मातेच्या स्वागतासाठी कोरोनातही लेकरं सज्ज

    दिनांक :16-Oct-2020
|
*महागाईची फिकर नाय
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
दुर्गोत्सव म्हणजे वर्धेकरांसाठी नऊ दिवसांची दिवाळी असते. घराघरात मातेच्या घटांची स्थापना होत नसली तरी गावातील विद्युतरोषनाई पाहिल्यावर गावच नटलेलं दिसतं. परंतु, यावर्षी कोरोनाने पाय पसरविल्याने सर्वच सणांवर विरजण पडले. चौका चौकात देवीच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मूर्तीकारही देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरण्याच्या तयारीला लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पावसासह अनेक अडथळे आले असून मूर्तींच्या आकारानुसार भावही कमी झाले. त्याचा फटका मुर्तीकारांवर बसला असला तरी मातेसाठी लेकरांकडे काही कमी नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

a_1  H x W: 0 x 
 
दुर्गा देवीचा उत्सव शहरासोबचत हिंगणघाट येथेही मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातो. परंतु, यावर्षी अगदी साध्या पद्धतीने मुर्तीची स्थापना करायची असली तरी भक्तांमध्ये उल्हास कायम आहे.
 
वर्ध्यात विद्युत रोषनाईची चढाओढ लागलेली असते. ती यावर्षीही पाहीजे त्या पद्धतीने दिसून येत नाही. देवीच्या मंडपावर प्रचंड खर्च होत असताना मूर्तीची किंमतीतही त्याच प्रमाणात वाढ होत होती. परंतु, यावर्षी शासनाने काढलेल्या नियमाने प्रचंड तारांबळ झाली. तोच नियम 15 दिवसाच्या अगोदर काढण्यात आला असता तर मुर्तींकरांना सोईचे झाले असते. मूर्तीचा आकार कमी झाल्याने किंमतही घसरली असल्याचे मूर्तीकार नितीन भोयर यांनी सांगितले.
 
देवीचा पाया मजबुत असण्यासाठी लाकडाच्या पाटाचा वापर केला जातो. यावर्षी 3 फुटाचा लाकडी पाटा 800 रुपये किंमतीचा तर 4 फुटाचा 900 रुपये किंमतीचा तसेच 6 फुटाचा 1 हजार रुपये किंमतीचा पाटा आहे. तब्बल 200 रुपयाने लाकडी पाटा महागला असल्याचे मुर्तीकार भोयर यांनी सांगितले.
 
पदवी प्राप्त केलेले भोयर यांना मूर्ती कलेविषयी विचारले असता आपली आजी मातीचे बैल बनविताना आपण एकदा बघितले. आजीपासून प्रेरणा घेऊन मुर्ती बनविण्याचा छंद लागला असल्याचे भोयर म्हणाले. जातीनी कुंभार नसलो तरी आवड माणसाला कुठेही नेऊन पोहचवते. हळूहळू मूर्ती कलेत आपण पारंगत होऊ लागलो. आपण मित्र किशोर कामटकर सोबत 2000 पासून मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. हळूहळू लोकांना आपल्याकडील मूर्ती आवडू लागल्या. अडीच फुटांपासून तर 6 फुटांपर्यंत मुर्त्या तयार करीत होतो. पण, यावर्षी 4 फुटांच्या 6 मुर्त्या बनविल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या सावटामुळे मुर्ती जरी कमी असल्या तरी आपलेेे नुकसान काही नाही कारण आपण फक्त आवड कला जोपासावी म्हणून मुर्ती बनवितो मात्र इतर मुर्तीकारांना चांगलाच फटका बसल्या असल्याचे भोयर म्हणाले.
 
देवीच्या मुर्ती तयार करण्यासाठी आपण सावरगाव येथून टेरा कोटा प्रकारची माती आणत होतो. परंतु, यावर्षी ग्रामीण भागातून फक्त पांढरी माती आणली असून त्याच मातीच्या मुर्त्या बनविल्या असल्याचे रूपेश प्रजापती यांनी सांगितले. एक देवी बनविण्यासाठी किमान 2 टोपले माती लागते. देवीची पकड मजबूत बनविण्यासाठी तणस 150 रुपये पेंढी प्रमाणे आणावे लागते. देवीला विशिष्ट आकार यावा आणि माती घट्ट बसावी यासाठी एका देवीला 3 तरटं (पोते) लागतात. मागच्या वर्षी तरटचा भाव 50 रुपये होता. तर यावर्षी 80 रुपये आहे. या भाव वाढीत मूर्तीचे भाव गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमीच आहे. भाऊ यंदा कोरोना हाय.. महागाई भी आहे, कमी मधी बनवून द्या, असे भक्त म्हणतात. त्यामुळे ग्राहकाला नाराज करीत नसून यावर्षी 10 मुर्त्या बनविल्या. शेवटी महागाई असली तरी आईसाठी लेकरां समोर काहीच नाही. ऑर्डरच्या बजेट मध्ये यावर्षी मुर्त्या बनविल्या असून जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्रजापती यांनी सांगितले.