमे आणि मालिका पाहणे पसंत करू लागले, तरीही यांना अंदाज आलाच नाही. टीआरपीच्या शोधात असलेल्या या वाहिन्यांना अखेर हाथरसची घटना हाती लागली आणि सगळे कॅमेरे हाथरसच्या दिशेने वळले. नंतर काय झाले हे संपूर्ण देशाने पाहिले.
 
 
शेतकरी विधेयके संसदेने पारित केलीत, राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केल्याने कायदा झाला. तो अंमलातही आला. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे. पंजाबमध्ये भावाच्या पक्षाची सत्ता आहे आणि ही सत्ता टिकविण्यासाठी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भावाला ट्रॅक्टरवर बसवून आंदोलन केले. राजधानी दिल्लीतही इंडिया गेटजवळ आंदोलन झाले. तिथे ट्रॅक्टर जाळण्यात आले. आमचे ट्रॅक्टर आहे आणि आम्ही ते जाळू नाही तर काहीही करू, असे बेजबाबदारपणाचे उत्तर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिले. ज्या बाबी शेतकर्‍यांच्या हिताच्या आहेत त्या यांना मान्य नाहीत. शेतकर्‍यांना हाताशी धरून सरकारविरोधात चिथावणी द्यायची आणि त्यांचे अधिक नुकसान कसे होईल, याची तरतूद करून ठेवायची, हाच यांचा धंदा आहे. तो बंद पाडणार्‍या पंतप्रधानांवर टीका करण्याची एकही संधी हे सोडत नाहीत. पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला बदनाम करायचे आणि जनतेत संभ्रम निर्माण करून निवडणुकीचे राजकारण करायचे, त्या माध्यमातून सत्ता मिळवता आली तर बघायचे, हा यांचा प्रयत्न आहे. पण, आता शेतकरीही हुशार झाला आहे. त्यालाही आपले बरेवाईट कशात आहे, हे कळते. त्यामुळे यांचा हा धंदाही तोट्यातच बंद पडणार, हे निश्चित! शेतकरी ज्या ट्रॅक्टरची पूजा करतो, तो ट्रॅक्टर जाळून यांनी शेतीसाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या एका महत्त्वाच्या औजाराचा अवमान केला आहे, याचा विसर पडता कामा नये.
 
 
हाथरसची दुर्दैवी घटना घडायलाच नको होती. पीडितेवर जो अत्याचार झाला तो व्हायला नको होता. तिला इतरांप्रमाणेच सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार होता. पण, दुर्दैवाने घटना घडली, त्याचे किळसवाणे राजकारण करण्याची आवश्यकता नव्हती. पण, सत्तेबाहेर अस्वस्थ असलेल्या मंडळींनी राजकारण केले. अजूनही करताहेत. कोणी कोणत्या प्रकरणात संवेदनशीलता दाखवावी आणि कोणत्या प्रकरणात दाखवू नये, हे आपण ठरवू शकत नाही. हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. तसे ते बहीण-भावाने आणि त्यांच्या समर्थकांनी ठरविले. ते हाथरसला गेले. पीडितेच्या कुटुंबीयांना भेटले. काय करायची ती मदत केली. त्याच्या शंभर पट राजकारण केले आणि दिल्लीला निघून गेले. हाथरस ज्या राज्यात आहे तिथे आपल्या विरोधी पक्षाचे सरकार आहे, पीडिता दलित आहे आणि आरोपी सवर्ण आहे, यावरून जर यांची संवेदनशीलता जागृत होणार असेल, तर हे आपल्या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. अत्याचाराची अशी घटना घडल्यानंतर राजकीय आणि सामाजिक संघटनांनी जात, धर्म पाहून संवेदनशीलतेचा परिचय द्यावा, यापेक्षा मोठे दुर्दैव कुठले असू शकते?
 
 
देशात मॉब लिंचिंगची घटना घडली की आक्रोश करणारे लोक, घटना कोणत्या राज्यात घडली आहे हे आधी पाहतात. घटना विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात घडली तरच आक्रोश करायचा, आवाज उठवायचा, त्या सरकारला बदनाम करायचे, संधी साधून लोकांना भ्रमित करायचे, हा उद्योग चालतो. अशीच मॉब लिंचिंगची घटना आपल्या पक्षाची वा आपल्या मित्रपक्षाची सत्ता असलेल्या राज्यात घडली तर हे लोक त्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. ज्या ठिकाणी गेल्याने आपले विरोधक बदनाम होतील अशाच ठिकाणी जायचे, जिथे जाऊन, आरडाओरड करून लाभ मिळणार नाही, अशा ठिकाणी ही तमाशेखोर मंडळी जात नाहीत. हा अतिशय भयंकर प्रकार आहे. तुकडे तुकडे गँगला संरक्षण देणारी ही मंडळी देशहित आडवे करायला सदैव तत्पर असते. काय म्हणायचे याला? हाथरसला जे घडले, त्यामागचे दोषी कोण आहेत हे तपासात समोर येईलच. पण, त्याआधीच कुणाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्याचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न घातक आहे. घटना दलित मुलीच्या बाबतीत घडली आहे आणि उत्तरप्रदेशात आपल्या विरोधी पक्षाचे सरकार असल्यानेच अशी घटना घडली, हे रंगवून सांगत द्वेषाचे राजकारण करणारे बहीण-भाऊ आणि त्यांची समर्थक चौकडी काय साध्य करू पाहतेय्, या प्रश्नाचे उत्तर देशाने जाणून घेतलेच पाहिजे. हाथरसचे प्रकरण सभ्य समाजाला लाजेने मान खाली घालायला लावणारे असले, तरी त्यामागचे राजकारण अतिगलिच्छ आहे!