देशद्रोही विधानासाठी फारूक अब्दुल्लांना धडा शिकवाच!

    दिनांक :15-Oct-2020
|
दिल्ली वार्तापत्र
- श्यामकांत जहागीरदार
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांचे डोके फिरल्याची शंका येते आहे. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मिरातून रद्द करण्यात आलेले 370 कलम पुन्हा लागू करून घेऊ, असे अब्दुल्ला एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत बरळले आहेत. शुद्धीवर असलेला कोणताही शहाणा नेता असे बोलू शकत नाही. तसेही अब्दुल्ला फार कमी वेळ शुद्धीत असतात. जेव्हा ते शुद्धीवर नसतात, असेच बरळत असतात. बोलण्यात आणि बरळण्यात फरक असतो. बोलण्यासाठी माणसाला थोडाफार विचार करावा लागतो, मात्र बरळताना कशाचीच खबरदारी घेण्याची गरज नसते.
 
 
Farook_1  H x W
 
फारूक अब्दुल्ला व्यवसायाने डॉक्टर आहेत, एमबीबीएसची पदवी त्यांनी घेतली आहे. मात्र, जम्मू-काश्मिरातीलच नाही, तर देशातील लोकांची नाडी त्यांना कधी पकडता आली नाही. फारूक अब्दुल्ला यांना नेहमीच पाकिस्तानी जनतेची नाडी सापडली आहे. आता तर त्यांनी चिनी जनतेची नाडी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाजमाध्यमांवर, डॉ. फारूक अब्दुल्ला यांना चीनने दत्तक घ्यावे, अशा उपरोधिक मागणीसाठी चीनच्या दूतावासासमोर निदर्शने झाल्याचा मजकूर झळकला.
 
 
डॉ. फारूक अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे नेते असले, तरी त्यांची संपूर्ण हयात पाकिस्तानची पाठराखण करण्यात गेली, आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी चीनचे मंगळसूूत्र आपल्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न आपल्या वक्तव्यातून केला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला, जे आजपर्यंत देशातील कोणत्याच सरकारला जमले नाही, ते मोदी सरकारने करून दाखवले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
 
 
या निर्णयाला विरोध होईल, खोर्‍यात गोंधळ घातला जाईल, या शक्यतेवरून मोदी सरकारने डॉ. फारूक अब्दुल्ला तसेच मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या अनेक नेत्यांना नजरकैदेत डांबले होते. मोदी सरकारचा हा निर्णय किती योग्य होता, याची आता खात्री पटत आहे. 370 कलम पुन्हा जम्मू-काश्मिरात लागू करण्यासाठी चीनची मदत घेण्याचे फूत्कार अब्दुल्ला यांनी मुलाखतीतून सोडले. आपल्या देशाच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करण्यासाठी दुसर्‍या देशाची, त्यातही आपल्या शत्रू देशाची मदत घेणे, हा देशद्रोह आहे. या देशद्रोहासाठी फारूक अब्दुल्ला यांच्या मुसक्या आवळून त्यांना तत्काळ तुरुंगात डांबण्याची गरज आहे.
 
 
गेल्या काही महिन्यांपासून चीनसोबतच्या आपल्या संबंधात तणाव आला आहे, लडाख सीमेवरून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. आपल्या बहादूर जवानांनी चीनचा हा प्रयत्न आतापर्यंत अनेकवेळा हाणून पाडला आहे. अशा वेळी देशाच्या अंतर्गत कारभारात चीनला हस्तक्षेप करण्यासाठी आमंत्रित करणे, याला देशद्रोह नाही तर काय म्हणायचे? देशातील सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध छोट्यामोठ्या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांचे हात फारूक अब्दुल्लांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यापासून कोणी बांधले आहेत? फारूक अब्दुल्लाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण घराण्याची वाटचाल भारतात राहून भारताविरुद्ध कारवाया तसेच पाकिस्तानची पाठराखण करण्यात गेली आहे. याला त्यांचे वडील शेख अब्दुल्ला यांचाही अपवाद राहिलेला नाही. जम्मू-काश्मीरचे सर्वाधिक नुकसान अब्दुल्ला घराण्याने नेहरू-गांधी घराण्याच्या आशीर्वादाने केले आहे. डॉ. फारूक अब्दुल्ला यांची प्रतिमा नेहमीच गुलछबू नेत्याची राहिली आहे.
 
 
मुळात वादग्रस्त विधान करण्याची डॉ. फारूक अब्दुल्ला यांची ही पहिलीच वेळ नाही, आतापर्यंत अनेकवेळा त्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. याचा अर्थ, वादग्रस्त विधाने करण्याची आणि ती अंगलट आली की माफी मागण्याची त्यांची सवय म्हटली पाहिजे. आपले कुणी काही बिघडवू शकत नाही, या वृत्तीतून अनिर्बंधपणे ते बरळत असतात. त्यांनी अशी डझनावारी वादग्रस्त विधाने केली आहेत.
 
 
जम्मू-काश्मीरचे लोक स्वत:ला हिंदुस्थानी समजत नाही, हिंदुस्थानी होण्याची त्यांची इच्छाही नाही. उलट आपल्यावर चीनची सत्ता असावी, असे त्यांना वाटत असल्याचे फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले.
 
 
जम्मू-काश्मिरातील तरुण पिढी आपल्या प्राणांचे बलिदान देत स्वातंत्र्याची लढाई लढत असल्याचे प्रशस्तिपत्र फारूक अब्दुल्ला यांनी याआधी दिले होते. या तरुणांच्या बलिदानाकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या तरुणांच्या स्वातंत्र्याच्या लढाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला. अप्रत्यक्षपणे अब्दुल्ला यांनी अतिरेक्यांचे समर्थन केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून भ्रमनिरास झाल्यामुळे फारूक अब्दुल्ला आता चीनला हस्तक्षेपासाठी आमंत्रित करत आहे का? हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
 
 
व्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, पण अब्दुल्ला यांनी व्याप्त काश्मीर पाकिस्तानचे असल्याचा निर्वाळा देेऊन टाकला. व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे आणि तो पाकिस्तानचाच राहील, तुम्ही तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानने हातात बांगड्या भरल्या नाहीत, या शब्दांत भारताला पाकिस्तानच्या बाजूने धमकी द्यायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. काश्मीर खोरे चीन, भारत आणि पाकिस्तान यांनी घेरले आहे, एकीकडे अण्वस्त्रसज्ज चीन आणि पाकिस्तान आहे, तर दुसरीकडे भारत. त्यामुळे स्वातंत्र्य हा काही आमच्यासाठी पर्याय नाही. कारण ना आमच्याजवळ अणुबॉम्ब आहे, ना लष्कर आहे, ना सेना आहे. त्यामुळे स्वतंत्र राष्ट्र म्हणून आम्ही जिवंत राहू शकत नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, याचा अर्थ आम्ही म्हणजे काश्मिरी भारताचे गुलाम नाही, भारताने काश्मिरींचा आदर केला पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, असे सांगायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
 
 
पुलवामामध्ये शहीद झालेल्या 40 जवानांबद्दल फारूक अब्दुल्ला यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत अनेक जवान शहीद झाले, पण त्यांना श्रद्धांजली वाहायला कधी पंतप्रधान मोदी गेले नाहीत, याकडे लक्ष वेधत पुलवामामध्ये जवान शहीद झाल्याबद्दल मला शंका वाटते, असे ते म्हणाले होते.
 
 
महिलांबाबतही असेच वादग्रस्त विधान फारूक अब्दुल्ला यांनी केले होते. आज असे दिवस आले की, महिला आणि मुलीशी बोलायचीही भीती वाटते, कोणीही महिलांना आपले सचिव म्हणून कामावर ठेवू नये, कारण त्यांनी लैंगिक शोषणाची तक्रार केली तर माणसाला तुरुंगातच जावे लागते, असे अब्दुल्ला म्हणाले होते. या विधानावरून गदारोळ झाल्यानंतर अब्दुल्ला यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.
 
 
विशेष म्हणजे त्या वेळी केंद्रीय मंत्री असलेल्या फारूक अब्दुल्ला यांनी माफी मागावी, अशी सूचना त्या वेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असलेल्या त्यांच्या मुलाला- उमर अब्दुल्ला यांना करावी लागली होती.
 
 
वादग्रस्त विधाने करायची डॉ. फारूक अब्दुल्ला यांची जुनी सवय आहे, त्यामुळे ते सतत वादग्रस्त विधाने करत असतात. एखादे वादग्रस्त विधान करणे आणि देशद्रोहाचे विधान करणे, यात खूप फरक आहे. वादग्रस्त विधानासाठी माफी मागून स्वत:ची सुटका करून घेता येते. पण, देशद्रोहाच्या विधानाबद्दल माफी मागणे पुरेसे नाही. अशा विधानाबद्दल डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. प्रश्न म्हातारी मेल्याचा नाही; काळ सोकावतो, त्याचा आहे. आजपर्यंत काँग्रेसी राजवटीने फारूक अब्दुल्ला यांची पाठराखण केली, आता मोदी राजवटीने, त्यांना पुन्हा देशद्रोह करण्याची हिंमत होणार नाही, जन्माची अद्दल घडेल, असा धडा शिकवण्याची गरज आहे!
 
9881717817