अमेरिकेतील भारतीयांची बिडेन यांना पसंती

    दिनांक :16-Oct-2020
|
वॉशिंग्टन, 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतशी पुढील राष्ट्राध्यक्ष कोण याची उत्कंठा देखील वाढत आहे. आता मतदानाला केवळ 18 दिवसच उरले आहेत. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकीत अमेरिकन भारतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावला जात आहे. एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन भारतीयांची पसंती ट्रम्प यांच्याऐवजी बिडेन यांना असल्याचे दिसून आले आहे.
 
 
biden_1  H x W:
 
बहुतांशी अमेरिकेतील भारतीय मतदारांचा कल हा डेमोक्रेटिक पक्षाकडेच असतो. ट्रम्प यांच्याकडून या भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जो बिडेन यांनी उपाध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांचे नाव घोषित केल्यानंतर भारतीय वंशाचे मतदार डेमोक्रॅटिक पक्षाकडे वळले असल्याची चर्चा आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 72 टक्के नोंदणीकृत मतदारांचा कल डेमोक्रेटिक पक्षाकडे आहे, तर ट्रम्प यांना 22 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला आहे.
 
 
ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा आधार घेतला आहे. त्यांच्या प्रचाराच्या चित्रफितीतही पंतप्रधान मोदींचा समावेश आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. डेमोक्रेटिक पक्षाने या निवडणुकीत आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर भर दिला आहे. भारतीय वंशाच्या मतदारांनी यालाच अधिक महत्त्व दिले असल्याचे समोर आहे. भारतासोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाबाबत 33 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला तर, 37 टक्के मतदारांनी विरोध केला आहे. इंडियन अमेरिकन अ‍ॅटिट्यूड सर्व्हे या संस्थेने सप्टेंबर महिन्यात सर्वेक्षण केले होते.