व्होडाफोन आऊट ऑफ रेंज, सकाळपासून नेटवर्क नसल्याची वापरकर्त्यांची तक्रार

    दिनांक :15-Oct-2020
|
सकाळपासून मुंबई, पुणे, नागपुरसह राज्यभर व्होडाफोन नेटवर्क डाऊन
ही समस्या तात्पुरती, कंपनीचा दावा
मुंबई,
आयडिया- व्होडाफोन नेटवर्क जे आता VI म्हणून ओळखले जाते, त्याची आज सकाळपासून नेटवर्क नसल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे. हा विषय ट्विटरवर सध्या ट्रेण्डिंगला आहे.पुण्यातील व्होडाफोनच्या अनेक वापरकर्त्यांनी त्यांना कालपासूनच नेटवर्क नसल्याचं सांगितलं आहे. त्यावरुन त्यांनी कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करून देखील कंपनी त्याची दखल घेत नाही असेही त्यांचे म्हणणे आहे.
 
पुण्याप्रमाणे नागपूर शहरातही व्होडाफोनच्या सेवेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्याचे सांगितलं जातंय. खासकरून इंटरनेट सेवा सकाळपासून बंद असल्याच्या तक्रारी येत आहेत.
 
 
 
ab _1  H x W: 0
सध्या राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू असून सोबत अनेक शाळांच्या अर्ध वार्षिक परीक्षा सुरू आहे. व्होडाफोनच्या नेटवर्क समस्येमुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यामुळे काही ठिकाणी व्होडाफोन मिनी स्टोअर समोर लोकांची गर्दी झाली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
याबाबत रोहित पवारांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने अनेक ठिकाणी मदतीची गरज आहे. अशा स्थितीत वेळीच मदत पोचण्यासाठी संपर्कासाठी मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊन चालणार नाही. पण काही भागात कॉल ड्रॉप होणं/नेटवर्क न मिळणं या अडचणी येतायेत. मोबाईल कंपन्यांनी याकडं लक्ष द्यावं."
राज्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या पावसामुळे आयडियाची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये आज आयडियाच्या मोबाईलला इंटरनेट चालत नाहीत. हा राज्यभर प्रॉब्लेम झाला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पुण्यातून व्होडाफोन आयडियाची इंटरनेट सेवा नियंत्रित केली जाते तिथे सर्व्हरला टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
 
 
नाशिकमध्येही व्होडाफोन आयडियाच्या नेटवर्कबद्दल अशाच तक्रारी येत आहेत. अनेकांनी जवळपास 12 तास होऊन गेले तरी कंपनी यावर काहीच करत नाही याबद्दल राग व्यक्त केलाय. त्यांचा 198 हा हेल्पलाईन क्रमांकही लागत नसल्याचं सांगण्यात येतंय.
व्होडाफोन कंपनीकडून मात्र ही समस्या तात्पुरती असून ती लवकरच सोडवण्यात येईल. त्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचं सांगण्यात आलं आहे.
व्होडाफोन नेटवर्क डाऊन झाल्याच्या घटनेवर सोशल मीडियात कमेंटचा पाऊस पडत आहे. त्यावर अनेक मजेशीर मीम्सही तयार करण्यात आले आहे. काही वापरकर्त्यानी यापेक्षा एअरप्लेन मोडवर जास्त स्पीड येत असल्याचं गमतीने सांगितलंय तर काहींनी आपण आता जिओ या कंपनीत पोर्ट करणार असल्याचं जाहीर करून टाकलंय.
या समस्येला काही जनांनी गमतीने 2020 हे वर्षच असे असल्याचं सांगितले आहे.