मनपरिवर्तनातूनच सामाजिक विषमता दूर होईल

    दिनांक :16-Oct-2020
|
- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
पुणे,
देशाच्या प्रगतीसाठी समाजातील विषमता दूर करणे आवश्यक आहे. यासाठी समतावादी लोकांना सोबत घेऊन मनपरिवर्तनाचा प्रयत्न आवश्यक आहे. कितीही कायदे झाले, तरी ते आचरणात आणल्याशिवाय त्याचा लाभ लोकांना मिळू शकणार नाही. आरक्षणासाठी कायदे झालेत. परंतु, त्याचा लाभ सर्वांनाच झालेला नाही. ज्यांचे प्रभुत्व जिथे आहे, तेच याचा फायदा घेत आहेत. ही बाब सर्वोच्च न्यायालयाने देखील स्वीकारली आहे. परंतु, समाजाला जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत आरक्षण कायम ठेवले पाहिजे. यासाठी माझे पूर्ण समर्थन आहे, असे रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.
 
mohanji bhagwat_1 &n 
 
येथे आयोजित केलेल्या दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारंभात ते ‘सामाजिक समरसता’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. सामाजिक समरसतेसाठी आपल्या आचरणात बदल घडवावा लागेल. हा बदल आपल्याला घडवावाच लागणार आहे. देशातील विषमतेचे निर्मूलन करण्यासाठी समाजात परिवर्तन घडवावे लागेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
ज्यांना देशाचे तुकडे करायचे आहेत, ते समाजातील ऐक्य सहन करू शकणार नाहीत. क्रांतीच्या माध्यमातून समाजात समरसता आणणे शक्य नाही. कायदेशीर मार्गानेच या समस्येवरील तोडगा शक्य आहे, असे डॉ. बाबासाहेब यांनी सांगितले होते.
 
 
समरसतेशिवाय समता शक्य नाही
समरसतेशिवाय समता शक्य नाही. यासाठी आपल्याला सज्ज राहावे लागेल. झुकावे लागले, तरी मागे हटणार नाही. जे वरती आहेत, त्यांना झुकावे लागेल आणि जे खालती आहेत, त्यांना हात वर करावा लागेल, तेव्हाच समाजाचे उत्थान होईल, असे ते म्हणाले.
 
 
आचरणाचे उदाहरण द्यावे लागेल
समाजात समरसता आणण्यासाठी आपल्या आचरणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवावे लागेल. पहिले करून दाखवावे लागेल, नंतर दुसर्‍यांना सांगावे. हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक करीत आहेत. तेच सामाजिक समरसता मंचाच्या लोकांनाही करायला पाहिजे. आपण एकत्र येऊन सण, उत्सव साजरे करायला पाहिजे. आपली भाषा योग्य करावी. न्यायासाठी उचललेल्या आवाजासोबत उभे राहायला पाहिजे. सर्व समाज आपला आहे, या भावनेने काम करायचे आहे. संविधानाची प्रस्तावना सर्वांच्याच आचरणात यावी, यासाठी वाणीचा दीप उजळून समरसता लोकांच्या हृदयात उतरवायची आहे आणि आमचे स्वातंत्र्य जाईल, असा दिवस कदापि येणार नाही, हे बाबासाहेबांना वचन द्यायचे आहे, असेही डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.