मेरी कोमच्या जीवनशैलीकडे बघण्याची गरज : कोहली

    दिनांक :15-Oct-2020
|
नवी दिल्ली, 
पितृत्व आणि खेळातील उत्कृष्टतेत समतोल कसा ठेवावा याविषयी प्रेरणा घेताना मला सहा वेळची विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी कोम हिच्या जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे, असे लवकरच वडील होणारा विराट कोहली म्हणाला.
 

virat kohli-mary kom_1&nb 
 
विराट कोहली आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात पुढील वर्षी जानेवारी महिन्यात एक नवीन व गोंडस पाहुणा येण्याची आशा आहे.
 
 
चॅम्पियन बॉक्सर व चार मुलांची आई असलेली मेरी कोम यांनी ठरविलेल्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे तो म्हणाला. प्युमा इंडियातर्फे आयोजित एका चर्चासत्रादरम्यान तो बोलत होता. यावेळी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मेरी कोमने कोहली दाम्पत्यांचे अभिनंदन केले.
 
 
चार मुलांची आई, प्रशिक्षण आणि सर्व बॉक्सिंग स्पर्धा, हे सर्व कसे काय करते. याच्यात समतोल कसा काय साधते, हे मेरी कोमकडून जाणून घेण्यास कोहली उत्सुक होता. अशा परिस्थितीतही 37 वर्षीय मेरी कोमने बॉक्सिंगरिंगमध्ये आपले श्रेष्ठत्व कायम राखले आहे.
 
 
यावर उत्तर देताना मेरी कोम म्हणाली, या सर्व यशाचे श्रेय माझ्या कुटुंबाला जाते. कुटुंबाच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले. विवाहानंतर माझे पती माझ्या ताकदीचा आधारस्तंभ झाला. त्याने मला दिलेला पाठिंबा अफाट आहे. तो माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊ लागला. मी तर म्हणेन तो आदर्श पती व पिता आहे.
 
 
कोहली म्हणाला की, मेरी कोमने दाखविलेला मार्ग कोणत्याही पालकांसाठी अनुकरणीय आहे. मेरी कोम देशातील महिलांसाठीच नव्हे, तर प्रत्येकांसाठी प्रेरणामूर्ती आहे. मेरी कोमने प्रतिकूल परिस्थितीत क‘ीडा क्षेत्रात यश संपादन केले. सुविधांचा अभाव असताना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड दिले. स्वतःच्या यशाचा मार्ग स्वतः शोधला. तिची ही जीवनशैली सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.